तुम्ही म्हणता जगामध्ये
दु:ख आहे भरलेलं
आणि कुणी - कुणीतर
स्वप्नात सुद्धा हरलेलं.
हरलं तर हरू द्या,
भरलं तर भरू द्या !
दु:खा साठी झुरू नका
हरण्यावरती मरू नका.
तुम्ही तुमचे चालत रहा,
ओठातलं गाणं बोलत रहा.
एक दिवस असा येईल,
दु:ख सुद्धा गाणं होईल.
तेव्हा त्याला गात जा,
हळूच कवेत घेत जा.
मग त्याला सांगून टाका
मी तुला भीत नाही.
फक्त-फक्त सुख म्हणजेच
माझ्या साठी गीत नाही.
मी आनंदात गाणं गातो
दु:खात सुद्धा तसाच न्हातो.
..... पुन्हा म्हणाल ?
जगामध्ये दु:ख आहे भरलेलं
आणि कुणी - कुणीतर
स्वप्नात सुद्धा हरलेलं.
मी म्हणेल .... !
हरलं तर हरू द्या,
भरलं तर भरू द्या !
तुम्ही तुमचे चालत रहा,
ओठातलं गाणं बोलत रहा.
- रमेश ठोंबरे
No comments:
Post a Comment