कोण कुणाला जाळत आहे समजत नाही
कोण कुणावर भाळत आहे समजत नाही
सांगत होता सात जन्म मी तुझाच आहे
आज असा का टाळत आहे समजत नाही
रगडत आहे वाळू मोठ्या विश्वासाने,
तेल खरे का, गाळत आहे समजत नाही
माणुसकी जर मला भेटते गल्लो गल्ली
दिवस कुणाचा पाळत आहे समजत नाही
प्रेमाचा जर स्पर्श नकोसा तिला वाटतो,
मोगरयास का माळत आहे समजत नाही
गांधीवादी चालत गेले त्या रस्त्यावर
रक्त कुणाचे वाळत आहे समजत नाही
- रमेश ठोंबरे
No comments:
Post a Comment