रास रंगला ग सखे रास रंगला
रास रंगला ग सखे रास रंगला
आज प्रीतीचाच जणू 'क्लास' रंगला || धृ ||
तो मुजोर, चित्तचोर वेड लावतो
आणि हास्य मुखावरी गोड दावतो
वाटे 'फासण्याचा' पुन्हा फास रंगला || १ ||
हा असाच वाट पाहे आज दिसाची
रासक्रीडा चाले मग शृंगार रसाची
त्याच साठी आज पुन्हा 'खास रंगला' || २ ||
काय करू कशी खोडू याची सावली
चाले बघ पुन्हा त्याची तीच 'पावली'
पावलीत दांडियाचा 'भास' रंगला || ३ ||
हीच संधी याच्यासाठी हर्षभराची
साठूउन ठेवी याद वर्षभराची
आता संगतीचा जणू त्रास 'रंगला' || ४ ||
रात होता याला फार जोर वाढतो
रात उलटता ताप मग वर चढतो
सरलेच नऊ दिन शेवटचा तास रंगला || ५ ||
हाच सखे माझ्यासाठी जीव टाकतो
चोरूनिया ओळखीचे बाण फेकतो
आज खरा आमचा 'सहवास' रंगला || ६ ||
- रमेश ठोंबरे
(Ramesh Thombre)
No comments:
Post a Comment