आपण हिला पाहिलत का ?
"उंची तशी मध्यम,
वय आहे सोळा
वरुन चलाख दिसते,
पण स्वाभाव आहे भोळा.
केस काळे काळे
नी मृगनयनी डोळे
दात पांढरे शुभ्र
नी ओठ - ओठी जुळे.
रंग गोरा पान,
नी उडालेले भान.
नाक चंपाकळी
नी उंचीपुरी मान.
तशी हुशार आहे,
पण आपल्याच नादात असते
सुंदर काही दिसल की
भान हरवून बसते.
ती तशी लाजाळूच,
जपून वाट काटते
पण वयात आता आलीय
म्हणून काळजी वाटते.
आपण हिला पाहिलत का ?
पाहिल असेल तर लवकर कळवा,
कळवण्यासाठी पत्ता ऐका
कविता तिचं नाव आहे.
कवी तिचा पालक
आणि कविमन तिचं गाव आहे.
ती हरवल्या पासून,
मी ही हरवून गेलोय.
ती ही मला शोधत असेल,
आणि मीही तिला शोधतोय.
सापडण्याची शक्यता ...
एखाद्या मासिकाच्या कार्यालयात,
किंवा जाहिरातींनी भरलेल्या..
दैनीकाच्या कोप-यात.
वरील ठिकाणी सापडली तर,
आणून देना-याला ..
बक्षीस मिळनार नाही,
आणि माझ्या वहितंच सापडली तर
सापडलेली आपल्याला कळणार नाही"
..
..
..
वरील जाहिरात प्रकाशित झाल्यावर
एक दिवसात कविता मिळाली.
एक नाही, पन्नास जणांनी आणून दिली
चौकशी अंती समजल,
त्याच दैनिकाच्या कोप-यात ती सापडली
जिथं ती हरवल्याची ...
जाहिरात प्रकाशित झाली होती !
- रमेश ठोंबरे
No comments:
Post a Comment