Aug 19, 2013

|| आज राखीचा ग सन ||



आज राखीचा ग सन,
धाव घेई माझ मन ||
माझ्या ताईच्या मायेच,
सर्वात मोठं धनं ||१|| 

नको आडवू मज,
सखे आजच्या दिवशी || 
बंधूप्रेमावीन ताई,
राहे सालभर उपाशी ||२||

तिला भेटायला आज, 
झाला जीव हा व्याकूळ | 
राखीच्या निमित्तान 
आज काढलाय वेळ ||३||

हट्ट सोड तू ग प्रिये 
या आजच्या रातीचा ||
नाही राखीहून मोठा,
हा विरह प्रीतीचा ||४||

उगा नको रुसू,
आज आनंदाच्या क्षणी ||
भाऊ तुलाही आहे,
ठेव त्याला हि ध्यानी ||५||

परी प्रियेचा तो हट्ट,
नाही नाही कमी झाला |
अशा पेचामध्ये बंधू,
पार वैतागून गेला ||६||

काय कराव म्हणे, 
आसल्या या क्षणी ||
एकीचा मी आहे भाऊ,
आहे एकीचा मी धनी ||७|| 

पण नाही नाही आता,
आता थांबणार नाही ||
एक बहीणच आहे,
तिला टाकणार नाही ||८||

भाऊ निघाला हो आता,
सारे बंधन तोडून ||
एक दिवसासाठी,
सुखी संसार मोडून ||९||
...
आला धावत पळत,
घोट आसवांचा गिळत ||
बहिणही होती तशी,
भावालाच न्ह्याळत ||१०||

उभी दारात बहिण,
हाती रेशमाची राखी ||
ऐकता भावाची कहाणी,
झाली मनोमनी दु:खी ||११||

ओलावल्या नयनांनी,
तिनं बांधियली राखी || 
पाठीराखा भाऊ माझा, 
मी ही तुझी पाठीराखी ||१२||
...
आता बहिण निघाली,
बंधू भावाच्या दारी ||
विनवण्या वाहिनीला 
मोडलेल्या संसारी ||१३|| 

घरी भावाच्या जाता, 
बहिणीस वहिनी दिसली ||
म्हणे वहिनी तू का ग,
माझ्या दादावरी रुसली ||१४||

भाऊ माझा ग प्रेमळ,
कसा विसरेल तुला ||
एक बायको आहे,
एक बहिण ग त्याला ||१५||

एक पाठशी आलेली,
एक पाठशी जाणार ||
दोघी त्याच्या पाठराख्या 
कसा कुणाला सोडणार ? ||१६|| 

आज राखीचा ग सन 
धाव घेई त्याच मन ||
उद्या तुझच होयील,
पती नावच हे धनं ||१७|| 

- रमेश ठोंबरे
www.rameshthombre.com

Aug 18, 2013

१) बुडीत बेणं ! (अनाकलनीय गोष्टी)

अनाकलनीय गोष्टी

जगात अशा बर्याच गोष्टी घडत असतात ज्या सामन्यांसाठी नेहमीच अनाकलनीय असतात आणि कुठेतरी कुतूहलाचा विषय असतात. काही गोष्टींची उत्तरं मिळतात काही गोष्टींची उत्तरं मिळत नाहीत तर काही गोष्टींची उत्तरं कालांतराने मिळतात. अश्याच काही गोष्टी माझ्याही मनात घर करून असतात कारण मीही सामान्य आहे  …. अश्या काही गोष्टी असह्य होतील तश्या आणि वेळ मिळेल तश्या प्राधन्यक्रमाने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. काही गोष्टींच उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहे तर काही गोष्टी तुमच्या डोक्यात सोडणार आहे, कारण मला माहित आहे एकदा किडा वळवळला कि तुम्ही हि स्वस्थ बसणार नाहीच आणि त्यातूनच कदाचित मला न सापडलेल्या गोष्टींची उत्तरे मिळू शकतील !  
 ……………….………………. ………………. ………………. ………………. ………………. ……………….    

१) बुडीत बेणं !

मला माहित आहे, आता 'बेणं' म्हणजे काय हे सुद्धा कदाचित सांगावं लागलं पण हरकत नाही, तो हि सामान्य डोक्यातून आलेलाच प्रश्न असेल त्यामुळे त्याचं उत्तर देणं हि आलच. बेणं म्हणजे काय हे सगळ्या शेतकऱ्यांच्या लेकरांना माहित आहेच जरी ते नामशेष होत आलं असलं तरी. निदान 'काय अवकाळी बेणं आहे हे ?' या अर्थानं तरी नक्किच माहित असणार.

आपणा सगळ्यांना माहित असेल … पूर्वी पेरणी अगोदर मागल्या वर्षीचं चांगल्या प्रतीचं धान्य निवडून ते बाजूला ठेवल्या जायचं  … पुढच्या वर्षी शेतात पेरण्यासाठी, आज हे प्रयोग बहुतेक करून फक्त 'उस', 'अद्रक' अश्या काही पिकांसाठीच केले जातात, पण काही शतकांपूर्वी जे शेतात पेरायच आहे ते घरीच मिळायचं हे बीज म्हणजे 'बेणं' (इथे 'बेणं' असं प्रत्येक पिकासाठीच्या प्रजननक्षम बियाण्याला म्हटलं जातं का कि फक्त बेणं म्हणजे उसाचं ! हा हि प्रश्न आहे !). बेणं हे चांगल्या प्रतीच असाव म्हणून ते निवडून घेतलं जायच, चांगल्या प्रतीच म्हणजे जे प्रजननक्षम असेल असं ! पण आजकाल शेतात काही पेरायचं असलं तर शेतकऱ्याला तालुक्याच्या दुकानात धाव घ्यावी लागते सोन्यासारखा भाव देवून प्रक्रिया केलेलं बियाणं विकत घ्यावं लागतं, आणि 'ते पेरलं तरच उगवतं आणि जे पेरलं ते परत 'बेणं' म्हणून वापरता येत नाही !' ते उगवत नाही किंवा त्याची उगवण्याची क्षमता कमी असते म्हणजे ते नपुंसक असतं असंच म्हणावं लागतं ! कमी जमिनीत, कमी मेहनतीत जास्तीत जास्त पिक घेण्याच्या हव्यासापोटी सामान्य शेतकरी (शेतकरी सामान्याच असतो तरी) या दुष्ट चक्रात अडकला आहे आता त्यातून सुटका होईल असं वाटत नाही !

आज बाजारात मिळणारे फळे / भाजीपाला पहा, त्यांचा पूर्वीचा नैसर्गिक रंग केंव्हाच नाहीसा झाला आहे, मिरचीचा रंग हिरवा असतो, लाल असतो, पिवळा असतो कि केशरी ? गावरान काकडी हिरवी असते कि पिवळी ? वांग्याचा रंग हिरवा पंधरा कि जांभळा ? एवढेच काय आकार पण बदलले आहेत, चव तर विचारूच नका, कारण खरी चव आपल्याला माहितच नाही, सांगा किती जणांना छोट्या काकडीची चव माहित आहे ? माहित असणारांना आठवते आहे ?

तर हे सगळ अश्या पद्धतीने चाललं आहे, आता तर इकडे हि चायना मार्केट आलं आहे. पण चिंता करण्याची खरी गोम वेगळीच आहे. मला सांगा जे आज शेतात पिकतं ते बियाणं नंतर 'बेणं' म्हणून कामाचं नाही (प्रक्रिया केल्याशिवाय), उगवत नाही ! ने नपुंसक नाही ?…. आणि ते खाल्ले तर तुमच्या क्षमतेचं काय ? जरा विचार करा सध्या माणसातील नपुंसकतेच प्रमाण किती वाढले आहे …. ? भयंकर आहे ! ढोबळमानानं  पहिलं तर २५% जोडप्यांना प्रजनन प्रक्रियेत काही न काही अडचणी येत आहेत, प्रक्रिया केल्या शिवाय ते या गोष्टींसाठी सक्षम होत नाहीत !

लोकसंख्या वाढीच्या उद्रेकापोटी आपली भूक वाढत आहे आणि आपण खूप काही चांगल्या गोष्टी विसरत चाललो आहोत, गमावत चाललो आहोत, नव्हे त्या आपणच बुडीत काढत आहोत. हे सगळ पाहिलं कि वाटतं लोकसंख्या वाढीवर उपाय या दुष्ट चक्रातून सुटका  म्हणून 'मनुष्य जसा अनिर्बंध कुत्र्यांची पैदास रोकण्यासाठी त्यांची नसबंदी करत असतो' तोच प्रयोग तर निसर्ग मनुष्य जातीवर करत नसेल ?  एक दिवस 'मनुष्य जातीवरच' 'बुडीत बेणं' असा शिक्का लागू नये म्हणजे मिळवली …. नाहीतर आहेतच पुन्हा तालुक्याची दुकानं !

- रमेश ठोंबरे    

Aug 13, 2013

गझल


कोणता आजार आहे ?
चेहरा लाचार आहे 

कर्म आता 'म्यान' केले
बोलणे तलवार आहे

फाटले आभाळ तेंव्हा
घेतला कैवार आहे

दु:ख झाले फार आता
मांडला बाजार आहे !

देश 'गांधी' लाच घेतो
तूच साक्षीदार आहे !

सत्यता सांगू कशाची ?
'सत्य' ही बेजार आहे !

लोकशाही 'हास्य' झाली
हासतो 'सरदार' आहे !

- रमेश ठोंबरे 

Aug 7, 2013

एक वळवळणारा किडा



आज एकदाचा सोक्ष-मोक्षच लावायचाच 
असा पक्का इरादा करून …. 
सात माजली इमारतीच्या पायर्या चढून… 
गच्चीवर आलो … 
बापू आधीच पोचले होते,
माझीच वाट पाहत होते …!

माझ्या छातीचा भाता झालेला पाहून
माझ्याकडे एक कुत्सित नजर टाकून
बापूनी विचारले !
'बोल काय म्हणतोस ?'

मी धापा टाकत म्हणालो ….
"तुम्हाला काही बोलायच तर
हे अस … सातव्या मजल्यावर याव लागत…
नाहीतर त्या तिथे खाली बोलत बसलो तर …
लोक वेड्यात काढतात मला"

"कालच तो श्याम म्हणत होतो,
माझ्या बोलण्यात राम नाही म्हणे
माझं एकतर्फी बोलणं असत्य वाटतं त्याला !
तुमच्याशी माझं बोलणं असत्य ठरवतात हे लोक…

आणि तो पहा तिकडे तो नईम …
रस्त्यावरच हिंसेचा ठेला मांडून बसलाय.

द्वेष आणि इर्षा तर यांच्या जगण्याची
तत्वच बनलीत !

आणि अशांती तर प्रत्येकाच्या
डोक्यात थयथयाट करत असते.

मग मला सांगा बापू कुठे दिसतेय तुम्हाला …
सत्य, अहिंसा, प्रेम आणि शांती ?

बापू खाली बोट दाखवत म्हणाले …
"एवढ्या दूरवरून नाही दिसणार ती.
ती तर तिथेच आहे, जिथून तू पळ काढलास ….
जिथे तू 'असत्य, हिंसा, द्वेष आणि अशांती'
पाहिलीस तिथेच तुला
'सत्य, अहिंसा, प्रेम आणि शांती !' हि शोधावी लागेल !

मी खाली वाकून पाहू लागलो ….
शामची टपरी, नईमचा ठेला आणि विस्तीर्ण वस्ती !
थोड्या वेळाने मागे वळून पाहतो तर बापू निघून गेले होते
माझ्याच डोक्यात पुन्हा एक नवीन किडा सोडून….
आणि तो अजून हि वळवळतो आहे !

- रमेश ठोंबरे 

Aug 2, 2013

अनुभूती


तुझं हळूच कुशीत शिरणं, 
रजईशी खेळणं, 
नाक, डोळ्यांचं चुंबन घेणं, 
कधी दोन्ही पाय अंगावर टाकणं,
ओठातल्या ओठात पुटपुटणं….
अन माझी जराशीच मान वळली,
दुर्लक्ष झालं कि ....
"माझ्याकडं बघा ना !" असं हक्कानं सांगणं,
आता चांगलच अंगवळणी पडलंय !

पुन्हा एकदा बालपणाची अनुभूती….
किती सुखद असते नाई ?

- रमेश ठोंबरे
(अनुभवसाठी…. )
www.rameshthombre.com

Aug 1, 2013

महात्म्याच्या देशात



आर्थिक मंदी, स्वीसब्यांकांची चांदी. 
कोठ्याचे भक्षक, महागाईचा राक्षक. 
नेत्यांच पोषण, बालकांचं कुपोषण. 
मंत्र्यांच भाषण, संपलेलं रेशन. 
पंचवार्षिक निवडणूक, नंतरची अडवणूक. 
देशाचा राजकारण, चरह्याईत कुरण. 
देवांची चोरी, बलात्कारित पोरी. 
पुढाऱ्याच ज्ञान, जनतेच अज्ञान
जातीची आरोळी, माजलेली टोळी. 
आरक्षनाच दुकान, दानात दान !
अनुदानावर टाच, सरकारी लाच. 
रक्तरंजित क्रांती, निस्तेज शांती.

देशाचं राजकारण तुमच्या आमच्या खिशात … 
तरीही म्हणूयात …? 
जे काही घडतंय ते … 
महात्म्याच्या देशात 

- रमेश ठोंबरे 

..........

..........

देता येईल, एक स्वप्न दे, पहाटलेले 
नकोत मजला सन्मानाचे उधार शेले 

दु:खाला मी वाट मोकळी करून देता 
सुखही थोडे त्याच्या सोबत निघून गेले. 

विसरलीस तू, आणा-भाका, सगळे सगळे 
आठवते मज, अंग जरासे, शहारलेले 

जरी सांगतो 'भरले गोकुळ दौलत असते,' 
खुणावती मज आठवणींचे रितेच पेले !

म्हणालीस तू 'जगात नाही माझे कोणी' 
तू गेलीस अन दुनियेने बघ मुंडन केले 

- रमेश ठोंबरे

येथील पावसाळा



भलताच पोचलेला, येथील पावसाळा
नेतेपणात गेला, येथील पावसाळा 

आजन्म योजलेला, दुष्काळ घोर आहे
चिंतेत साचलेला, येथील पावसाळा. 

झाडे जळून गेली, माती उजाड झाली 
आम्ही पसार केला, येथील पावसाळा.

करपून पिक जाता, लटकून बाप गेला 
त्यानेच सोसलेला, येथील पावसाळा 

आनंद त्यास होतो, पाहून प्रेत यात्रा
सरणात नाचलेला, येथील पावसाला 

सांडू नकोस धारा, कवितेतुनी रमेशा 
पाण्यात बाटलेला, येथील पावसाळा

आहे जिवंत आहे, सोडेल थेंब ओला
नाही अजून मेला, येथील पावसाळा.

- रमेश ठोंबरे 

ओठावरती घ्यावे म्हणतो

ओठावरती घ्यावे म्हणतो 
तुला गुणगूणावे म्हणतो ! 

अश्रू होवून पदरी पडलो 
मोती बनून जावे म्हणतो 

आठवून मी थकलो तुजला 
आठवांत तव यावे म्हणतो 

तीमिराचा या नाश कराया 
स्वत:च 'समिधा' व्हावे म्हणतो 

कुशीत तुझिया डोळे मिटुनी 
मृत्यू गीत हे गावे म्हणतो 

.......................................................................
"अपने होंठों पर  सजाना चाहता हूँ" 
- क़तील शिफ़ाई भावानुवाद - रमेश ठोंबरे 
...................................