मराठी कवितेचा / साहित्याचा दर्जा घसरतोय !
आज मराठी मध्ये कितीतरी मोठ्या प्रमाणात कविता लिहिली जाते आहे, इतक्या
संख्येने मराठी मध्ये या पूर्वी कविता लिहिली गेली असेल असे वाटत नाही.
त्याच वेळी दर्जेदार कविता मात्र लिहिली जात नाही असे जाणवते आहे. कायम
मनावर कोरल्या जातील अश्या फारच कविता आज वाचनात येतात. पूर्वीच्या काळी
छपाई माध्यमे नसतानाही त्या काळच्या अनेक रचना आज जिवंत आहेत ...
पुन्नरर्जीवीत होत आहेत. मग नवीन लेखन
तितक्याच ताकतीने का समोर येताना दिसत नाही ? का आपण सर्वचजन
गुणवत्तेपेक्षा संखेच्या मागे लागलो आहोत ? आपल्याला गुणवत्तेच नोबेल हव
आहे कि संख्येच !
इंग्लिश कथा / कविता लोक रांगा लाऊन विकत घेतात आणि
आपल्याकडे मराठी कवितेला प्रकाशक सुद्धा कुठल्याच रांगेत उभं करत नाही ....
हा काय त्याचा दोष आहे ? हा आपल्या लेखनाचा दोष नाही का ...? हा आपल्या
लेखनाचा दर्जा नाही का ? मराठी कवी / लेखक स्वतःच्या खर्चाने पुस्तक
छापतो ... स्वताच्या खर्चाने मोफत वाटप करतो तरीहि त्याची पुस्तकं वाचली
जात नाहीत... त्याची कविता, त्याचं गाणं इतर ठिकाणी वाचनात / एकण्यात येत
नाही ! हा काय वाचकांचा दोष आहे ? तुम्ही मुक्त छंदाच्या नावाखाली धडे
लिहिणार .... छंदाच्या नवाखाली यमकांशी खेळणार ... आणि वृत्तबद्धतेच्या
नावाखाली शब्द जोडणार असाल तर तुमच्या / आमच्या भावना वाचकानपर्यंत कशा
पोचणार ? आणि वाचक त्यांना काय म्हणून वाचणार ?
प्रश्न बरेच आहेत .... उत्तर फक्त एकच ... दर्जा सुधारला गेला पाहिजे
माझा एक समीक्षक मित्र आहे तो मागे खूप दिवसांपूर्वी ओर्कुट वाचक म्हणून
होता ... वाचनाची आवड असल्याने तो वाचनात आलेल्या कवितेवर लिहू लागला....
त्याला कवितेची जाण होती त्यामुळे त्याला आजच्या कवितेतील बर्यचा गोष्टी
खटकत होत्या ... त्या तो नमूद करत होता ... त्याला आवडणाऱ्या / नआवडणार्य
रचनांबद्दल तो लिहित असे .... अर्थात जास्त रचना या नआवडणाऱ्या ... काव्य
नसणाऱ्या असत. याच समीक्षक मित्राशी चर्चा करताना एक मुद्धा समोर आला ..
कि आज 'ब' दर्जाची कविताच जास्तीत जास्त लिहिली जाते ...(तो : 'ब' दर्जाचे
कवी जास्त आहेत असे बोलला होता) ('अ' दर्जा म्हणजे आतून आलेली original
कविता आणि 'ब' दर्जाची कविता म्हणजे प्रेरित होऊन, विषयावरून, शब्दावरून
... मागणीवरून लिहिलेली कविता असे त्याचे मत.) काहीतरी लिहायचं म्हणून
कविता लिहिली जाते ... ती आतून आलेली नसते .... त्या कवितेत अर्थ नसतो ...
अर्थ असला तर त्या अर्थाला काव्याच्या शेडस नसतात वगेरे वगेरे.
आज हा
मित्र ओर्कुट किंवा थोपू वर वाचत नाही / लिहित नाही कारण त्याचा अपेक्षाभंग
होतो ... दर्जा सुधारत नाही ... दाखवलेल्या उणीवा सुधारणे तर दूरच पण
लोकांना ते रुचतहि नाही ... आणि दर्जाहीन लेखनाला छान म्हणणे याला पटत नाही
!
तुम्ही काय करता ...? वाचनात आलेल्या आणि नआवडलेल्या रचनेला
छान म्हणता ..../ आवडली नाही म्हणून सांगता / उणीवा दाखवता / कि तटस्थ
राहता ..... ?
तुमची प्रतिक्रिया काहीहि असो ... ती प्रामाणिक असली
पाहिजे... उणीवा असतील तर त्या दाखवल्या पाहिजेत. मराठी कवितेचा दर्जा
वाढवण्यासाठी आपल्यातील वाचकांना आणि साहित्यिकांना समीक्षक मित्रांची
भूमिका कठोरतेने पार पडावी लागणार आहे, आणि लेखक / कवी मित्रांना आपल्या
कवितेवरील प्रतिक्रियेचा विचार कवितेचा दर्जा सुधारण्यासाठी करावा लागणार
आहे !
यावर अनेक लोकांची अनेक मते असतील ...
कोणी म्हणेल "कोण म्हणतो कवितेचा दर्जा घसरलेला आहे ?"
कोणी म्हणेल "मी वाचकांसाठी कविता लिहितो ती त्यांना आवडते"
कोणी म्हणेल "मी माझ्यासाठी कविता लिहितो .... मला त्याचे काय ?"
"मी आतून आल्याशिवाय कविता लिहित नाही ..."
"मी ठरवून कविता लिहितो ... हव्या त्या विषयावर लिहू शकतो "
अनेक प्रश्न आहेत .... उत्तर कदाचित मिळणार नाहीत ... पण प्रयत्न जरुर करूयात ...
बोला तुम्हाला काय वाटते .....?
कशी आहे आणि कशी असावी मराठी कविता ?
ㅤ
ReplyDeleteचर्चेला विषय चांगलाच घेतलाय...!
गेल्या शंभर वर्षातलं मराठी साहित्य आणि आजकाल इंटरनेटवर उपलब्ध साहित्य यांची तुलना करायची झाली तर मला काही मुद्दे लक्षात आले....
१) पूर्वीच्या कविंचा विचार केला तर जवळजवळ प्रत्येकजण त्या काळात उपलब्ध असलेल्या पूर्वीच्या साहित्य/काव्याचं अध्ययन केलेला जाणकार होता. केशवसुतांसारख्या संस्कृतप्रचुर वृत्तबद्ध करणाऱ्या कविश्रेष्ठाचा इंग्रजी व संस्कृत काव्याचा दांडगा अभ्यास होता.... त्यांच्या कवितेवर इमर्सनच्या शैलीचा स्पष्ट प्रभाव तर त्यांनी स्वत:च मान्य केलेला आहे. रविकिरण मंडळासारखे उपक्रम केवळ आपापल्या रचनांचं प्रदर्शन करण्यासाठी बनविलेले नसून साहित्य व काव्याच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रदीर्घ सविस्तर चर्चा करण्यासाठी बनलेले मंच होते. माधव ज्युलियन, शान्ताबाई शेळके वगैरे मान्यवरांचा चौफेर व्यासंग तर चकित करणारा आहे. गीतरामायण लिहिण्यापूर्वी कविवर्य गदिमांनी मूळ महाकाव्य आणि दर्शनशास्त्राचा सखोल विचार केलेला होता, हे तर मी माझ्या स्वत:च्या माहितीवरून सांगू शकतो. त्या काळातले बरेससे कवि-लेखक हे जगभरच्या साहित्याचे समीक्षक म्हणून सुद्धा आदरणीय होते.
आज दुर्दैवाने असा प्रयत्न होताना फारसा दिसत नाही. आजच्या घटकेला रचना प्रकाशित करणारांची संख्या तर अनेक पटींनी वाढलेली दिसते (अर्थात त्यात इंटरनेटच्या नि:शुल्क माध्यमाचा फार मोठा वाटा आहे...!!) परन्तु यांच्यापैकी किती जणांनी साहित्य/काव्य यांच्या परंपरांचं किंवा देशोदेशीच्या जुन्या कवि/लेखनांच्या रचनांचं सविस्तर अध्ययन केलं असेल... हा प्रश्न न विचारलेलाच बरा...!!
२) "आतून आलं आणि लिहिलं गेलं" हा युक्तिवाद ही तर मोठी हास्यास्पद कविकल्पनाच वाटते. कविवर्य सुरेश भटांसारख्या दिग्गजाची एकेक गझल एकेका शेरासाठी पंधरा-पंधरा दिवस रेंगाळत लिहिली गेली आहे, हे तर त्यांनी स्वत:च सांगितलंय. केशवसुत, बा.भ.बोरकर, भा.रा.तांबे यांसारख्या ज्येष्ठांच्या रचनांचं एकदा प्रकाशित झाल्यावर सुद्धा दोन-दोन चार-चार वेळा पुनर्लेखन आणि परिवर्तन झालेलं दिसून येतं. "आतून आलं"चा दृष्टिकोण एखाद्या रचनेमागची ढोबळ भावना/विचार यांच्यापुरता स्वीकारला जाऊ शकतो... पण संपूर्ण रचना एकटाकी लिहिण्याची आजकाल रूढ होत चाललेली पद्धत काव्य/साहित्याच्या दर्जावर विपरीत परिणाम करणारीच आहे असं माझं स्पष्ट मत आहे. या पद्धतिमुळे मनात त्या क्षणी आलेला भाव शब्दबद्ध होतो, पण भाषेचं सौष्ठव, काव्यालंकारांचं सौन्दर्य, सुरुवातीला मनात आलेल्या भावनेचे विचारात घेण्यायोग्य विविध पैलू आणि कंगोरे... या सर्व निकषांवर या रचना फारशा टिकत नाहीत.
ㅤ
३) दर्जेदार काव्य/साहित्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं कालजयी असणं... आत्ता समोर असलेल्या मूठभर समकक्ष लोकांना आकर्षक वाटणारी (आजकालच्या भाषेत लोकांपर्यन्त "पोचणारी"...) रचना वेगळ्या काळात, वेगळं अनुभवविश्व असणाऱ्या लोकांना तितकीच अर्थपूर्ण वाटू शकली तरच ते त्या रचनेच्या कालजयी असण्याचं लक्षण आहे. आपल्या म.क.समूहात गेल्या दोन-तीन पिढ्यांच्या पाठ्यपुस्तकांमधल्या रचना संकलित करण्याच्या एक उपक्रम परिश्रमपूर्वक झाला आहे... जरा त्यापैकी कोणतीही रचना वाचून पहा.... पन्नास-शंभर वर्षांपूर्वीची प्रत्येक रचना आजच्या वाचकाच्या मनाला सुद्धा तितकीच भुरळ पाडताना दिसते...! कालिदास आणि शेक्सपिअरसारख्या कविश्रेष्ठांच्या रचना शेकडो वर्षांनंतर सुद्धा काव्य म्हणून आजही तितक्याच आकर्षक आहेत.... त्यांच्यातील काव्यगुणांमुळे आणि भाषेच्या सौन्दर्यामुळे जगभरच्या लोकांच्या गंभीर अध्ययनाचा विषय सुद्धा बनलेल्या आहेत.
आत्ता जे सुचलं ते लिहिलंय.... चर्चा झाली तर आणखी विचार मांडता येतील.
कशी गम्मत आहे बघा marathi blogs.net वर तुमच्या पोस्त च्या वरतीच माझी कवितेची पोस्त आली आहे.
ReplyDeleteतुम्ही म्हणताय ते ठीक आहे पण बऱ्याचदा सर्व सामान्य माणूस स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी कविता लिहितो. म्हणजेच त्या कविता 'अ' प्रकारच्या जास्त असतात. पण जर इतर मोठे कवी जे चित्रपटांसाठी लिहितात त्यांचे सांगणे कठीण आहे. त्या बाबतीत तुमचे म्हणणे बरोबर असेल कधाचित. त्यात सुधारणेला वाव आहे खूप.
स्वामीजी, चर्चा होणारच आणि करावीच अशी इच्छा आहे ....
ReplyDeleteबर्याचदा आपण म्हणतो .... जुन्या काळातील हिंदी मराठी गाणी आज हि आपली ओठांवर सहज रुळत असतात, पण त्याच तोडीस - तोड नवीन गाणी त्या त्या कालखंडात अगदी दणक्यात वाजत असतात मग ते " हवा हवा ये हवा... असोकी ...., वन टू का फोर" असो पण हि गाणी जितक्या दणक्यात वाजतात तितक्याच दणक्यात निघून जातात. याचाच अर्थ ती त्या काळाची गाणी असतात. कदाचित ती भावनाशुन्य आणि उडत्या चालीची असल्यामुळे हि काही काळ लोटला कि त्यांचे अस्तित्व जाणवत नाही. तसेच काही खास, हळवे आणि नवीन शब्द माधुर्य देणारी गाणी नेहमीच वेगळी आणि उठून दिसतात ... जसे "मन उधान वार्याचे... गुज पावसाचे, वार्यावरती गंध पसरला ...हे गाव माझे." अशी काही मराठी गाणी त्यांच्या वेगळेपणामुळे नक्कीच रसिकांच्या मनात घर करून राहतील.
"वार्यावरती गंध पसरला ..... " या गाण्याचे गीतकार कवी दासू वैद्य यांची एक मुलाखत मी एकली आहे त्यात त्यांनी म्हटले होते "मी अगदी १-२ चित्रपतानसाठीच गाणी लिहिली, कारण मी कवी आहे दिलेल्या साच्यात माझी कविता बसवणं मला रुचत नाही" त्यातून हि त्यांनी ज्या रचना केल्या त्या अप्रतिम आहेत.
चित्रपटातील गीत लेखनाच्या बाबतीत बोलायचे झाले तर पूर्वीच्या काळी गीतकारांना गाणं लिहिण्यासाठी जे स्वातंत्र्य मिळायचे ते कदाचित आज मिळत नसावे. आणि या परिस्थितीला हि जवाबदार कवी मंडळीच आहेत ..... लेखन दर्जेदार असेल तर तुमच्या अभिव्यक्तीला कोणीच बंधन घालू शकत नाही... म्हणूनच गुलजार जे लिहितात त्याचा सोनं होतं ....नव्हे ते मुळात सोनंच असतं !