Oct 18, 2011

.... अन हत्तीचे शेपूट छोटे झाले !



भल्या मोठ्या हत्तीचे तेव्हा शेपूट होते शानदार,
शरीरावानी मोठे आणि थोडे झुपकेदार.
शेपटामुळेच हत्तीची वाढली होती शान,
शेपटामुळेच हत्तीला मिळत असे मान.
आपला मान पाहून एकदा हत्तीला गर्व झाला,
सरळ जावून हत्ती कोल्हयाचे घरटे मोडून आला.
हत्तीच्या शेपटाने कोल्हयाचे घरटे मोडले,
घरट्याच्या छाप्पराने पिलाचे शेपूट तोडले.
पिलाचे शेपूट पाहून कोल्हा दुखी झाला,
हत्तीला धडा शिकवण्याचा त्याने पण केला.
हत्ती होता शक्तिशाली तसाच कोल्हा चतुर,
धडा शिकवण्यास हत्तीला तितकाच झाला आतुर.
....
एका शांत सकाळी कोल्हा नदीवर गेला,
पिलाला पाण्यात बसउन स्वतः दूर झाला.
थोड्याच वेळात स्नानासाठी हत्ती तेथे आला,
पाहून पाण्यात पिलाला तो दंग झाला.
हत्ती म्हणे , 'कोल्होबा पिलू काय करतंय ?
पाण्यात शेपूट सोडून असं काय धरतंय ? '
कोल्हा म्हणे, 'पिलाला आज मासे खाऊ वाटले,
म्हणूनच त्याने पाण्यात शेपूट आहे टाकले.
आता थोड्या वेळात मासे गोळा होतील,
शेपटीला धरून सगळे वर येतील.
मासे म्हणताच हत्तीच्या तोंडाला पाणी सुटले,
त्यानेहि पाण्यात जाऊन शेपूट नदीत टाकले.
थोडा वेळ झाल्यावर हत्ती म्हणे कोल्हयाला,
'आता वर येऊ का फार धुकतंय शेपटीला.'
कोल्हा म्हणे, हत्तीला - ''आणखी थोडा धीर धार,
मग खुशाल शेपूट काढून माशांचा फराळ कर,
- ते बघ माझं पिल्लू कसं शांत बसलंय,
वेदना होत असतानाही पोटासाठी हसतंय.''
थोड्या वेदना वाढल्यावर हत्तीने शेपूट काढले,
पाहतो तर शेपूट होते माशांनी अर्धे तोडले.
पाहून हत्तीचे लांडे शेपूट, लांडे पिल्लू हसले,
म्हणे 'गजराज माझ्या लांड्या शेपटाला फसले'
...
आता शेपूट गेल्यावर हत्तीची अद्दल घडली,
हत्तीच्या गर्वानेच त्याची शेपटी तोडली.
जेव्हा असे माश्यांनी हत्तीचे शेपूट तोडले,
तेव्हा पासून हत्तीने मांस खाणे सोडले.
मांस त्याने सोडल्यावर शेपूट नाही आले.
... अन शेवटी हत्तीचे शेपूट छोटे झाले.
- रमेश ठोंबरे 
 ( Ramesh Thombre)

No comments:

Post a Comment