Dec 25, 2011

१)


रात्री एकटच झोपल्यावर हळूच
छातीवर फुंकर घालणारी बोचरी थंडी ...
अन सकाळी उठल्यावर ...
इस्त्रीच्या शिल्लक राहिलेल्या एकमेव
शर्टची तुटलेली गुंडी.

आठ दिवसांपासून एकाच जागी
झोपलेलं अस्ताव्यस्त अंथरूण ...
अन तिथेच बेडवर कोपऱ्यात
उघडं पडलेलं मळकट पांघरूण
 

किचनओट्याशेजारील मोरीत
पडलेली खरकटी भांडी ...
अन कधीकाळी ताजी असलेली
फ्रीझमधील सडलेली भाजी.

वर्तमानपत्रांपासून दूर पडलेल्या
रंगीत साप्ताहिक पुरवण्या ...
अन कपाटातील एकावर-एक पडलेल्या
पुस्तकातील अगणित कहाण्या.

झोपेच्या प्रयत्नात हजारदा
बदललेली कुशी ...
अन शेजारीच पडलेली
आणखी एक उशी.

बाथरूम मधील
ओल्या कुबट कपड्यांचा वास ...
अन पोटात ढकलताना
नरड्यात अडकलेल्या अन्नाचा घास.

हे सगळे मला पदो-पदी जाणीव करून देतात ...
...
...
...
...
...
तू घरात नसल्याची !

- रमेश ठोंबरे
(तू नसताना ...)

Dec 21, 2011

सच का सामना

  Life OK या नवीन TV Channel वर पुन्हा एकदा सुरु झाला आहे 'सच का सामना', मागे काही भागांच्या प्रसरणानंतर काही करणास्तव बंद झालेला हा कार्यक्रम पुन्हा एकदा सुरु झाला आहे. मला हा कार्यक्रम त्या वेळी हि भयंकर आवडला आणि आजही आवडतो. मला सर्वात जास्त आवडली ती या कार्यक्रमाची Idea. या कार्यक्रमाचा format हि कमालीचा आहे. हा original आहे कि कुठल्या विदेशी कार्यक्रमावरून बेतलेला माहित नाही पण या कार्यक्रमाचे रसायन अगदीच भन्नाट आहे. जे कोणी लोक या कार्यक्रमात येण्याचे धाडस करतात ते खरोखरच असामान्य आहेत अस मला वाटत. या बोटावरची थुंकी या बोटावर करून जीवनात यश मिळवायचं आणि त्याच वेळी इथपर्यंत पोचताना अवलंबलेल्या भ्रष्ट कामांची कबुली द्यायची. हे करताना बर्याचदा नैतिक, सामाजिक, कौटुंबिक नात्यांचा आणि प्रतिष्ठेचा बळी द्यावा लागतो. कार्यक्रम पाहताना पहिल्या प्रश्नापासून ... शेवटपर्यंत प्रत्येक प्रश्नात पाहणारा प्रेक्षक गुंतत जातो हेच या कार्यक्रमाच्या format च यश आहे. बर्याचदा आपण स्वतःला त्या खुर्चीत असल्याचा अनुभव करतो. एका यशस्वी माणसाचे आयुष्य किती गुंतागुंतीच असू शकतं याचा प्रत्येय हा कार्यक्रम पाहताना प्रश्नो-प्रश्नी येतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण केलेल्या आणि आपल्या घरातील कोणालाच अगदी पती / पत्नीलाही माहित नसणाऱ्या चुकांवरच प्रश्नकर्ता कसा काय बोट ठेवतो ... हे हि विचार करण्यासारखे आहे. प्रत्येक सहभागी चा भूतकाळ पिंजून काढल्याचे कसब य कार्यक्रमात दिसून येते. खरोखर वर वर सरळ साधा दिसणारा मानूस अश्या कितीतरी गोष्टी आपल्या अत्यंत जवळच्या म्हणवणाऱ्या आणि दूरच्या हि लोकांपासून लपवत असतो. एखादा माणूस जीवनात यश मिळवण्यासाठी किंवा हवे हे मिळवण्यासाठी लहानपणापासूनच कसा भ्रष्ट बनत जातो ... नकळत तो कसा भ्रष्टाचारी बनतो ? असं काही पाहिलं आणि अनुभवलं कि वाटतं ... खरच आपण एक 'खुली किताब' आहोत ?

- रमेश ठोंबरे

Dec 18, 2011

प्रिया भक्ती सार -2


|| २ ||
कॉलेजची वारी
नित्य असू द्यावी
हातामध्ये चावी
बाइक ची || १ ||

प्रियेचा स्वभाव
तन आणि मन
घ्यावे निरखून
आपणची || २ ||

पहा तपासून
तिची प्रेम खोली
आणि गोड बोली
नित्य नेमे || ३ ||

प्रिया नाम मुखी
असावे सर्वदा
आणि दिल फिदा
तिच्यावरी || ४ ||

करू नका लगट
प्रिये सवे कधी
काय कर्म आधी ?
पुढे ऐका || ५ ||

- रमेश ठोंबरे

Dec 16, 2011

प्रिया भक्ती सार - 1

|| १ ||
प्रिया भक्ती सार
सांगतो तुम्हासी
अवधान थोडे
असु द्यावे || १ ||

प्रिया मंत्र जपा
होवूनि निवांत
सुटेलकी भ्रांत
आयुष्याची || २ ||

प्रिया भक्ती माना
जीवनाचे ध्येय
हवे कुणा श्रेय
भक्ती मध्ये || ३ ||

करा तिच्यासाठी
जे जे वांचे मन
मिळेल कि धन
प्रिया रुपी || ४ ||

आणखी सांगतो
काय काय युक्ती
तूर्त एक भक्ती
असू द्यावी || ५ ||

- रमेश ठोंबरे
(प्रियेचे अभंग)

Dec 14, 2011

'सोशल' फटका




सोसलं तेवढं करत जा रे, सोशल सोशल करू नको
सोशल असते सत्यामध्ये, व्हर्चुअली तू झुरू नको  

नेटिंग, सेटिंग, च्याटिंग गडबड करू नको
उगी रहावे, काम करावे, निष्फळ बडबड करू नको 

फेसबुकावर मित्र हजारो, शेजार्याला विसरू नको, 
सोशल होतील बोल इथे, शब्दांमधुनी घसरू नको.

मिठी मारुनी, चित्र काढुनी, अल्बम सगळा टाकू नको
सोशल वरती उघडे केले, आता पिसारा झाकू नको !

झक मारितो झकरबर्गही, नियंत्रण ना असे इथे,
रस्त्यावरती येते सगळे, घरासारखा पसरू नको !

ह्यकर्स असती इथे तिथे, तू त्यांना थारा देऊ नको,
झापड बांधून डोळ्यावरती, नको तिथे तू जाऊ नको.

तुझ्याच हाती तुझी सुरक्षा, पासवर्ड तो लिहू नको,
आठवड्याला बदलत जा रे, जुना-पुराना ठेऊ नको.

ओळख नाही शीतभराची, फ्रेंड रिक्वेस्ट धाडू नको.
मित्राच्या मित्राचा मित्र म्हणुनी, उगाच नाते जोडू नको
   
फाईट करुनी लाईक करतो, उगा स्माईली फेकू नको,        
सत्य असावे ओठावरती, सत्य म्हणुनी ठोकू नको.   

पोरींच्या नावे पोरे भेटती, फोटूस त्यांच्या भाळू नको,
सल्ला देतो तुला 'रमेशा', 'फटका' म्हणुनी टाळू नको.

- रमेश ठोंबरे   

Dec 12, 2011

36 || शेवटचा अभंग ||


शेवटचा अभंग
प्रियेच्या चरणी
म्हणतील ज्ञानी
असे का हो ? || १ ||

जिच्या साठी केला
आहे हा प्रवास
तिचा तो अभ्यास
घेत आहे || २ ||

शृंगाराच्या पुढे
अस्तो एक रस
परी तो हव्यास
इथे नाही || ३ ||

सुटतील बंध
जेव्हा योवनाचे
पडदे लाजेचे
पडलेले || ४ ||

समजून घ्यावी
भावना मतीची
वेळ ती रतीची
आज आहे || ५ ||

- रमेश ठोंबरे

सिंहाचा आजार


एकदा सिंहराजे आजारी पडले, |
सर्वच प्राणी तेव्हा उगीच रडले.
डोळ्यात कुणाच्याच अश्रू नव्हते,
पण उगीच म्हणत वाईट फार घडले ||

जिराफ होता सिनेमा अक्टर,
बसायला त्याला होते ट्याक्टर |
तो हि धावत पळत आला,
म्हणाला मी तर आहे डॉक्टर ||

जिराफाने धरली सिंहाची नाडी,
म्हणाला धुक - धुक आहे थोडी |
राजे काही लवकर मरत नाहीत,
कारण हि तर आहे त्यांची खोडी ||

म्हणे, सिंह आता म्हातारा झाला,
शिकार सापडत नाही त्याला |
सर्व प्राणी आयतेच होतील गोळा,
म्हणूनच त्याने हा पोबारा केला ||

माकड हळूच सिन्हाकड गेलं,
म्हणे जीराफाना हे बर् नाही केलं |
युक्ती आपली फसली सारी,
त्यानं गुपित सारं उघड केलं ||

ससा म्हणाला गोंधळ झाला,
दिवस माझा फुकट गेला |
एवढा आजार होउन सुद्धा,
सिंह बिचारा का नाही मेला ? ||

- रमेश ठोंबरे

Dec 9, 2011

गाढवाचं लग्न


आज तर होतं गाढवाचं लग्न,
सारच जंगल होतं त्यात मग्न.
जिराफ होता जंगलचा पंच
मंडप दिला त्यानं फारच उंच.
बसायला गाड्या मऊ होत्या भारी.
गाढव म्हणे - उकीरड्याची राखच बरी.
नवरी शोभे गाढवाला छान,
नवऱ्या इतकीच लांब तिची मान,
उंटाने धरला मध्ये अंतरपाठ..
पण मंगलअस्टकाच नव्हती त्याला पाठ.
गाढवाला होती गडबड झाली,
अंतरपाठच खाली वर सारी.
उंटाने लांबण लावली फार,
गाढव बिचारे झाले बेजार .
आता गाढवानेच घेतली तान,
आवाज म्हणे माझाही छान.
उंट शेवटी गोंधळून गेला,
अंतरपाठ त्यानं बाजूला केला.
वाजू लागला ढोलक ताश्या,
सावध प्राणी सावध माश्या.
लग्न संपताच जेवणाची घाई
सिंह लांबूनच पाहुन्याना पाही.
जेवणाचा सगळा गोंधळ झाला,
म्हणे सस्याचा वाघान फराळ केला.
अर्ध्यातच उटली पहिली पंगत,
वाघाच्या जेवणाला आली होती रंगत.
सिंहानेही धरले जेव्हा एक हरीण,
माकड म्हणाले, " तो मलाही मारीन"
सर्व इकडेच लागले नादी,
गाढव बिचारे उकिरडा शोधी.

- रमेश ठोंबरे.

Dec 7, 2011

35 || वेड लावी मला ||


वेड लावी मला
प्रिये तुझे अंग
कंचुकी हि तंग
त्यावरी ग || १ ||

उन्मादी तारुण्य
लावण्याचा घाट
उन्मादक थाट
शोभतो ग || २ ||

नाशिले नयन
सोडतात बाण
शोधतात प्राण
प्रेतात ग || ३ ||

आग आग होते
मग या जीवाची
तेंव्हा खरी गोची
भक्तीत ग || ४ ||

पाहताच तुला
जातो माझा तोल
दावे मग फोल
सज्जनाचे || ५ ||

- रमेश ठोंबरे

Dec 6, 2011

कोणी म्हणे ...... १ ..................४)


कोणी म्हणे झालो
इथे मी पावन |
गर्वाचे दहन
झाले कि हो ||

कोणी  म्हणे आज
गिरविला पाठ |
कवितेची गाठ
पहिलीच ||

कोणी  म्हणे सार्थ
पहिला मी पार्थ |
सोडुनिया स्वार्थ
उपदेशी ||

कोणी म्हणे नाही
नेम मज दुजा |
याहून तो चोजा
कोण संग ||

कोणी  म्हणे येथं
पहिली म्या गाय |
काव्याची ती माय
रोज भेटे ||


- म.क.
(रमेश ठोंबरे)

घनघोर केसांमधी ....





















सखे कळले न मला कधी ओलांडला शिव
..............घनघोर केसांमधी माझा अडलेला जीव ! || धृ ||

काळेभोर डोळे तुझे, झुके पापणी कम्माल
योवनाचा घाट न्यारा, मस्त मोरनीची चाल
बाण नजरेचा चाले, जरी झुकलेली मान
पाठ्म्होरा बांधा तुझा,  करी काळजाचे हाल !

वाट पाहून मी आहे ...कधी करशील घाव
कधी लावशील सखे, माझ्या नावासंग नाव    ||१ ||
.............. घनघोर केसांमधी माझा अडलेला जीव !

कातलेली तुझी काया, जसा गव्हाळ कातळ
माझ्या मनामंदी वाहे झरा प्रेमाचा खळाळ
मन झालं ग अधीर, तुझ्या अंगावर खेळ
कसा गावनार त्याला सखे अंतरीचा तळ
        
लाट भरतीची आली... बघ सोडली मी नाव ...
दूर राहिला किनारा .. तुझा सापडेना गाव || २ || 
.............. घनघोर केसांमधी माझा अडलेला जीव !

- रमेश ठोंबरे

Dec 5, 2011

ईतकं सुद्धा अवघड नसतं


थकलेल्याला साथ देणं
चुकलेल्याला हात देणं
ईतकं सुद्धा अवघड नसतं
दिव्यासाठी वात देणं

मित्रत्वाला साद देणं
शत्रुत्वाला दाद देणं
ईतकं सुद्धा अवघड नसतं
चर्चेसाठी वाद देणं

असलेल्याचा भास होणं
नसलेल्याची आस होणं
ईतकं सुद्धा अवघड नसतं
वासरासाठी कास होणं

पांगळ्याचा पाय होणं
आंधळ्याची माय होणं
ईतकं सुद्धा अवघड नसतं
दुधावरची साय होणं

भटकल्यावर दिशा देणं
सटकल्यावर नशा देणं
ईतकं सुद्धा अवघड नसतं
'PJ' वरती हशा देणं

गोड मुलीला फुल देणं
दोड मुलीला हूल देणं
ईतकं सुद्धा अवघड नसतं
सजलेल्या झूल देणं

- रमेश ठोंबरे

Nov 24, 2011

34 || धुंद होती रात्र ||


धुंद होती रात्र
धुंद तुझी मिठी
गोष्ट तीच ओठी
आज आहे || १ ||

प्रिये तुझ्या स्पर्शी
पहिला मी स्वर्ग
आता तुझा वर्ग
नित्याचाच || २ ||

प्रिये तुझे ओठ
थरारले फार
यौवनाचा भार
देखिला मी || ३ ||

मिठी मध्ये तुझ्या
आता चंद्र सूर्य
पुन्हा काय शौर्य
उरले ग || ४ ||

शरण मी तुला
आलो प्रिये देवी
सदा कृपा ठेवी
भक्ता वरी || ५ ||

- रमेश ठोंबरे

Nov 20, 2011

ती नसताना पाऊस येतो ?


तिचा आठव त्याला अनावर होतो.
तिचा आठवात ...
तो उभ्या उभ्या न्हातो.
तिची सय त्याला झुरायला लावते.
ओलं ओलं होऊन ...
तिच्यावर मरायला लावते.

तिचे काळे केस ...
त्याला वेड लावतात.
त्याच काळ्याभोर केसांच्या
छायेत मग आठवांचे ...
ढग जमू लागतात..
तिचे पाणीदार टपोर डोळे
त्याला त्याच्या थेम्बासारखे वाटतात ...
त्यांचं प्रदर्शन करण्यासाठी ...
तो आतुर होतो.

तिची मेघ श्यामल काया ...
कधी तरी पहिली त्यानं
अन ... तो थांबायचच विसरून गेला.
तीच त्याला पुन्हा पुन्हा
खुणाउ लागते ...

आज पुन्हा तीच आठवण गडद होते...
त्याचं मन तुडुंब भरून येतं
तो तिच्या आठवात रानभरी ...
होऊन कोसळत जातो ....
..
....
......

कोण म्हणत .....
ती नसताना पाऊस येतो ?

- रमेश ठोंबरे

Nov 19, 2011

कविता ..........

शब्द शब्द चेतन्यासाठी ...
ठिणगीसम पडावी कविता.
लेक सासरी जाताना थोडी ...
हुंद्क्यातून अडावी कविता.

तिच्या गुलाबी ओठांवर,
एक नशीली सुचावी कविता.
सोबत तिची सुटली तरीही ...
सोबत 'तीच' असावी कविता.

उध्वस्त मनाच्या गाभार्यातून,
अभंगासम गावी कविता.
शुश्क मनाचे बीज रुजाया ...
मल्हारासम यावी कविता.

नव्या नवेल्या जन्मावर ..
पहिली वहिली लिहावी कविता
सरनावरच्या मरनावरही ...
शेवटचीच, एक हवी कविता.

थिजल्या हरल्या क्षणी पुन्हा,
राखेतून उडावी कविता.
साथ सुटता शब्दांची मग,
धुसमुसून रडावी कविता.

- रमेश ठोंबरे
( कवितेच्या प्रेमात ....!)

Nov 17, 2011

|| सोन्याहून सोनसळी ||


सोन्याहून सोनसळी
फुलाहून गोड कळी
कधी अफुचीच गोळी
प्रिया माझी || १ ||

मन नाही थाऱ्यावर
कोकीळाच तारेवर
चांदनीच धरेवर
प्रिया माझी || २ ||

नवतिचे रोप आहे
रोज नवे रूप दावी
रोज नवे वेड लावी
प्रिया माझी || ३ ||

सावलीच उन्हातली
परतली झाडाखाली
आणि पुन्हा वेडावली
प्रीया माझी || ४ ||

फैलावता हात दोन्ही
मिठीत न विसावली
का, न कधी लाडावली ?
प्रिया माझी || ५ ||

- रमेश ठोंबरे

Nov 15, 2011

..................... प्रार्थना ......................


सूर्या सूर्या उन दे
एक नवी धून दे
माझ्या खंबीर मनासाठी
अस्तित्वाची खुण दे

डोळ्या डोळ्या आस दे
एक दृष्टी खास दे
पुन्हा एकदा जगण्यासाठी
एक नवा श्वास दे

ढगा ढगा पाणी दे
ओठावरली गाणी दे
पुन्हा नव्या स्वप्नासाठी
एक नवी कहाणी दे !

धरणी धरणी थारा दे
चोचेला या चारा दे
उबलेल्या मनासाठी
तुझ्या कृपेचा वारा दे !

देवा देवा शक्ती दे
एक नवी युक्ती दे
पुन्हा तुझ्या सेवेसाठी
कष्टावर्ती भक्ती दे !

- रमेश ठोंबरे 
Ramesh Thombre 

माझ्या मनाचं पाखरू



माझ्या मनाचं पाखरू,
वर भर-भर गेलं
साद घालता मायेन,
बघ परतून आलं
..
माझ्या मनाचं पाखरू,
आस रानभरी झालं
माय हम्बरता गोठ्यात,
बघ वासरू ते आलं.

माझ्या मनाचं पाखरू,
आस दूर-दूर जाई
दूर सोडून आकाश,
पुन्हा मन माझं होई. 
..
माझ्या मनाचं पाखरू,
त्याला आभाळ पुरेना.
माझ्या मनाच पाखरू,
बघ मनात गावना.
..
माझ्या मनाचं पाखरू,
बाई लई ग खट्याळ.
त्याला शोधिता -शोधिता,
उगी लापाछपी खेळ.
..
माझ्या मनाचं पाखरू,
बाई लई ग मायाळू
होता मायेची आठवण,
लाग बघ डोळ गाळू
..
माझ्या मनाचं पाखरू,
लई-लई धीट बाई,
मी येता सासरात,
ते महेरीच राही.

- रमेश ठोंबरे
Ramesh Thombre

Nov 14, 2011

~ आहेस सांग कोठे ~



आहेस सांग कोठे, तू बोल विठ्ठला.
अस्तित्व दावण्यारे, तू डोल विठ्ठला.


आहे जगात साऱ्या, अंधार दाटला.
काळाच रंग आहे, अनमोल विठ्ठला.


दारात मंदिराच्या, बाजार मांडला.
आता तरी कवाडे, तू खोल विठ्ठला.


उपवास दावणारे, सारे इथे-तिथे
खाऊन भ्रष्ट झाले, हे 'टोल' विठ्ठला.


पायात लोळतो रे, सोडून भ्रांत मी.
जातो कधी कधी का, मग तोल विठ्ठला.


नाही 'रमेश' चिंता, कोणास राहिली.
पृथ्वी कशास फिरते, ही गोल विठ्ठला ?


- रमेश ठोंबरे
गागालगा लगागा गागालगा लगा

ओढ

माझी आणि तुझी पहिली भेट
सूर्यास्ताच्या साक्षीने घडली
आणि तेंव्हापासुनच
अस्ताला जाणा-या सुर्याला पाहण्याची
विलक्षण सवय मला जडली.
जेंव्हा मी तुझी वाट पाहत ..
या वाळुवर बसतो.
तेंव्हा बिचारा सूर्यच
तू माझ्या साथीला यईपर्यंत
दूर फेसाळणाऱ्या  समुद्र्लाटावर
उगाच रेंगाळत असतो.
जेंव्हा तु येतेस तेंव्हा
मी सुर्याला विसरून
तुझ्यात गडून जातो,
आणि सूर्य ही तेंव्हा
एका विलक्षण ओढीने समुद्रात बुडून जातो.
त्याला ओढ़ असते ...
उद्याच्या सुर्योदयाची
आणि मला सुर्यास्ताची.

- रमेश ठोंबरे
Ramesh Thombre

Nov 12, 2011

मी माझाच आहे

जोडशील कुठे नाते,
संग माझाच आहे.
तोडू नकोस सुमने,
गंध माझाच आहे.
..
गाऊ नकोस गाणे,
राग माझाच आहे.
छेडू नकोस तारा,
अनुराग माझाच आहे.
..
तू तर आशी अबोली,
वाद माझाच आहे.
जाशील तू कुठेही,
अपवाद माझाच आहे.
..
जगणे तुला न अवघड,
श्वास माझाच आहे.
पाहून घे सर्वदा,
आभास माझाच आहे.
..
संग हवाय तुजला,
घे माझाच आहे.
आणखी न झालो कुणाचा,
मी माझाच आहे.

- रमेश ठोंबरे  
Ramesh Thombre 

Nov 11, 2011

तो श्रावणच वेडा


श्रावणातील डोंगर
हिरवी-हिरवी नक्षी,
पाहून दोन पक्षी
धुंद झाले.

आकाश ओलावलेले
धरती ही चिंब झाली
कोकीळ शिळ घाली,
दूर-वर.

तो श्रावणही प्रेमी
ओल्या गर्द हीरवळीचा
नव कोवळ्या कळीचा
फुलणाऱ्या

पुन्हा-पुन्हा ओला होतो
जावळीक साधण्यास
बंध नवा बांधण्यास
ओलावलेला.

कसा तोच चिंब
करा विचार थोडा
तो श्रावणच वेडा
श्रावणाचा.

- रमेश ठोंबरे  
Ramesh Thombre 

Nov 10, 2011

सोडून द्या त्या कसाबला

सोडून द्या त्या कसाबला
तो अजून अंजान, निरागस आहे.
अजाणतेपणी गोळ्या सुटल्या त्याच्या पिस्तुलातून,
हा काय त्याचा अपराध आहे ?
समोर आलात तुम्हीच निधड्या छ्यातीने
आणि शिकार झालात त्या..
निष्पाप बंदुकीच्या गोळ्यांचे.
आज त्याच निरागस हास्य,
तुम्हाला छद्मी वाटत.
अन त्याचे ते अश्रू म्हणजे
पश्याताप वाटतो तुम्हाला ?
...
पश्याताप कशाचा करायचा त्यानं ?
गोळ्यांसमोर आलेल्या अन शहीद झालेल्या सैनिकांचा...
की त्याला शिकवल्या गेलेल्या जिहादचा ?

आत्ताच तर कुठे तो अक्षर गिरवतोय ... त्याच्या धर्माचं.
दहशतवाद त्याचा धर्म आहे,
तो त्याचा धर्म पळतोय.
तुम्ही तुमचा धर्म पाळा.
...............विसरलात काय .....?
खुर्ची तुमचं मर्म अन
राजकारण तुमचा धर्म आहे.
...
जनतेचा विचार कसला करताय ?
जनतेला तर विस्मृतीचा शाप आहे.
अन इतिहास जमा गोष्टींवर
बोलणं सुद्धा इथ पाप आहे !
म्हणून तर ...
उद्या, २६ /११ म्हणजे फक्त एक तारिक असेल,
अन कसाब तर कुणाच्या ध्यानात हि नसेल.
...
सोडून द्या त्या कसाबला,
तुमच्या साठी ते नवीन नाही.
सोडा जरूर सोडा ...
पण सोडताना जनतेला तुमच्यात धरू नका
अन तुमच्या पळपुटेपणासाठी
गांधीवादाला बदनाम करू नका !


- रमेश ठोंबरे (Ramesh Thombre)
दि. २२ जून २००९

परिवर्तन

या दुनियेत चालते पाकिटमारी
कधी चोरी कधी शिरजोरी
भिका-यापासुन शिका-यापर्यंत,
साधू पासून पुढा-यापर्यंत
इथे प्रत्येकजण चोर आहे.
जो तो दुस-याला चोर समजतो,
सांगतो मीच तेवढा थोर आहे.

कधी अंधारात कधी उजेडात...
प्रत्येकजण गुन्हा करतो.
पश्चाताप काय ते माहित नाही,
म्हणुन तेच काम पुन्हा करतो.

आज दुनियेत राम नाही
असं म्हणणारे रावण आम्ही...
जाणुन बुजुन आंधळे का होतो?
काठीवरुन चालणा-या आंधळ्यानं..
आधाराचा हात मागितल्यावर
आम्ही स्वतः पांगळे का होतो..?

'हे कुठे तरी थांबलं पाहिजे'
असं म्हणल्यानं थांबणार नाही,
आपण स्वतः बदलल्याशिवात,
दुनियेत परिवर्तन होणार नाही.

- रमेश ठोंबरे.
Ramesh Thombre

५) प्रियेचे श्लोक

 

तिला पाहिले रे सकाळी सकाळी,
'दिला' जाळले रे सकाळी सकाळी |
तिच्या लोचनांनी मला भाळले रे
तिने टाळले रे सकाळी सकाळी || २५ ||


तिच्या दर्शनाने असा धन्य झालो,
तिचा भक्त झालो सकाळी सकाळी |
असा गुंतताना तिच्या भावरंगी,
जगी मुक्त झालो सकाळी सकाळी || २६ ||
 

तिचे केस ओले असा फास झाले,
अदांनीच मेलो सकाळी सकाळी |
तिला पाहताना, तिने पाहिले अन,
उगा चोर झालो सकाळी सकाळी || २७ ||


- रमेश ठोंबरे 
(Ramesh Thombre)



Nov 9, 2011

पावसात मी उभा




पावसात मी उभा
वाट तुझी पाहतो
घडयाळ मागे लावतो
आठवणीचं

ओलावलेले पक्षी
भान विसरून जातात
प्रीत गाणं गातात
संगतीनं

झाड वेली सारे
शांत उभे असतात
पुरस्कर्तेच दिसतात
शांततेचे.

चिवचिव चिमण्यांची
फडफडतो पक्षी
रेखित ओली नक्षी
अंगावरी.

मागे मागे जातं
माज़ वेड मन
मागचा तो क्षण
अठवित.

निसर्गच साथी
तू नसताना
चिंब भिजताना
पावसात.

- रमेश ठोंबरे
Ramesh Thombre 

लव्ह-गेम



त्याची आणि तिची

भेट पहली झाली,
दोन मनांच्या मिलनांची
साक्ष नयनानी दिली.

भेटीने - भेट वाढल्यावर
अंतर कमी झाले,
श्वास एक झाल्यावर
हात गळ्यात गेले.

चोरून लपून भेटताना
सावध असणे बरे,
ओठावर ओठ ठेवून
म्हणे गप्प राहणे खरे.

बोलुन तिच्या पुढं
प्रेमाची गोड़ बोली,
चाल असी त्याची
नेहमी सफल झाली.

आता तिला हवं होतं,
फक्त त्याच प्रेम.
अणि त्याला हवा होता,
एक नवा लव्ह-गेम.

एकदा मोका पाहून,
त्यानं गळ टाकला.
मीठित तनु देताना
तिचा अंदाज़ चुकला.

कोमल नव तनुवर 
त्याने जोर दावला,
दोन घडीचा लव्ह-गेम
तिला पुरता भोवला.

- रमेश ठोंबरे  
Ramesh Thombre 

Nov 8, 2011

गुगल गुगल गुगललं ........

गुगल गुगल गुगललं पण कुठेच नाही सापडलं
कळत नाही आज हे असं कस घडलं ?
हे सोबत असताना मला कसलीच चिंता नसते
नागमोडी वाट सुद्धा तेंव्हा मला सरळ दिसते.
याच्याच भरोश्यावर माझे हात चालत असतात,
कधी त्याच्याशी कधी तिच्याशी आतलं आतलं बोलत असतात.
हे नेहमी दिवस रात्र फक्त माझ्याच सोबत असतं
माझ्या खांद्याला-खांदा लाऊन Online राबत असतं.
याची एनर्जी भन्नाट असते ...
याच्या उत्साहात नेहमीच दिसते.
याचा वेग अफाट आहे, माझ्या पुढं धावत असतं,
याचं गणित सुसाट आहे, आकडे मोड लावत असतं.
कधी मला सोडत नाही ...
माझं म्हणणं खोडत नाही.
आज मात्र खट्टू झालंय ...
का कुणावर लट्टू झालंय ..?
मला कुटच दिसत नाही,
अन ओळखीचं हसत नाही.
आता माझं होणार कसं ..., याचा विचार मीच करतो,
आता माझं होणार हसं ..., याचा प्रचार मीच करतो.
आठवत नाही ... झालं कसं ...?
हे हरउन .. गेलं कसं ...!
काल पर्यंत सोबत होतं ... माझ्यासाठी राबत होतं ...
आज तिकडं गेलंय खरं ... अन तिचंच झालंय खरं !

- रमेश ठोंबरे 
Ramesh Thombre 

बायको म्हणजे .....

बायको म्हणजे
नुसती कायली
थंडीचा वणवा करणारी
बायको म्हणजे
पावलोपावली
नवर्याला वेठीस धरणारी

बायको म्हणजे
सांता-बंता
हसण्यासाठी चोरीचा
बायको म्हणजे
अवघड गुंता
फसण्यासाठी दोरीचा

बायको म्हणजे
भलती केस
आशेवर झुलवणारी
बायको म्हणजे
बोटाला ठेस
विसरलं दु:ख खुलवंणारी

बायको म्हणजे
राजकारण
पंचवार्षीक खेळण्यासाठी
बायको म्हणजे
जाच-कारण
घरी लवकर जाण्यासाठी

बायको म्हणजे
चढा ओढ
नकोनकोशी वाटणारी
बायको म्हणजे
कुत्तर ओढ
अस्तित्वाला चोपणारी

बायको म्हणजे
काळा मेघ
सगळीकडे कोसळणारा
बायको म्हणजे
अनियन्त्रिक वेग
चालता चालता ढासळणारा

- रमेश ठोंबरे
Ramesh Thombre


१) सर्वप्रथम तुषाराम महाराजांची माफी मागून ....
२) माझ्या सह सर्वांच्या सर्व बायकांची माफी मागून हि गुस्ताखी केली आहे .....

सावधानतेचे ७ इशारे :

१) कवितेतील मतांशी स्वतः कवी हि सहमत नाही ......
२) कवितेतील मजकूर आपल्या जीवनात हानी पोहोचउ शकतो तेंव्हा सावधान.
३) कविता scrap करताना कवीचे नाव टाळावे हि विनंती.
४) scrap चुकून बायकोने वाचल्यास होणाऱ्या परिणामांची जवाबदारी पूर्णतः आपली .... म्हणजे तुमची.
५) उद्या मलाच scrap करू नका म्हणजे मिळवली.
६) विवाहित पुरुश्यानी इकडे न फिरकलेलच योग्य.
७) फक्त हसण्यावर न्या हसं करून घेऊ नका.

Nov 7, 2011

सांडू शेटचा फोन आलाय ....S S

मुंबई मधल्या एका चाळीत,
राहत असतो सांडू शेट.
चाळीमधूनच हलवत असतो,
सगळे सगळे धंदे थेट.
सांडूशेटचा धाक मोठा,
गल्लोगल्ली पेरला आहे.
सांडूशेटच्या धाका पुढं,
दिल्लीचा राजा हरला आहे.
सांडूशेटचे पंटर सारे ...
गल्लोगली हिंडत असतात.
जगण्याच्याच हप्त्यासाठी
ज्याला त्याला भांडत असतात ...

सांडू शेटचा फोन आलाय ....S S
एक नवी धडकी असते ....
अक्खा दिवस गल्ल्यांमध्ये
हप्त्यानंतर कडकी असते.
सांडू शेठ मुंबई मध्ये,
कुठल्या गल्लीत राहत असतो.
सांडू शेट मुंबई मधून,
सगळं कसं पाहत असतो ?
ज्याला त्याला प्रश्न असतो,
शेट कसा दिसत असेल ...?
एवढा हप्ता पाहून मग ...
शेट कसा हसत असेल ?

हप्त्यासाठी दर दिवशी ...
जो तो चिंता करत असतो.
सांडू शेट दिवसेन दिवस
वाढता गुंता ठरत असतो.

...
एक दिवस सकाळीच
हप्त्यावाला सुन्न झाला.
हप्ता मागणारा त्याचा आवाज
आज अगदीच खाली गेला.
आजचा हप्ता सांडूशेटच्या,
चिते साठी जाणार आहे.
सांडू शेटच्या अंत्यविधीस
सांगा कोण कोण येणार आहे.

सगळी सगळी दहशत सोडून,
सांडू शेट गेला होता ...
हप्ते वसुली साम्राज्याचा,
अखेर अंत झाला होता.
...
ज्याला त्याला उत्सुकता
आता तरी शेट दिसेल ...
एवढ्या पैश्यात मरणारा
शेट साला कसा असेल ?
सांडू शेटच्या अंत्ययात्रेस
भली मोठी रांग होती
पांढर्या कपड्या बाहेर दिसते
फक्त त्याची टांग होती.
शेवटपर्यंत दिसला नाही,
सांडू शेट होता झाकलेला.
मेलेल्या शेट समोर ...
पुन्हा जो तो वाकलेला.

शेवटी शेटला आग देऊन
सारेच मग निघून गेले ...
न दिसलेलं त्याचं रूप,
त्याच्या भीतीत पाहून गेले.
सांडू शेट गेल्यावर,
आता हप्ता बंद होणार .
जो तो आता म्हणे आपल्याच
जगण्यात धुंद होणार.
..
पण दुसर्याच दिवशी हप्तेवाला
आमच्या दारात उभा झालाय ...
म्हणे ... बघताय काय ...
छोट्या सांडूशेटचा फोन आलाय.

.
.
- रमेश ठोंबरे
Ramesh Thombre 

Nov 6, 2011

माझं साजरं शिवार !



दिस डोयीवर आला,
सारं उजाड उजाड.
पान गळली सगळी,
उभं बोडकंच झाड.

काळ्या काळ्या रानामंदी,
चाले नांगराचा फाळ.
उन तापलं तापलं,
माय सोसतिया झळ.

झाली मशागत आता,
काम पाऊस करील.
त्याचं आगमन होता,
मुठ धान्याची सोडील.

बीज रुजता पोटात,
कूस उजवेल तिची.
कोंभ हिरवा कोवळा,
ओटी सजवेल तिची.

भल्या थोरल्या झाडाची,
भली थोरली सावली.
साऱ्या वावराची चिंता,
येड्या आईला वाहिली.

मोठ बोले कुई कुई,
पाणी वाहे झुळू झुळू.
सोन्या-गुण्याचा संगती,
आलं हाता मंदी बळ.

पाणी पाटामंदी जातं,
त्याची ओळखीची वाट.
पाट जिवलग त्यांचा,
आता सालभर भेट.

पाणी मिळता पिकाले,
गेलं तर्रारून रोप.
आलं वयात शिवार,
कुठं डोळ्या मंदी झोप !

आलं फुल्लारून पिक,
पिक माणिक माणिक.
डोले फुगवून छाती,
दाणा भरलं कणीस.

काळ्या काळ्या धरतीच,
झालं हिरवं वावर.
आलं झोकात फुलून,
माझं साजरं शिवार !


- रमेश ठोंबरे (Ramesh Thombre)

Nov 5, 2011

१) || ससा आणि कासव ||




एक शुभ्र ससा छान | उंचाउनी दोन्ही कान |
गर्वे करी गुणगान | चपळतेचे || १ ||

म्हणे वेग माझा फार | वात होई चूर-चूर |
असता मी भले दूर | पुन्हा इथे || २ ||

कासवाचे करी हसे | म्हणे चाले बघा कसे |
याला ध्येय कसे दिसे | आळ्श्याला || ३ ||

जाया निघे बारश्याला | काळ उलटुनी गेला |
पोचे मग लगनाला | कसा तरी || ४ ||

करू म्हणे थोडी मौज | त्याने लावियली पैज
कासवास जिंकू आज | शर्यतीत || ५ ||

कोण जाई म्हणे वेगे | डोंगराच्या पाठी मागे
त्याचे मग नाव लागे | जिंकण्याला || ६ ||

कासवही धन्य धन्य | पैज त्याने केली मान्य |
करू म्हणे आज शून्य | गर्व याचा || ७ ||

रोज आहे उड्या घेत | वर तो वाकुल्या देत |
करू याचे नेत्र श्वेत | एकदाचे || ८ ||

पैज ठरे, दिस ठरे | संगतीला सखे खरे |
कोण जिंके कोण हारे | दिसे आता || ९ ||

पैज झाली आता सुरु | ससा लागे मार्ग धरू
कासव हि तुरु तुरु | चालू लागे || १० ||

दूर दूर गेला ससा | झाला आता दिसेनासा |
उमटेल कसा ठसा | कासवाचा ? || ११ ||

ससा गेला वेगे दूर | जसा भरला काहूर |
त्याला सापडला सूर | जिंकण्याचा. || १२ ||

ससा पाहे आता मागे | कुठे कासवाचे धागे |
त्याला वेळ किती लागे | गाठण्याला || १३ ||

कासव ते दूर म्हणे | कधी व्हावे इथे येणे |
तोवर ते शांत होणे | गैर नाही || १४ ||

ससा झाला कि निश्चिंत | त्याची मिटलीच भ्रांत
विसावला थोडा शांत | तरू तळी || १५ ||

वनी देखिले गाजर | क्षुधाग्णी तो पेटे फार |
कंद ते घेऊन चार | भक्षीतसे || १६ ||

कोवळे ते खाता कंद | हालचाल होई मंद |
नयनहि होती धुंद | व्याकुळले || १७ ||

प्राशी नीर ते शीतल | मग डळमळे चाल |
नयनी निद्रेचा ताल | घुमू लागे || १८ || 
 
निद्रे झाला अर्धमेला | सुख स्वप्नी तो रंगला |
वाटे जसा स्वर्गी गेला | आपसूक || १९ ||

पुढे कासव ते चाले | त्याची एकलीच चाल |
त्याचा एकलाच ताल | योजिलेला || २० ||

नाही थांबले ते कुठे | जरी कोणी मित्र भेटे |
न ही जिद्द त्याची सुटे | चालण्याची || २१ ||

चाले संथ गती तरी | त्याची साधना ती खरी
आणि खात्री मनी धरी | जिंकण्याची || २२ ||

चाले असे लगबगे | पाठी घेउनिया ओझे |
ध्येय गाठण्यास चोजे | शर्यतीचे || २३ ||

त्याने सोडीयेले मागे | बघा आळसाचे धागे |
पुन्हा पुढे चालू लागे | लक्ष्याकडे || २४ ||

पहिला तो ससा त्याने | झोपलेला तरू तळी |
झोप उतरली गळी | सारी सारी || २५ ||

कासवाने केली शर्त | म्हणे नडलाची धूर्त |
श्रम नाही गेले व्यर्थ | धावण्याचे || २६ ||

मग पुन्हा घेई वेग | मागे मागे धावे मेघ |
नाही आली प्राण्या जाग | झोपलेला || २७ ||

लक्षभेद कासवाचा | पोहचला शेवटला
तेंव्हा वेग मंदावला | विसाव्याला || २८ ||

दिस ढळे जाग येई | आता काही खैर नाही |
ससा मागे पुढे पाही | कासवाला || २९ ||

शोधीयेले काटे कुटे | कासव न दिसे कुठे |
आता मनी भीती वाटे | हरण्याची || ३० ||

लागे मग पुन्हा पळू | आणि पुन्हा मागे वळू
आता कशी हर टाळू | दिसणारी || ३१ ||

एक तो प्रहर झाला | डोंगराच्या मागे आला |
पाहून तो घाबरला | कासवाला || ३२ ||

कासव ते हसे गाली | कशी तुझी गती गेली
म्हणे फजितीच झाली | वेगा ची हो || ३३ ||

करू नको गर्व म्हणे | कष्टा विन सर्व सुने |
आळसाचे तुझे जिने | नडले रे || ३४ ||

ससा म्हणे चूक झाली | उगी तुझी थट्टा केली
जागा मला दाखविली | तूच लेका || ३५ ||

रमा म्हणे गर्व नको | करता हे काम मोठे
भोगीयले त्याचे तोटे | ससोबाने || ३६ ||

- रमेश ठोंबरे
अभंग गोष्टी (अधारित) 

बाटली

दारुड्याला जवळची वाटली,
नास्तिकाच्या स्पर्शाने बाटली.
हातात पडता पेल्या पेल्यात वाटली,
जीवन नच ही दारूची बाटली.

या बाटलीचा महिमा थोर,
हिजपुढे नसे कोणताही विचार.
खिशात येता पैसे चार,
ठोठवावे मदिरालयाचे दार.

घोट पहिला उतरता गळी,
आग होतसे जळी - तळी.
घोटा मागून संपता पेला,
खुलून येई कळी-कळी.

नशा चढता मस्तकी,
मातीत जाये मती.
आधीच असे फाटका,
त्यावर फिटून पडे धोती.

नाचतसे थय-थय डोळ्यापुढे
होता रिकामी बाटली.
दारुड्याला ती ही बिचारी,
बघा नशेखोर वाटली.

बाटलीही थोर आहे,
दारुडाही थोर आहे.
उगी एक-दुसर्यास समजती
समोरचा चोर आहे.

- रमेश ठोंबरे
दि. ७/५/९६

Nov 4, 2011

माझी बायको तुझा नवरा ....!

माझी बायको तुझा नवरा ....!
असंच काही तरी चालू असतं
टी.व्ही.वरच्या 'डेली सोप' मध्ये
हे असलं सुद्धा सौज्वळ दिसतं.

पूर्व जन्माची प्रेयसी येथे
लग्नानंतर अवतरत असते.
अन तो वाद मिटवता मिटवता
अक्खी पुरुष जात हरत असते.

कधी कधी वावरत असतात इथे
एका बायकोचे दोन नवरे.
कधी कधी बनत असतात
सगळेच भिरभिरणारे भवरे.

तासन तास बायका बघत बसतात
आपल्याच घरात त्यांचे झगडे.
इतक्या श्रीमंती थाटात सुद्धा
अर्धे निर्धे शरीर उघडे.

इथल्या नवऱ्याना सुद्धा असतात
नेहमीच दोन-दोन सुंदर बायका.
इथे नायक कमीच पण ...
मिरवत असतात शंभर नायका

इथली आई सुद्धा 'संतूर' मधली
एवरग्रीन जवान दिसते.
तिची मुलगी म्हणजे तिच्यापेक्षा
एक वर्षाने लहान असते.

डेली सोप चा कारखाना रोज
घर घरात दिसत आहे.
पाहणारा मात्र निराश होऊन
आपल्याच नशिबावर हसत आहे.

- रमेश ठोंबरे 
Ramesh Thombre 

सावधान येथे कवी राहतो आहे !

थोडे जपून, थोडे सावरून ...
थोडे सावध पाऊल ठेवा.
थोडे शांत, निवांत ...
दुरूनच .... कानोसा घ्यावा.
खरच तो तुचीच वाट पाहतो आहे ,
सावधान येथे कवी राहतो आहे !

कालपासून अस्वस्थ आहे,
हजार फेऱ्या झाल्या.
श्रोंता कुणी मिळेना ...
कित्तेक कविता व्याल्या.
तुमच्यासाठीच हि वेदना साहतो आहे,
सावधान येथे कवी राहतो आहे !

काल भेटला एक प्रेमी
त्याच्या पुढे सर्व कविता वाचल्या,
तोही अगदी शांत होता
जश्या सर्वच त्याला कळत होत्या.
एक फ्यान मिळाला म्हणून आनंदे नाहतो आहे,
सावधान येथे कवी राहतो आहे !

एक भेटला ठार बहिरा
कानाचा करून पोहरा
दिवस भर सोसत होता....
डोळ्यांचे सुद्धा करून कान
सर्व कविता ऐकत होता.
बहिर्याचे हि भरून कान शब्द फुले वाहतो आहे,
सावधान येथे कवी राहतो आहे !

या असे इकडून या ...
घाबरू नका,
फार काही घेणार नाही ...
जास्त कष्ट देणार नाही ...,
आज तुमचीच वाट पाहतो आहे
सावधान येथे कवी राहतो आहे !

- रमेश ठोंबरे 
Ramesh Thombre 

Nov 3, 2011

|| आळस महात्म्य ||


आळस महात्म्य, सांगतो तुम्हासी |
जवळीक खासी, वाढवावी || १ ||

आळस आळस, वाढवावा नित्य |
हेच एक कृत्य, आवडसी || २ ||

आळसाने केले, जगणे काबीज |
गळ्यात ताबीज, मिरवतो || ३ ||

आळस मला रे, प्राणाहून प्रिय |
मिळविण ध्येय, योजिलेले || ४ ||

उठतो मी रोज, दुपार प्रहरी |
दिसे मग हरी, पेंगलेला || ५ ||

आळसासाठी मी, राबतोय रोज |
आळसाचे व्याज, मिळवीन्या || ६ ||

वाढवा जीवन, वाढवा आळस |
वाढवा कळस, आळसाचा || ७ ||

द्यावी रे ताणून, सकाळी दुपारी |
संधी पुन्हा भारी, रात्री आहे || ८ ||

आळसासाठी हो, करू नका काही
प्रसन्न तो होई, आपसूक || ९ ||

सांगतो रमेश, नको रे आळस,
लावण्या तुळस, आळसाची || १० ||

- रमेश ठोंबरे 
Ramesh Thombre 

|| वसंत ||



झडूनिया गेली
पिवळी ती पानं
हिरवे हे रान
झाले आज ||

मन माझे वेडे
भरुनीया आले
आभाळ ते झाले
काळे भोर ||

मन असे ओले
हिरवे हि झाले
विसरून गेले
रितेपण ||

पुन्हा पुन्हा येतो
गहिवर फार
आठवांचा ज्वर
साहवेना ||

तुझ्या सवे जो मी
वसंत पहिला
तोची आठवला
आज पुन्हा ||



मुळ हिंदी कवी - जावेद अख्तर
अभंगानुवाद - रमेश ठोंबरे

जंगलच कविसंमेलन





जंगलात एकदा कविसंमेलन झालं
उंटाला त्याचा अध्यक्ष केलं.
कवी संमेलनाला कवीच फार,
रसिकांची होती मारा-मार.
एकदाचे संमेलन सुरु झाले

निवेदकांनी निवेदन केले.
निवेदन आता संपल्यावर..
गाढवाला मिळाला पहिला मान.
संधी मिळताच वही उघडून,
गाढवाने लांब मारली तान.
नंतर नंबर आला उंदराचा,
त्यानं कानोसा घेउन मांजराचा...
रसिकांना सांगितलं थोडंसं हसा,
रसिक म्हणाले, 'तुम्ही आधी टेबलावर बसा.'
नंतर उंदीर टेबलावर आला, 
अन मांजर दिसताच पळून गेला.
नंतर आली वाघाची मावशी,
ती तर निघाली फारच हौशी.
एकामागून एक, तिनं कविता म्हणल्या चार,
तेव्हा संयोजक लांडगे, वैतागून म्हणाले,
"बाकीच्यांचा हि करा विचार.
मांजर मग फार रागावली...
अपमानान गुरगुरत निघून गेली.
आत्ता फुलउन सुंदर पिसारा..,
व्यासपीठावर आला मोर.
कवितेसोबत नृत्य करून त्यानं ...
श्रोत्यांना केलं डबल बोर.
नाव न पुकारताच आला जंगलचा राजा,
पाहून हत्तीनं वाजवला बाजा.
मग उंदीर थोडा सावध झाला.
ससा तर जंगलात पळून गेला.
सिह रागात म्हणाला, येवढं मोठं संमेलन झालं,
तरी लबाड लांडग्यान, मला आमंत्रण नाही दिलं.
आता उडी घेतली सिंहांन डरकाळी फोडून,
आणि खाली आला सरळ व्यासपीट मोडून.
सिंहांन कविता म्हणली टेबलाजवळ जावूंन
अन निकाल न ऐकताच गेला पुरस्कार घेवूंन.

- रमेश ठोंबरे 
Ramesh Thombre 

नास्तिक


आपल्या प्रेमगोष्टी सुरु असतानाच ..
पावसाने धडाका लावला....!
तू लगेच निघालीस ...
उद्या परत भेटण्यासाठी .
'चल भेटू उद्या परत ५ वाजता इथेच
महादेवाच्या मंदिरात'.
तू म्हणालीस आणि माझं उत्तर एकायच्या आता...
निघालीस देखील...
तुला माझं उत्तर माहित होतं.
रोजच भेटतो आपण...या इथेच मंदिरात.
खरच मी आता इथे आलो कि आता ...
आस्तिक झाल्या सारखा वाटत ...
भेटीची ओढच असते तशी ...
तुझ्या भेटीची काय ... अन त्याच्या भेटीची काय ?
..
...
....
चार वाजले ...
आणि ठरल्या प्रमाणे
माझे पाय अपोआप मंदिराकडे वळले ....
तुझी वाट पाहत पायरीवर बसून होतो.
दूरवर तुला शोधात होतो ...
गाभार्यातील देव हरवल्यासारखा ...!
....
पाच वाजले ...
पाऊस सुरु झाला .... (आला)
तू नाहीस आली ..!
...
...
सहा वाजले ..
सात वाजले ..
पाऊस आणखीच जोमाने कोसळू लागला ...
मी आडोश्याला उभा, तुझी वाट पाहत... !
..
...
आठ वाजले ..
नऊ वाजले ..
मी पाय आपटत ... मंदिर सोडले ...
पाऊस आणखीही थांबला नव्हता ...
तो जास्तच पेटला होतां.
..
...
सकाळी समजलं ...
मी आणखीही नास्तिकच होतो ....
आणि तो पाऊस ....
तू येणार म्हणून ... रात्रभर ठाण मांडून बसला होतां,
तू यावीस म्हणून त्यानं ...देवाला पाण्यात ठेवलं होतं !

- रमेश ठोंबरे 
(Ramesh Thombre) 

मराठी कवितेचा / साहित्याचा दर्जा घसरतोय !



आज मराठी मध्ये कितीतरी मोठ्या प्रमाणात कविता लिहिली जाते आहे, इतक्या संख्येने मराठी मध्ये या पूर्वी कविता लिहिली गेली असेल असे वाटत नाही. त्याच वेळी दर्जेदार कविता मात्र लिहिली जात नाही असे जाणवते आहे. कायम मनावर कोरल्या जातील अश्या फारच कविता आज वाचनात येतात. पूर्वीच्या काळी छपाई माध्यमे नसतानाही त्या काळच्या अनेक रचना आज जिवंत आहेत ... पुन्नरर्जीवीत होत
आहेत. मग नवीन लेखन तितक्याच ताकतीने का समोर येताना दिसत नाही ? का आपण सर्वचजन गुणवत्तेपेक्षा संखेच्या मागे लागलो आहोत ? आपल्याला गुणवत्तेच नोबेल हव आहे कि संख्येच !
इंग्लिश कथा / कविता लोक रांगा लाऊन विकत घेतात आणि आपल्याकडे मराठी कवितेला प्रकाशक सुद्धा कुठल्याच रांगेत उभं करत नाही .... हा काय त्याचा दोष आहे ? हा आपल्या लेखनाचा दोष नाही का ...? हा आपल्या लेखनाचा दर्जा नाही का ? मराठी कवी / लेखक स्वतःच्या खर्चाने पुस्तक छापतो ... स्वताच्या खर्चाने मोफत वाटप करतो तरीहि त्याची पुस्तकं वाचली जात नाहीत... त्याची कविता, त्याचं गाणं इतर ठिकाणी वाचनात / एकण्यात येत नाही ! हा काय वाचकांचा दोष आहे ? तुम्ही मुक्त छंदाच्या नावाखाली धडे लिहिणार .... छंदाच्या नवाखाली यमकांशी खेळणार ... आणि वृत्तबद्धतेच्या नावाखाली शब्द जोडणार असाल तर तुमच्या / आमच्या भावना वाचकानपर्यंत कशा पोचणार ? आणि वाचक त्यांना काय म्हणून वाचणार ?

प्रश्न बरेच आहेत .... उत्तर फक्त एकच ... दर्जा सुधारला गेला पाहिजे

माझा एक समीक्षक मित्र आहे तो मागे खूप दिवसांपूर्वी ओर्कुट वाचक म्हणून होता ... वाचनाची आवड असल्याने तो वाचनात आलेल्या कवितेवर लिहू लागला.... त्याला कवितेची जाण होती त्यामुळे त्याला आजच्या कवितेतील बर्यचा गोष्टी खटकत होत्या ... त्या तो नमूद करत होता ... त्याला आवडणाऱ्या / नआवडणार्य रचनांबद्दल तो लिहित असे .... अर्थात जास्त रचना या नआवडणाऱ्या ... काव्य नसणाऱ्या असत. याच समीक्षक मित्राशी चर्चा करताना एक मुद्धा समोर आला .. कि आज 'ब' दर्जाची कविताच जास्तीत जास्त लिहिली जाते ...(तो : 'ब' दर्जाचे कवी जास्त आहेत असे बोलला होता) ('अ' दर्जा म्हणजे आतून आलेली original कविता आणि 'ब' दर्जाची कविता म्हणजे प्रेरित होऊन, विषयावरून, शब्दावरून ... मागणीवरून लिहिलेली कविता असे त्याचे मत.) काहीतरी लिहायचं म्हणून कविता लिहिली जाते ... ती आतून आलेली नसते .... त्या कवितेत अर्थ नसतो ... अर्थ असला तर त्या अर्थाला काव्याच्या शेडस नसतात वगेरे वगेरे.
आज हा मित्र ओर्कुट किंवा थोपू वर वाचत नाही / लिहित नाही कारण त्याचा अपेक्षाभंग होतो ... दर्जा सुधारत नाही ... दाखवलेल्या उणीवा सुधारणे तर दूरच पण लोकांना ते रुचतहि नाही ... आणि दर्जाहीन लेखनाला छान म्हणणे याला पटत नाही !

तुम्ही काय करता ...? वाचनात आलेल्या आणि नआवडलेल्या रचनेला छान म्हणता ..../ आवडली नाही म्हणून सांगता / उणीवा दाखवता / कि तटस्थ राहता ..... ?
तुमची प्रतिक्रिया काहीहि असो ... ती प्रामाणिक असली पाहिजे... उणीवा असतील तर त्या दाखवल्या पाहिजेत. मराठी कवितेचा दर्जा वाढवण्यासाठी आपल्यातील वाचकांना आणि साहित्यिकांना समीक्षक मित्रांची भूमिका कठोरतेने पार पडावी लागणार आहे, आणि लेखक / कवी मित्रांना आपल्या कवितेवरील प्रतिक्रियेचा विचार कवितेचा दर्जा सुधारण्यासाठी करावा लागणार आहे !

यावर अनेक लोकांची अनेक मते असतील ...
कोणी म्हणेल "कोण म्हणतो कवितेचा दर्जा घसरलेला आहे ?"
कोणी म्हणेल "मी वाचकांसाठी कविता लिहितो ती त्यांना आवडते"
कोणी म्हणेल "मी माझ्यासाठी कविता लिहितो .... मला त्याचे काय ?"
"मी आतून आल्याशिवाय कविता लिहित नाही ..."
"मी ठरवून कविता लिहितो ... हव्या त्या विषयावर लिहू शकतो "

अनेक प्रश्न आहेत .... उत्तर कदाचित मिळणार नाहीत ... पण प्रयत्न जरुर करूयात ...
बोला तुम्हाला काय वाटते .....?
कशी आहे आणि कशी असावी मराठी कविता ?
चर्चेत सहभागी व्हा !

- रमेश ठोंबरे (Ramesh Thombre)

३) ~ विठ्ठला ~


पांगले का विश्व सारे, सांग बा रे विठ्ठला,
सावरावे या मनाने, आज का रे विठ्ठला.


जिंकलेले खेळ सारे, आज आहे हारलो,
मागतो का सांग मी रे, चांद तारे विठ्ठला.


पाहिले मी आज काही, जे न होते पाहिले,
हे बरे की अंध होतो, तेधवा रे विठ्ठला.


काय केले काम त्यांनी, भाषणेची ठोकली
नाम नाही श्रीहरीचे, फक्त नारे विठ्ठला.


राम नाही देखिला मी, भांडतो त्याला जरी,
देव तोची आज हृदयी, थाटला रे विठ्ठला.

- रमेश ठोंबरे 
Ramesh Thombre 

Nov 2, 2011

आज आस व्हायलाच हवं

उंदरांन राजा आज व्हायलाच हवं
सिहाने जाळ तोडून जायलाच हवं
वाघाचं पोट दुखत तेव्हा
मावशीन त्याच्या यायलाच हवं
खर्- खर् आज आस व्हायलाच हवं ||१||

शेळीन शहान आता व्हायलाच हवं
कोल्ह्यांन विहिरीत रायलाच हवं
कासवान मध्ये काही खायलाच हवं
सस्याने डोंगरावर आधी जायलाच हवं
खर्- खर् आज आस व्हायलाच हवं ||२||

सस्याच्या डोक्याला हत्तीचे कान
सिंहाला यावी जिराफाची मान.
लांडग्याने मोडलेलं शेळीच लग्न
लग्न आज ते व्हायलाच हवं
खर्- खर् आज आस व्हायलाच हवं ||३||

सगळीकडे असावीत छान - छान मुलं.
चड्डी घालून सगळी फूलावीत फुलं.
कामळान फुल छोटं द्यायलाच हवं,
मोगऱ्याच फुल रंगीत व्हायलाच हवं
खर्- खर् आज आस व्हायलाच हवं ||४||

मोराने बासरीवर डुलायला हवं
सापांन पिसा-यात झुलायला हवं
कोकीळेन गोड - गोड बोलायला हवं,
रातराणीन दिवसाची फुलायला हवं,
खर्- खर् आज आस व्हायलाच हवं ||५||

पुढच शतक आज यायलाच हवं
उद्याच चित्र आज दिसायलाच हवं
सगळीकड दिसतील डोंगर ओके - बोके
उजाड - माळांची उघडी- उघडी डोके
निसर्गाचं गीत आज गायलाच हवं
एक तरी झाड त्याला द्यायलाच हवं
खर्- खर् आज आस व्हायलाच हवं ||६||

- रमेश ठोंबरे(Ramesh Thombre)

Nov 1, 2011

~ का उगी हा पेटतो मी ~


का उगी हा पेटतो मी
सावळ्याला भेटतो मी


या जगाची रीत न्यारी
साहताना फाटतो मी


वीट त्याने साठविली
वाळवंटी दाटतो मी


पाहिली ती माणसेही
वेगळाची वाटतो मी


देव जेथे खेटलेला
का तिथेची बाटतो मी ?


भाव भक्ती जोडताना
का दुकाने थाटतो मी ?

- रमेश ठोंबरे

वाचकांचा पत्रव्यवहार

"वाचकांचा पत्रव्यवहार" .... असे प्रकार बर्याच वर्तमानपत्रातून चालत असतात ... त्यातून बरेच समाजउपयोगी कार्यहि घडत असते, त्या संदर्भातील एक गोष्ट. सध्या आपण पाहतो, बस स्टोप वर (मुख्य स्थानकावर) बस लागते तेंव्हा प्रवाश्यानकडे तोंड करून उभी राहते आणि निघताना उलट्या पाऊली निघून जाते याने एक सोय होते, बस प्रवाशांकडे तोंड करून उभी असल्याने ... बसची पाटी लगेच वाचता येते... तुम्ही म्हणाल यात काय नवे...? असेच हवे ! हो अगदी बरोबर असेच हवे ... पण तुम्हाला आठवत असेल ... पूर्वी गाड्या उलट्या पद्धतीने उभ्या राहायच्या मागचा भाग प्रवाश्यांकडे करून. मग प्रत्येक गाडी आली कि प्रवाशी समोर जाऊन गाडीची पाटी वाचायचे आणि परत जाग्यावर येऊन बसायचे. तेंव्हा हेच योग्य वाटायचे, बरीच वर्ष हे असेच सुरु होते.
साधी गोष्ट होती पण कुणाला खटकली नाही ... असाच पत्रव्यवहार झाला वर्तमानपत्रातून ... "बस सध्या ज्या पद्धतीने उभ्या राहतात ती पद्धत चुकीची आहे .... त्या प्रवाश्यांकडे तोंड करून उभ्या राहिल्या तर अधिक फायदे होतील" या पत्रात त्या वेळच्या पद्धतीचे तोटे आणि नवीन पद्धतीचे फायदे दिले होते. एस.टी. मंडळाला ती सूचना योग्य वाटली आणि सुधारणा झाली. गोष्ट छोटी आहे पण हा छोटा विचार डोक्यात यायला बरेच वर्ष लागली. तेंव्हा बस अश्या पद्धतीने उभी राहत होती हे आज आपण विसरून हि गेलो आहोत.
कोणी केली होता हा पत्रव्यवहार माहित आहे .....?

-रमेश ठोंबरे (Ramesh Thombre)
(इकडचे - तिकडचे)

१) ~ सावळा हा देव माझा ~


चंद्रभागी भेटणारा, सावळा हा देव माझा
कीर्तनाला नाचणारा, सावळा हा देव माझा.


भेट त्याची आज व्हावी, आस माझी टांगलेली
दर्शनाने वेढणारा, सावळा हा देव माझा.


काय त्याचा थाट आहे, वा ! कटेशी हात आहे
नाथ द्वारी राबणारा, सावळा हा देव माझा


दाटलेला भाव आहे, निर्धनांचा गाव आहे,
हो ! धनाने बाटणारा, सावळा हा देव माझा.


भक्त झाले फार आता, कोण त्याने आठवावे ?
नित्य माझा वाटणारा, सावळा हा देव माझा.



- रमेश ठोंबरे (Ramesh Thombre)
(विठूच्या गजला)

~ || विठूच्या गजला || ~

 
 
 
 
काही दिवसांपूर्वी एक स्वप्नं पडलं ..... ..... 'प्रियेचे अभंग' विठ्ठलाच्या कानी पडले (हात कटेवर असताना कान सताड उघडे असल्याचा परिणाम ... अभंगांचा नाही) .आणि देव दुखावला गेला ... "देवांची मक्तेदारी असणारे हे अभंग .. प्रियेसाठी ? आणि मग माझ्यासाठी काय .... ?
माझ्यासाठी हि काही तरी वेगळं हवं ... अर्थात प्रियेसाठी वापरलं जाणारं ....' गजल' ?


म्हणून 'विठूच्या गजला'
बर्याच दिवसांपासून मनात घोळणारा हा विषय .... प्रत्यक्षात आणतोय....
गजलेच्या तंत्रात आणि .... विठ्ठलाच्या कथा संदर्भात (गुगुलन चालू आहे !), काही चुका आणि गफलत होण्याची १०० % खात्री आहे (high confidence level),
तेंव्हा आपल्या मौलिक सूचनांचे स्वागत ! (न पेलवणाऱ्या कार्यात सगळे सोबत असले म्हणजे ... अपयश विभागलं जातं)

~ रमेश ठोंबरे

Oct 25, 2011

33 || लाजू नको प्रिये ||


लाजू नको प्रिये
आजच्या या राती
खुलू दे ती प्रीती
योजिलेली || ३ ||

याज साठी केला
होता अट्टहास
गळ्यामध्ये फास
असू ध्यावा || ४ ||

सौंदर्य पीठिका
प्रियेचा तो तीळ
पाहण्याचा काळ
आज आहे || ५ ||

तनुवरी तोच
शोभणार खास
वर्णिलेला भास
शोधतो मी || ४ ||

सापडेना तीळ
किती केला संग
उरले न अंग
शोधण्याचे || ५ ||

- रमेश ठोंबरे 
Ramesh Thombre

Oct 23, 2011

'मराठी कविता समूह'च्या पहिल्या 'कविता विश्व' ई-दिवाळी अंकाचे श्री. फ.मुं.शिंदे च्या हस्ते प्रकाशन


 

 
 
कवितेचा खरेपणा हा तिचा दर्जा असतो. - फ. मुं. शिंदे

ऑर्कुट-फेसबुकसारख्या सोशल नेटवर्कींगच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात मराठी कवितेचा एक मोठा लेखकवर्ग व वाचकवर्ग घडविणाऱ्या "मराठी कविता समूहा"च्या "कविता विश्व" ह्या ई-पुस्तकाच्या पहिल्या दिवाळी अंकाचं प्रकाशन आज (दि. २१ ऑक्टोबर २०११ रोजी) औरंगाबाद येथे ज्येष्ठ कवी श्री. फ. मुं. शिंदे ह्यांच्या शुभहस्ते एका घरगुती सोहळ्यात केले गेले. ह्या अंकात "मराठी कविता समूहा"च्या ऑर्कुट आणि फेसबुक अधिष्ठानांवर गाजलेल्या अनेक कवितांचा समावेश आहे. ह्या उपक्रमाला "वाचन संस्कृतीची एक महत्त्वपूर्ण चळवळ" असे संबोधून फ. मुं. नी "मराठी कविता समूहा"चे कौतुक केले.
"मुक्तछंदातही एक लय असायला हवी, म्हणूनच मुक्तछंद हा सर्वात अवघड काव्यप्रकार आहे. कवितेचा खरेपणा हा तिचा दर्जा असतो." अश्या शब्दात फ. मुं. नी उदयोन्मुख कवींना मार्गदर्शनही केले. फ. मुं. नी सादर केलेल्या त्यांच्या "आई" आणि "मीनाकुमारी" ह्या कवितांनी उपस्थितांना भावविवश केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन औरंगाबादच्या प्रसिद्ध कवयित्री आणि समूहाच्या सक्रीय सदस्या सौ. रंजन कंधारकर ह्यांनी केले. ह्या प्रसंगी श्री. विश्वनाथ ओक, डॉ. श्रीरंग देशपांडे, श्री. प्रशांत मुळे आणि प्रसिद्ध प्रकाशक श्री. रमेश राऊत आदी मान्यवरही उपस्थित होते."कविता विश्व" च्या ह्या देखण्या अंकाचे ई-मेल द्वारे नि:शुल्क वितरण केले जाणार आहे. सदर ई-पुस्तक मिळण्यासाठी ebooks@marathi-kavita.com ह्या मेल वर संपर्क करावा.
मराठी कविता समूहाचे रणजित पराडकर, सोनम पराडकर आणि रमेश ठोंबरे हे संचालक कार्यक्रमास उपस्थित होते. हा कार्यक्रम पराडकर ह्यांच्या गारखेडा येथील घरी पार पडला. 



32 || चढलेली धुंदी ||


चढलेली धुंदी
गाठलेला ज्वर
वेडावलो पार
स्पर्शानेच || १ ||

वेगळीच नशा
प्रिये तुझी आहे
कोण मग पाहे
मदिरेला || २ ||

अडखळे पाय
दूर तुझ्या जाता
सोडवेना आता
बाहुपाश || ३ ||

लागलेच आता
तुझे ते व्यसन
म्हणतील जन
वाया गेला || ४ ||

म्हणताती म्हणो
त्यांना काय ठावे
झिंगताती नवे
ब्र्यांड रोज || ५ ||

- रमेश ठोंबरे 
Ramesh Thombre 

Oct 22, 2011

सांगा कस खेळायचं ? (बोल गाणी मधून)

सांगा कस खेळायचं ?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!

डोळे भरुन तुमचा खेळ
कोणीतरी पाहत असतंच ना?
तास तास - दिवस दिवस
तुम्च्यासाठी देत असतंच ना?
वन-वन करायचं की Six, Four मरायचं
तुम्हीचं ठरवा!

संततधार पावसात
जेव्हा काही दिसत नसतं
तुमच्या साठी कोणीतरी
छत्री घेऊन उभं असतं
पावसासाठी कुढायचं की चेंडूसारखा उडायचं
तुम्हीचं ठरवा!

पायातले बूट रुतुन बसतात
हे अगदी खरं असतं;
पण क्षणात आभाळाकडे झेप घेतात
हे काय खरं नसतं?
चिखला मध्ये रुतायचा कि आभाळाला भेटायचं
तुम्हीचं ठरवा!

खेळ अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
खेळ अर्धा उरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की उरला आहे म्हणायचं
तुम्हीचं ठरवा!

सांगा कस खेळयचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा !

- रमेश ठोंबरे
(मंगेश पाडगावकरांची माफी मागून)

Oct 21, 2011

31. || प्रियेच्या मिठीत ||


प्रियेच्या मिठीत
सामावले जग
विचारांचा वेग
मंदावला || १ ||

शांत झाले मन
मिळताच साथ
आता कधी हात
सुटू नये || २ ||

प्रिये माझी भक्ती
तुलाच गे ठाव
मनीचा तू भाव
ओळखीला || ३ ||

भेटलीस मला
धन्य आता झालो
सोम-रस प्यालो
तव ओठी || ४ ||

घोंगावता वात
शांत आता झाला
शरणही आला
तुज प्रती || ५ ||

- रमेश ठोंबरे 
Ramesh Thombre 

घाबरू नका



कॉलेजातली एक मुलगी
लग्नानंतर भेटली असेल
तेंव्हा जितकी सुंदर होती
त्याहून सुंदर वाटली असेल.

घाबरू नका
हे तारुण्याचं लक्षण आहे
तुम्ही अजून तरुण आहात
हेच यातलं शिक्षण आहे !

तुम्ही म्हणाल ...
तेंव्हा अशी नव्हती हसत
जरी इतकीच सुंदर
होती दिसत !

घाबरू नका
तेंव्हा तुम्ही शोधलत तिला
आज तीच तुम्हाला शोधत असेल
तेंव्हा चटकन उठली होती,
आज नक्कीच सोबत बसेल.

आहो .... ! हे काही भविष्य नाही
हे हि तरुण्याचच लक्षण आहे ....
ती हि अजून तरुण आहे
हेच यातलं शिक्षण आहे !

ती जवळ आल्यावर
तुम्ही आणखी जवळ याल
तिने बोट दिल्यावर
तुम्ही हात हातात घ्याल !

हात हातात आल्यावर
तुम्ही नक्की हरवून जाल
तिने "पुढे काय म्हटल्यावर"
पुन्हा तुम्ही भानावर याला ..

मग मला विचाराल ...
"आता हे कसलं लक्षण आहे ..?"
मी म्हणेल ....
यात माझं हि अधुरंच शिक्षण आहे !

पण घाबरू नका ...!
हे काही खरं नसतं ...
तुझे-माझे श्वास वगेरे ...
नुसते मनाचे भास वगेरे !
लोक म्हणतील "लागलं पिसं,
वयानुरूप होतं असं ...."

पण घाबरू नका
हे तारुण्याच लक्षण आहे
तुम्ही अजून तरुण आहात
हेच यातलं शिक्षण आहे !

- रमेश ठोंबरे
Ramesh Thombre

Oct 20, 2011

|| विश्व ची हे घर || .................. ३)


विश्व ची हे घर
शब्दांचे पाझर |
काव्याचे माहेर
हेच आहे ||

शब्द शब्द येतो
आतून तो खोल |
काय त्याचे मोल
वर्णावे मी ||

रोज येथं चाले
काव्याचा जागर |
भरली घागर
ओसंडते ||

शब्द येथं रत्न
शब्द ची रे धन |
गहीवरे मन
वेचताना ||

शब्द शब्द आहे
निपजले अस्त्र |
भरजरी वस्त्र
फिके फिके ||

- म.क.
(रमेश ठोंबरे)

Oct 18, 2011

.... अन हत्तीचे शेपूट छोटे झाले !



भल्या मोठ्या हत्तीचे तेव्हा शेपूट होते शानदार,
शरीरावानी मोठे आणि थोडे झुपकेदार.
शेपटामुळेच हत्तीची वाढली होती शान,
शेपटामुळेच हत्तीला मिळत असे मान.
आपला मान पाहून एकदा हत्तीला गर्व झाला,
सरळ जावून हत्ती कोल्हयाचे घरटे मोडून आला.
हत्तीच्या शेपटाने कोल्हयाचे घरटे मोडले,
घरट्याच्या छाप्पराने पिलाचे शेपूट तोडले.
पिलाचे शेपूट पाहून कोल्हा दुखी झाला,
हत्तीला धडा शिकवण्याचा त्याने पण केला.
हत्ती होता शक्तिशाली तसाच कोल्हा चतुर,
धडा शिकवण्यास हत्तीला तितकाच झाला आतुर.
....
एका शांत सकाळी कोल्हा नदीवर गेला,
पिलाला पाण्यात बसउन स्वतः दूर झाला.
थोड्याच वेळात स्नानासाठी हत्ती तेथे आला,
पाहून पाण्यात पिलाला तो दंग झाला.
हत्ती म्हणे , 'कोल्होबा पिलू काय करतंय ?
पाण्यात शेपूट सोडून असं काय धरतंय ? '
कोल्हा म्हणे, 'पिलाला आज मासे खाऊ वाटले,
म्हणूनच त्याने पाण्यात शेपूट आहे टाकले.
आता थोड्या वेळात मासे गोळा होतील,
शेपटीला धरून सगळे वर येतील.
मासे म्हणताच हत्तीच्या तोंडाला पाणी सुटले,
त्यानेहि पाण्यात जाऊन शेपूट नदीत टाकले.
थोडा वेळ झाल्यावर हत्ती म्हणे कोल्हयाला,
'आता वर येऊ का फार धुकतंय शेपटीला.'
कोल्हा म्हणे, हत्तीला - ''आणखी थोडा धीर धार,
मग खुशाल शेपूट काढून माशांचा फराळ कर,
- ते बघ माझं पिल्लू कसं शांत बसलंय,
वेदना होत असतानाही पोटासाठी हसतंय.''
थोड्या वेदना वाढल्यावर हत्तीने शेपूट काढले,
पाहतो तर शेपूट होते माशांनी अर्धे तोडले.
पाहून हत्तीचे लांडे शेपूट, लांडे पिल्लू हसले,
म्हणे 'गजराज माझ्या लांड्या शेपटाला फसले'
...
आता शेपूट गेल्यावर हत्तीची अद्दल घडली,
हत्तीच्या गर्वानेच त्याची शेपटी तोडली.
जेव्हा असे माश्यांनी हत्तीचे शेपूट तोडले,
तेव्हा पासून हत्तीने मांस खाणे सोडले.
मांस त्याने सोडल्यावर शेपूट नाही आले.
... अन शेवटी हत्तीचे शेपूट छोटे झाले.
- रमेश ठोंबरे 
 ( Ramesh Thombre)

Oct 17, 2011

असावी - नसावी (कविता)



मस्तीत चालणार
धुंदीत बोलणार
गंधित करणार असावी ... !

गद्यात भेटणार
पद्याने बाटणार
फितूर वाटणार नसावी ... !


काव्याचे अंग
अन रसराज संग
मैफलीत गाजणार असावी ... !

शब्दांच्या ओझ्यात
यमकांच्या बोझ्यात
अर्थाला बुजणार नसावी ... !


छंदाशी खेळणार
गंधाशी भाळणार
मुक्तीत लोळणार असावी ...!

ओळीला ओळ
अन कळेना घोळ
अंत ती पाहणार नसावी ... !


वाचताना छोटी
अन अर्थाला मोठी
सुखद 'अट्याक' असावी ... !

अवघड - बोजड
ज्ञानियाना डोईजड
डोक्याला 'हेड्याक' नसावी ... !


लयीत हसणार
व्रतात बसणार
मनात ठसणार असावी ... !

अलंकाराचे नसणे
वर - वर दिसणे
तालात चुकणार नसावी ... !

- रमेश ठोंबरे 
(Ramesh Thombre)

Oct 15, 2011

प्रतिसाद



प्रेम म्हणजे काय हे माहित नसतानाच
त्याने तिच्यावर प्रेम केल.
अगदी जिव फेकून ..
आणि र्हदय विकून ...

तीनही प्रतिसाद दिला
उगीच तिरका डोळा केला
तो ही खुश झाला अनं
नकळत जळत गेला,
कारन त्याने ऐकल होत
प्रेम म्हणजे जळत जाण

त्या दिवशी पर्यंत तो खुश होता
तिनं दिलेल्या प्रतिसादावर

पण ... त्या दिवशी तिनं
आणखी एक प्रतिसाद दिला,
त्याच्याच जिवलग मित्राला
अणि खरच तो जळत गेला ..
प्रेम नावाच्या नशे पासून
प्रेम नावाच्या चितेपर्यंत.... !

- रमेश ठोंबरे
(Ramesh Thombre)

~ मोजली नाही कधीही हार मी ~


मोजली नाही कधीही हार मी
घेतली नाही कधी माघार मी

लोटले ज्यांनी रणी या पामरा
मानले त्यांचे पुन्हा आभार मी

पेटला अंगार, झालो राखही
त्यातुनी झालो असा साकार मी

कुंडलीही मांडली आता खरी,
जीवनाला देउ का आकार मी ?

चार जेंव्हा बोलले रे 'चांगला'
आज वाटे व्यर्थ झालो ठार मी.

- रमेश ठोंबरे 
 Ramesh Thombre 

भाई (Vidamban)

भाई
भाई एक
नाव असतं.
शहरातल्या शहरात
गुंडगिरीचं गाव असतं!

सर्वांत असतो तेव्हा
जाणवत नाही.
आणि नसला कुठंच तरीही
नाही म्हणवत नाही

खत्रा रंगतो
टाहो उठतात.
बारक्या गल्लीत
उमाळे दाटतात.

भाई गल्लोगल्लीत तसाच
जातो घेऊन काही.
जिवाचं जिवालाच
कळावं असं
आस देऊन काही.

भाई असतो
एक धागा
जगात उजेड पडणारी
दुबईतली जागा.

जग उजळतं तेव्हा
त्याला नसतं भान
विझून गेली प्राणज्योत की
सैरावैरा धावायलाही
कमी पडतं रान.

भाई येतात जातात
गल्ली मात्र व्याकुळच
तिची कधीच भागत नाही तहान.
दिसत नसलं डोळ्यांना तरी
सापडत गेलो
गल्ली बोळ की,
सापडतेच ती दादागिरीची खाण.

याहून का निराळा असतो भाई ?
तो गल्लीत नाही तर मग
कुणाशी बोलतात गोठ्यात
हंबरणाऱ्या गायी ?

भाई खरंच काय असतो ?
गुंडगिरीचा भाव असतो
दादागिरीचा ठाव असतो
दहशतवादाचं नाव असतो
भरकटलेला गाव असतो
जगणा-याच्या जीवावर
मारलेला ताव असते.

भाई असतो
जन्माची शिरजोरी
सरतही नाही
उरतही नाही !
भाई एक नाव असतं
नसतो तेव्हा
गल्लीतल्या गल्लीत
खळबळलेलं गाव असतं!!

-रमेश ठोंबरे
(प्रा.फ.मुं.शिंदे यांची माफी मागून)
Ramesh Thombre 

~ माझी सासू ~ विडंबन


जागोजागी भेटत असते माझी सासू
कोणाच्याही सासुत दिसते माझी सासू

तिला हवे ते नटणे-बिटणे तरी नेहमी
कजाग, भलती कुरूप दिसते माझी सासू

मला मिळाली किती द्वाड हि सून पहा
मैत्रिणींना सांगत असते माझी सासू

कर्जाचा आज डोंगर थोडा कमी भासतो
कर्ज नवे मग काढत असते माझी सासू

गळ्यात माझ्या घास उतरण्या नाही म्हणतो
अवती भवती जेव्हा दिसते माझी सासू

घरी यायला मला जरासा उशीर होता
'पाळत' म्हणुनी जागत बसते माझी सासू

आठवते मग माझी आई मधेच तिजला
जेव्हा माझा उद्धार करते माझी सासू

तिला न्यायला यमराजा रे लवकर ये तू
अल्लड कसली हुल्लड दिसते माझी सासू

- रमेश ठोंबरे

प्रदीप निफाडकर/ पुणे. ("माझी मुलगी") यांची माफी मागून

30 || पाहिला सिनेमा ||


पाहिला सिनेमा
प्रिये सवे एक
तिथे मग मेख
समजली || १ ||

नसतोच कुणी
सिनेमा पाहत
ठेवतो चाहत
सखीवरी || २ ||

थेटरात जेंव्हा
अंधार हा दाटे
प्रिया मग भेटे
बिलगुनी || ३ ||

हवा आहे कुन्हा
चालता सिनेमा
नायकाची तमा
कोण करी ? || ४ ||

संपला सिनेमा
झाला हो उजेड
लागलेची वेड
अंधाराचे || ५ ||

- रमेश ठोंबरे 
Ramesh Thombre 

Oct 10, 2011

|| सरली रे वर्ष || .................२)




सरली रे वर्ष
आले मी भरास |
घेतला तो ध्यास
कवितेचा ||

एक एक दिन
वाढला रे व्याप |
मग माझा 'बाप'
आनंदला ||

दिसा मागे दिस
मास हि सरले |
वर्ष हि भरले
पूर्ण पाच ||

तेंव्हा हा प्रवास
लागला मार्गास |
काव्याच्या वर्गास
योजलेला ||

नित दिन वाढे
इतिहास, ख्याती |
फुललेली छाती
पहिली मी ||

- म.क.
(रमेश ठोंबरे)

|| कुठे मम मूळ || .................. १)





कुठे मम मूळ
काय मम कूळ |
जाणता समूळ
तुमी लोकं ||

कशी मी दिसावी
कशी मी असावी |
मायाजाल हेच
घर माझे ||

काय माझं देणं
काय लागे लेणं |
कुणासाठी कोण
आला येथं ||

जन्माचा सोहळा
पहिला रे ज्याने |
केले रे पालन
मनोभावे ||

'म.क.' हेच नाम
दिधले रे मला |
सोहळा तो झाला
यथासांग ||

- म.क.
(रमेश ठोंबरे)  - Ramesh Thombre

|| म.क. उवाच ||





माझ्या जन्मापासून इथ पर्यंत ....
बरीच उलथापालथ झाली ....
दररोज, दर-दिवस इतिहास लिहिला जातो ....
कधी गोड, कधी हळवा....
कधी अपेक्षित कधी अनपेक्षित ...
तुम्ही लिहिता ...
तुम्ही बोलता....
तुमचा राग, तुमचा लोभ ....
नेहमीच व्यक्त झाला ....
कधी छंदातून कधी मुक्तछंदातून...
कधी पद्यात कधी गद्यात ....
मी मात्र पाहत असते ....
डोळे लाऊन बसते.
मग मला सुद्धा भरून येतं ....
भर भरून बोलावसं वाटतं
ऐकणार ना ?
....
या मांदीआळीतील......
साद प्रतिसाद .....

-------------- मराठी कविता (म.क.)

Oct 7, 2011

29. || प्रियेचे पाहणे ||

प्रियेचे पाहणे
आहे जीव घेणे
आता एक होणे
बाकी आहे || १ ||

बाहुपाशी तिज
घेण्यास अधीर
नको ना उशीर
प्रेमामध्ये || २ ||

नाजूक ती काया
आसुसली फार
अंगी मग ज्वर
चढलेला || ३ ||

मोहवितो जेथे
सुगंधी गजरा
पदर लाजरा
आड येतो || ४ ||

छळतो हा वारा
आत येतो थेट
खिडकीचे पट
वाजवतो || ५ ||

- रमेश ठोंबरे
(Ramesh Thombre)

Oct 4, 2011

रास रंगला ग सखे रास रंगला



रास रंगला ग सखे रास रंगला
रास रंगला ग सखे रास रंगला
आज प्रीतीचाच जणू 'क्लास' रंगला || धृ ||


तो मुजोर, चित्तचोर वेड लावतो
आणि हास्य मुखावरी गोड दावतो
वाटे 'फासण्याचा' पुन्हा फास रंगला || १ ||


हा असाच वाट पाहे आज दिसाची
रासक्रीडा चाले मग शृंगार रसाची
त्याच साठी आज पुन्हा 'खास रंगला' || २ ||


काय करू कशी खोडू याची सावली
चाले बघ पुन्हा त्याची तीच 'पावली'
पावलीत दांडियाचा 'भास' रंगला || ३ ||


हीच संधी याच्यासाठी हर्षभराची
साठूउन ठेवी याद वर्षभराची
आता संगतीचा जणू त्रास 'रंगला' || ४ ||


रात होता याला फार जोर वाढतो
रात उलटता ताप मग वर चढतो
सरलेच नऊ दिन शेवटचा तास रंगला || ५ ||


हाच सखे माझ्यासाठी जीव टाकतो
चोरूनिया ओळखीचे बाण फेकतो
आज खरा आमचा 'सहवास' रंगला || ६ ||

- रमेश ठोंबरे
(Ramesh Thombre)

Oct 2, 2011

एक महात्मा पाहिजे आहे ! (जाहिरात)





















आमच्यासाठी कष्ठ सोसणारा,
आमच्या सर्व देशाला पोसणारा.
खोट्याच्या दुनियेत सत्याचा आग्रह धरणारा,
आमच्या पोटासाठी स्वतः उपोषण करणारा.
एक महात्मा पाहिजे आहे !

आमच्यासाठी चरख्यावर सुत कातणारा,
आम्हा सर्वाना अहिंसेचा दूत वाटणारा.
जगाला मानवतेचा संदेश देणारा,
सत्य अहिंसा आणि शांतीच गीत गाणारा
एक महात्मा पाहिजे आहे !
.
.
.

पण लक्षात ठेवा .....
देशाच काम फुल-टाईम करावं लागेल,
सांगता येत नाही इथं कोण कसा वागेल.
सत्य सत्य म्हणून खोटच पेरलं जायील,
येणाऱ्या पिकालाहि मग गृहीत धरला जायील.

इथे पावलो पावली लढावं लागेल,
मनालाही कधी कधी गाढावं लागेल.
कधी वाटेल सोडून द्यावी सत्याची वाट,
तेव्हा स्वताच स्वतः च मन मोडावं लागेल.

तुमच्या प्रत्येक गोष्टीत मग काढल्या जातील खोड्या,
शब्दांच्या कसरती अन शब्दांच्या कुरघोड्या.
भेकड, पळकुटा म्हणून हेटाळनीही केली जायील.
तुमच्या नावाची मग सुपारीही दिली जायील,

तुम्ही म्हणाल एवढ करून सुद्धा मरण सस्ते,
पण तुम्ही गेल्यावर तुमच्या नावें होतील रस्ते.
चौका-चौकात तुमचे पुतळे उभारले जातील,
जयंती मयन्तीला सगळे तुमचे गुण गातील.

गेल्यावर हि नेहमीच ....
अपमान हि सहन करावा लागेल,
काळ्या कावळ्याचं तुमच्या काठीशिवाय कस भागेल ?
तुमचे विचार सोडून तुमच सर्व सर्व पळवल जाईल,
एखादा मग तुमचा तो चष्मा हि वरचे वर नेईल.

सरकारी कार्यालयात तुमची व्यवस्था असेल,
सोबतीला मात्र भिंतींशिवाय कुणीच नसेल.
सगळा बाजार समोर दिसेल, पैश्यावरच न्याय असेल
पण तेव्हा तुम्हाला पाहण्या शिवाय पर्याय नसेल.

गेल्यानंतर मागचा विचारच नको,
कोणी मूल्य, कोणी तुमच्या वस्तू विको,
नंतर मागून काहीच बोलायचं नाही..
आतल्या-आतूनही उगाच हलायचं नाही.
गेल्यावर तुमची किंमत ती काय ?
गरज सरो अन वैद्य जाय !


थोडक्यात ...
तुम्हाला सत्य स्वीकारावं लागेल,
देशासाठी खपाव लागेल.
उपोषण आणि सत्याग्रह य्याना शस्त्र म्हणून स्वीकारावं लागेल.
राजकारणाला सहन कराव लागेल,
राजकारण आवडत नसल तरी 'राजकारणी' ...
म्हणलेल एकून घ्यावं लागेल.
तुम्हाला एख्याद्या हि चुकीसाठी माफ केल जाणार नाही ...
(कारण तुम्ही 'महात्मा' असणार आहात ...)
उलट तुमच्यातील दोष हेरले जातील ... !
तुमच्या चांगल्या गोष्टीत हि उणीव असल्याची जाणीव ... (साक्षात्कार)
आम्हाला वेळोवेळी होत राहील.
आम्हाला हव तोपर्यंत तुम्हाला सहन केल जायील....,
नंतर मात्र तुम्हाला संपवण्याची वेळ येयील ... !
तेव्हा तुम्ही गप गुमान 'राम' म्हणायच.

या नंतरच तुमचा खरा सूड आम्ही घेऊ
गेलात म्हणून सोडून कसे देऊ ?
तुमच्यातील उनिवाना उधान येईल ....,
तुमच्या नाकार्तेपणावर संशोधन होईल.
गेलात मेलात ..... संपले असे नाही .... !
दररोज मारले जाल !
.
.
.
.
कबूल असेल तर आजच apply करा,
'महात्म्याची' Post बर्याच दिवसापासून खाली आहे .. !
कृपया Fax किंवा Mail करू नका Online हि भेटू नका ...
प्रत्यक्ष Offline भेटा ......
आम्हाला वर दिलेल्या सर्व Qualities चेक करायच्या आहेत.
आणि काही Policies प्रत्यक्ष ठरायच्या आहेत.


- रमेश ठोंबरे
Ramesh Thombre

Sep 30, 2011

दादागिरी ते गांधीगिरी (व्हाया सेंट्रल जेल)

तो झोपड़पट्टीत रहायचा ...
अन मिल्लेनिअमची स्वप्न पहायचा.
देश्याचे नेते दिल्लीत पाणी प्रश्नासाठी बोलायचे ..,
हा गल्लीत पाण्यासाठी भांडायचा.

दादा दादांची टक्कर होताच ..
हा गुह्नेगारित उतरला
खंडनी, हप्प्ता वसूली करतानाच ...
आता चाकू ही हातात धरला.

गुह्नेगारी वाढत गेली, दादागिरी वाढत गेली....
डाकूगिरी, गुंडागिरीत हा कधीच नाही हरला.
आत - बाहेरचा खेळ खेळ्ताना अखेर ...
एक दिवस सौंशयित दहशतवादी ठरला.

जामिन आता मिळत नव्हता, तुरंगवास टळत नव्हता...
तेंव्हा सापडले त्याला गंधिवादाचे घबाड.
'माझे सत्याचे बोल' ... टाइमपास म्हणुन हाती घेतले..
अन वाचता वाचता त्याने सम्पूर्ण गांधिच वाचले.

काय असतो गुह्ना, का द्यावी गुह्न्याची कबूली ?
दादाच्याही डोक्यात गांधीगिरी सुरु झाली.
दिली लगेच कबूली, भोगला त्याने तुरुंगवास,
चार वर्ष्यांची शिक्षा ठरली पुस्तकांचा सहवास.

आता तो बदललाय.., गाँधी वाचून हललाय,
गाँधी विचार आचारतो, गांधीगिरी प्रचारतो.
तुरुंगातील कैध्याना तो आज विचारांची दिशा देतो,
गाँधी विचार जिवंत आहेत याचीच एक आशा देतो.

चाकू धरल्या हातानी... आता चरखा ही शिक्लाया,
त्याने स्ववलम्बनासाठी... नौकरी वर विश्वास टाकलाय.
पहिला जर 'लक्ष्मनदादा' आता विश्वास कसा बसेल,
कारन चाकू धरल्या हातामधे आता नवे पुस्तक दिसेल.

- रमेश ठोंबरे (Ramesh Thombre)
दि. २०/०५/२००९

(सत्येकथेवर आधारित)

|| लेकीच्या ओव्या ||


काय सांगू शेजीबाई, माझ्या लेकीचं कवतिक
घरासाठी तिनं बाई, खस्ता काढल्या कितीक

होती लहान ती जवा, सांभाळले भाऊराया,
झाली लेकराची माय, घास त्याला भरवाया.

भाऊ शाळेमंदी जातो, गिरवतो यक दोन,
त्याले शिकवते तीन, त्याची आडाणी बहीन.

आली वयामंदी जवा, लाज अंगात मायीना,
चाले नाकाम्होरं पोर, वर करून पाहीना.

हात पिवळे करण्या, बाप बोलला झोकात,
देण्या-घेण्याच्या रीवाजी, त्याचं मोडलं पेकाट.

चाले लगनाची घाई, गेली मोहरून पोर,
लळा मायीचा सुटेना, तिला आईचाच घोर !

जाता सासराला लेक, झाली दादल्याची राणी,
तिच्या पावलांनी तिथं, लक्ष्मी भरतेया पाणी.

लेक माझी ग गुणाची, नाही नाही ग कुणाची,
तिचा जीव माह्यापाशी, लेक मायीच्या मनाची.

लेक व्हाढतो ग ताट, लेक भरवते घास,
लेक कोरडा कोरडा, लेक पान्हाळली कास

- रमेश ठोंबरे
(Ramesh Thombre)
(अक्षरछंद)

Sep 27, 2011

~ अजून बाकी ~


धुंद जाहली, कुंद जाहली, परी भाळणे अजून बाकी
चिंब जाहलो आठवणींनी, पाउस भिजणे अजून बाकी.

रक्त सांडले दुबळ्यांचे अन, जीवे मारले रक्षणकर्त्या
देश आमुचा पोसत बसतो, फास अवळणे अजून बाकी.

उंच उंच इमले, आदर्शाचे, पचउन कुठला ढेकर येतो
आगडोंब ज्या उदरी वसतो, घास भरवणे अजून बाकी.

तुझे दिलासे, तुझे उसासे, तुझे खुलासे मोजत बसतो
पहिल्या वहिल्या पत्राचे पण, उत्तर मिळणे अजून बाकी.

भाव भुकेला विठू एकटा, वाट पाहतो भक्तगणांची
दलाल दिसले, बडवे दिसले, विठ्ठल दिसणे अजून बाकी.

रदीफ सारे जुळून येता, किती रमेशा गजला लिहिल्या
काळीज पार करणारा एक, शेर गिरवणे अजून बाकी.

- रमेश ठोंबरे
Ramesh Thombre