Feb 21, 2012

इथं असंच होतं


कोणालाच - कोणाची चिंता नसते ...
जो तो आपलीच कातडी वाचवण्याच्या प्रयत्नात असतो.
कधी कंपूशाहीत सामील होण्यासाठी ...
कधी सत्तेत येण्यासाठी ....
तर सत्तेत आल्यानंतर सत्ता टिकवण्यासाठी.

वारे तापते ...
सभांचे, भाषणांचे, आश्वासनांचे,
आरोप-प्रत्यारोप, शिव्याच्या लाखोळ्यांचे
आणि गटारगंगेतील राजकारणाचे  !            

वाभाडे काढले जातात, 
पाय ओढले जातात.
कधी तत्वांचे, कधी आदर्शांचे
कधी देशाचे, तर कधी लोकशाहीचेही.

काही जेलमध्ये जातात,
काही बाहेरसुद्धा येतात.
पुन्हा नवे डाव मांडतात ...
कालचे कावळे,
आज पुन्हा बगळे होतात ....
धुतल्या तांदळासारखे ...
उजळ माथ्याने फिरू लागतात.

तुम्हा-आम्हाला काहीतरी चुकल्यासारखं वाटत,
'पूर्व-पश्चिम' हुकल्यासारखं वाटत.
कधी वाटत ...      
आपणच झोल आहोत
हे सगळं समजून घेण्यासाठी ...
आणि समजलेच तर पचवून घेण्यासाठी,
फोल आहोत !
...
...
...
इथं
जे नको आहे तेच होतं.
घोड्यावर पैसा लावला कि ...
गाढव निवडून येतं.
चुकून घोडं निवडून आलंच ...
तर त्याचं सुद्धा गाढव होतं
इथ असंच होतं

कारण ...
इथं असंच चालतं !
  
- रमेश ठोंबरे

No comments:

Post a Comment