Feb 23, 2012

फार फार बरं वाटलं

माझ्या ऑफिसपासून घराच अंतर तसं कमीच आहे गाडीवर वेगात असलं कि जाणवत हि नाही पण कालच पायी जाण्याचा योग आला तेंव्हा रोजचाच रस्ता नवीन वाटलं, अनोळखी दोस्तांच्या ओळखी झाल्या, तेवड्याच वेळात मोबईलवर उतरलेले हे अनुभव !     


फार फार बरं वाटलं

दररोज जातो गाडीवरून
काल असाच चालत गेलो
फार फार बरं वाटलं
चालणं सुद्धा खरं वाटलं.

चालता चालता करणार काय ?
आपलाच रस्ता आपलेच पाय  !
म्हणून जरा निवांत झालो
कमी स्पीडने सावकाश गेलो.
घड्याळाला हरूण आलो,
पण हरणं सुद्धा जाम पटलं ....  
फार फार बरं वाटलं
चालणं सुद्धा खरं वाटलं.

रस्त्यात दिसला तोच खड्डा,
रोज त्याला वळून जातो.
तो सुद्धा आपला वाटला,
आज त्याला भाळून गेलो.
खड्याकडे पाहताना ....
उगाच मन आतून दाटलं        
पण... फार फार बरं वाटलं
चालणं सुद्धा खरं वाटलं.

रस्त्यात एक भेळवाला,
रोज आशेनं पाहत असतो ...
आज त्याला खरं केलं, 
त्याचं देणं त्याला दिलं.
किती किती हलकं झालं
डोक्यावरचं वजन घटलं.
फार फार बरं वाटलं      
चालणं सुद्धा खरं वाटलं.

रस्त्यामधला एक चौक,    
नेहमी गोल फिरत असतो
आज थोडा सुस्त दिसला,
रोजच्यापेक्षा मस्त दिसला
एक हिरवी सुंदर गाडी ...
तिचं बोनट त्याला खेटलं  
फार फार बरं वाटलं      
चालणं सुद्धा खरं वाटलं.

रस्त्यावरचं एक वळण
उगाच वाकड्यात शिरत  होतं
मी आपला सरळच पण ..
मलाही त्यातलाच धरत होतं.
मी तिकडं केलो नाही.
इतकी सुद्धा प्यालो नाही     
जरी होतं मन पेटलं,
फार फार बरं वाटलं
चालणं सुद्धा खरं वाटलं.

चालून पाय थकले नाहीत
रस्ता सुद्धा चुकले नाहीत
सरळ सरळ घरी आले
इतके सुद्धा हुकले नाहीत
स्वतःच स्व:ताशी बोलणं वाटलं
फार फार बरं वाटलं
चालणं कुठ चालणं वाटलं
स्वतःच स्व:ताशी बोलणं वाटलं !

- रमेश ठोंबरे
(ढापलेली गाणी)


  
 

No comments:

Post a Comment