Oct 27, 2013

तू दूर क्षितिजापर्यंत जावून ये …


तू दूर क्षितिजापर्यंत जावून ये … 
आभाळ जिथ धरतीला टेकलंय ते आभाळ पाहून ये. 
घाई करू नकोस, 
कुठल्याही निष्कर्षाला पोहचण्याची …
जगण्याचा वेग थोडा मंद कर … 
धावू नकोस नुसताच … 
जगून घे !

कुठल्याच गोष्टी नसतात अंतिम सत्य …
त्यांनी लिहून ठेवलंय म्हणून स्वीकारायचं, 
अन मला पटत नाही म्हणून नाकारायचं. 
याला काय म्हणायचं ? 

घाई करू नकोस, 
अनुभवाच्या कसोटीवर घासून घे 
तुझ्या सद्सद विवेक बुद्धीने तपासून घे !

मन सुद्धा बोलतं कधी कधी सत्य,
त्यात हि मानत जा तथ्य !
मात्र त्याच्यावर हवा थोडा लगाम …
कारण थोडी मोकळीक दिलीस तर धावेल बेफाम !
मन कधी आपलं तर … कधी परकं,
कधी देतं साथ तर कधी लाथ हि !

म्हणून थोडा वेळ जावू दे … 
घाई करून नकोस … सबुरीने घे !
कारण कधी कधी आपण ज्याला अंतिम सत्य मानतो …
त्यात होत असतात बदल,
नवी दिशा मिळाली कि, 
बदलतात व्याख्या 
बदलतात संदर्भ 
बदलतात विचार ! 
म्हणून थोडा वेळ दे …
तू दूर क्षितिजापर्यंत जावून ये … 
आभाळ जिथ धरतीला टेकलंय ते आभाळ पाहून ये. 

- रमेश ठोंबरे 
www.rameshthombre.com

1 comment:

  1. तू दूर क्षितिजापर्यंत जावून ये …
    आभाळ जिथ धरतीला टेकलंय ते आभाळ पाहून ये.
    छानच ....

    ReplyDelete