रोजचीच आहे
पायपीट सारी
पंढरीची वारी
आठवे गा ॥१॥
सुटता सुटेना
जगण्याची होड
अंतरात ओढ
भेटण्याची ॥२॥
खुणावतो देवा
चंद्रभागा तीर
आता मज धीर
धरवेना ॥३॥
भव चिंता सारी
तुजवरी देवा
म्हणोनि विसावा
चरणाशी ॥४॥
मागणे ते काय
नाही माझे फार
पडावा विसर
जगताचा ॥५॥
एक व्हावे मन
एक व्हावे तन
आणिक वर्णन
काय करू ? ॥६॥
शेवटचे देवा
मागतो मागणे
येणे आणि जाणे
घडू दे गा ! ॥७॥
- रमेश ठोंबरे
No comments:
Post a Comment