Oct 23, 2011

'मराठी कविता समूह'च्या पहिल्या 'कविता विश्व' ई-दिवाळी अंकाचे श्री. फ.मुं.शिंदे च्या हस्ते प्रकाशन


 

 
 
कवितेचा खरेपणा हा तिचा दर्जा असतो. - फ. मुं. शिंदे

ऑर्कुट-फेसबुकसारख्या सोशल नेटवर्कींगच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात मराठी कवितेचा एक मोठा लेखकवर्ग व वाचकवर्ग घडविणाऱ्या "मराठी कविता समूहा"च्या "कविता विश्व" ह्या ई-पुस्तकाच्या पहिल्या दिवाळी अंकाचं प्रकाशन आज (दि. २१ ऑक्टोबर २०११ रोजी) औरंगाबाद येथे ज्येष्ठ कवी श्री. फ. मुं. शिंदे ह्यांच्या शुभहस्ते एका घरगुती सोहळ्यात केले गेले. ह्या अंकात "मराठी कविता समूहा"च्या ऑर्कुट आणि फेसबुक अधिष्ठानांवर गाजलेल्या अनेक कवितांचा समावेश आहे. ह्या उपक्रमाला "वाचन संस्कृतीची एक महत्त्वपूर्ण चळवळ" असे संबोधून फ. मुं. नी "मराठी कविता समूहा"चे कौतुक केले.
"मुक्तछंदातही एक लय असायला हवी, म्हणूनच मुक्तछंद हा सर्वात अवघड काव्यप्रकार आहे. कवितेचा खरेपणा हा तिचा दर्जा असतो." अश्या शब्दात फ. मुं. नी उदयोन्मुख कवींना मार्गदर्शनही केले. फ. मुं. नी सादर केलेल्या त्यांच्या "आई" आणि "मीनाकुमारी" ह्या कवितांनी उपस्थितांना भावविवश केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन औरंगाबादच्या प्रसिद्ध कवयित्री आणि समूहाच्या सक्रीय सदस्या सौ. रंजन कंधारकर ह्यांनी केले. ह्या प्रसंगी श्री. विश्वनाथ ओक, डॉ. श्रीरंग देशपांडे, श्री. प्रशांत मुळे आणि प्रसिद्ध प्रकाशक श्री. रमेश राऊत आदी मान्यवरही उपस्थित होते."कविता विश्व" च्या ह्या देखण्या अंकाचे ई-मेल द्वारे नि:शुल्क वितरण केले जाणार आहे. सदर ई-पुस्तक मिळण्यासाठी ebooks@marathi-kavita.com ह्या मेल वर संपर्क करावा.
मराठी कविता समूहाचे रणजित पराडकर, सोनम पराडकर आणि रमेश ठोंबरे हे संचालक कार्यक्रमास उपस्थित होते. हा कार्यक्रम पराडकर ह्यांच्या गारखेडा येथील घरी पार पडला. 



No comments:

Post a Comment