Apr 10, 2012

मी जागा शोधतो आहे ...


दुनियेच्या गर्दी पासून दूर
वखवखलेल्या नजरेपासून दूर
या इथे निवांत ....
काळोखलेल्या रात्री ...
तुझ्या रेशमी केसांच्या छायेत
मी हरून जायचो भ्रांत.

तू म्हणायचीस हि कसली रे जागा ...
हीच का आवडते तुला .... ?

का नाही आवडणार ....?
काळोखाला साथ करणारा चंद्र ...
शांततेचा पुरस्कर्ता हा वाडा..
निसर्गाच्या जिवंतपणाची साक्ष...देणारे हे वृक्ष !
वार्यासोबत डोलणारी हि हिरवळ.

सगळेच कसे असून हि नसल्यासारखे
तू येईपर्यंत साथ करणारे ...
आणि तू आली कि ...
.... आपलं स्वतःचही अस्तित्व विसरणारे.

तुला फक्त चंद्र आवडायचा ...
तू पुन्हा पुन्हा म्हणायचीस
या चंद्राप्रमाणे आयुष्यभर ..
तुझी साथ हवी आहे ...
मी हो म्हणायचो आणि
कधी तुझ्याकड अन
कधी चंद्राकड पाहत बसायचो ..!
..
...
....
आता तुलाच ही जागा जास्त आवडत होती.
माझ्या आधी तू हजर झालीस, तेंव्हाच समजलं होतं ...
पण इतकी आवडेल असं वाटलं नव्हतं  ....

.... तू चीरनिद्रेला कायमचं सर केलंस ....
चंद्राच्या नितळ छायेत घर केलंस ... !

मी मात्र आणखी ही ....
जागा शोधतो आहे ...
इथेच तुझ्या शेजारी !

- रमेश ठोंबरे

No comments:

Post a Comment