Dec 22, 2013

समजत नाही



कोण कुणाला जाळत आहे समजत नाही
कोण कुणावर भाळत आहे समजत नाही

सांगत होता सात जन्म मी तुझाच आहे 
आज असा का टाळत आहे समजत नाही 

रगडत आहे वाळू मोठ्या विश्वासाने, 
तेल खरे का, गाळत आहे समजत नाही 

माणुसकी जर मला भेटते गल्लो गल्ली 
दिवस कुणाचा पाळत आहे समजत नाही 

प्रेमाचा जर स्पर्श नकोसा तिला वाटतो, 
मोगरयास का माळत आहे समजत नाही 

गांधीवादी चालत गेले त्या रस्त्यावर 
रक्त कुणाचे वाळत आहे समजत नाही 

- रमेश ठोंबरे 

Dec 19, 2013

माझी बायको जेंव्हा ड्रायव्हिंगच्या मूड मध्ये येते



माझी बायको जेंव्हा ड्रायव्हिंगच्या मूड मध्ये येते
तेंव्हा ती माझ्यासह माझ्या गाडीवर सूड घेते. 
मग स्टेअरिंग, ब्रेक, क्लच, यक्सलेटर … 
सगळे सगळे मला केविलवाणे दिसू लागतात …
गीअरची ती जेंव्हा मुरगाळते मान,
तेंव्हा मीच मानेला झटका देवून घेतो.
इकडे तिकडे पाहत … थोडा मोकळा होवून घेतो.

आता गाडी असते तिच्या नवर्याची म्हणजे तिचीच,
आणि रस्ता तिच्या बापाचा … म्हणजे तो हि तिचाच.
मी मात्र नाविलाजास्तावा शेजारचं शिट अडवून बसलेला असतो.
सुटकेसाठी एक एक सेकंदाची उलटी गिनती करत असतो.

कधी डावीकडं कधी उजवीकडं …
स्टेअरिंग डोकं गरगरन्या इतपत फिरत असतं.
तरीही चाक बिचारं … गप गुमान रस्ताने चालत असतं.
मागे ब्रेक, करकच्ल्याचे … कोणी आडवं झाल्याचे …
कोणीतरी उद्धार केल्याचे…. आवाज येत असतात.
साइड मिररमध्ये मला असे बरेचे चेहरे दिसतात.

तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि
उत्साह मला दिसत असतो…
मी मात्र जीव मुठीत घेवून उसनं हसू हसत असतो.

एका चौकात हि कहर करते ….
सिग्नल लागलेला असताना … यक्सलेटर देते.
गाडी दोन हात पुढे …
मग न सापडणारा
अन मधेच पडणारा रिव्हर्स ….
मागच्या गाडीचा जीवाच्याआकांताने
हॉर्न चा थयथयाट …
मग यक्सलेटरचा पाय ब्रेकवर ….

तेवढ्यात …. शिटी फुंकत … मामा समोर ….
पुन्हा सिग्नल लालचा हिरवा ….
पुन्हा ब्रेकवरचा पाय यक्सलेटरवर ….
मामा तसाच शिटीसह मागे … हतबल … हताश !

पुन्हा … गीअर, यक्सलेटरवर बलात्कार ….
गाडीचे ऐकवणार नाहीत इतके चित्कार … !
मी मात्र थंड आणि षंड !
गाडीवर होणार अन्याय उघड्या डोळ्याने पाहत असतो.
"नाही नाही काहीच नाही …. साधा विनयभंग सुद्धा नाही !"
अशीच कबुली देत असतो !

एवढं सगळं झाल्यावर … वनपीस गाडी …
सोसायटीच्या आवारात …!
नेहमीचा 'पार्किंगचा' स्पार्क अनुभवण्यासाठी
जमलेल्या आवारा टोळक्याच्या ताब्यात !

''मागे घ्या, वाहिनी पुढे …
राईट … राईट … राईट ….
राईट … म्हणजे 'बरोबर' नाही हो 'राईट' घ्या
उजवीकडे घ्या हो …
आता लेफ़्ट … मागे मागे मागे या या या …
या मागे मागे … हं लागली !"

नंतर कोणी तरी हळूच 'थोडी भिंतीला लागल्याची' सांगतो.

मी पाहणार इतक्यात …
"बडे बडे शहरो में … … "
च्या आवेगात हि मागं ओढते …!
नकळत माझी अक्कल आणि इज्जत सुद्धा काढते.
मी बिचारा, बापडा मनात येईल तसा …
'तिच्या' मनात येईल तसा तिच्या मागून चालत जातो …
आणि एकदाचा आजच्यापुरता हिच्या ड्रायव्हिंगचा अंत होतो !"

- रमेश ठोंबरे