Feb 28, 2013

निरोप



गहिवर आहे मनी दाटला, अन डोळ्यांशी पाणी 
हात रिते, बघ विसरून गेली, आठवणींची गाणी
र्हदयामधल्या सानफुला, तुज निरोप कैसा देवू ?
तू नसताना सांग मला तू, गाणी कुठली गावू ?

मला आठवे पुन्हा पुन्हा तो हट्ट तुझा लडवाळी
'एक बाहुला दे ना आणून, देईल तुजला टाळी !'
नको नको म्हणताना मी तो हट्ट पुरवला होता,
काळजात या थरथर झाली, त्याने तुजला नेता. 

ठेवणार तो तुला सुखाने, तुझा बाहुला राणी
समजून घे तू भाव मनीचे, अडखळलेली वाणी 
हातामधुनी हात सोडता, नकोस मागे पाहू , 
आठवणींच्या पेठाऱ्याला, आम्ही आठवत राहू !


निरोप तुजला देतो आहे, 'निरोप' म्हणवत नाही
भेटशील तू पुन्हा नव्याने, सांगशील मज काही. 
जाता जाता तुला सांगतो, तोच तुझा सांगाती,
विसरून जावे क्षणभर आता, बालपणीची नाती ! 


आशिर्वचने तुला द्यायला, शब्द तोकडे झाले, 
थरथरणाऱ्या हातांवरती, गतकाळाचे छाले. 
आनंदाने सुरु करावी, नवी नवेली खेळी, 
हट्ट तुझा तो पुरवत राहील, देईल तुजला टाळी ! 


- रमेश ठोंबरे 

2 comments: