Mar 18, 2012

बाकी सगळं खोटं आहे !



प्रेम बीम झूट आहे,
सगळी सगळी लुट आहे.
सगळं सगळं लुटून
शेवटी ताटातूट आहे.

बजेट बिजेट थेर आहे
उगी जीवाला घोर आहे
भांडणारा हि चोर आणि
मांडणारा हि चोर आहे

नेत्याकडून विश्वास नाही,
तिकडून कुठलीच आस नाही.
एक पंचवार्षिक संपली कि
बाकी काहीच खास नाही.

शिक्षणाच्या आयचा घो
शिकून सवरून कपडे धो !
अंगठेबहाद्दर संस्था चालक
नुसता करतो यस -नो !

माझं-माझं कसलं काय ?
खाली मुंडकं वर पाय ! 
कालपर्यंत सुंदर होतं
आज काहीच दिसत नाय. 

निरस मन थोटं आहे, 
दु:ख किती मोठं आहे ...
'एक ओळ कवितेची'   
बाकी सगळं खोटं आहे !  


- रमेश ठोंबरे


  

No comments:

Post a Comment