Feb 7, 2014

--- निष्कर्ष ---



काळ इतका सोकावलाय कि, 
वाटतं, एक दिवस … 
उलथा पालथ होईल साऱ्या विश्वाची, 
काहीच खुणा उरणार नाहीत अस्तित्वाच्या. 
भूगर्भात नाहीशी होईल संपूर्ण मानवजात,
हजारो, लाखो, करोडो … आणखी कितीतरी वर्षासाठी.

पुढे कधीकाळी पुन्हा होईल उत्खनन,
त्यावेळी अस्तित्वात असलेल्या पुरातत्व विभागाकडून,
हडप्पा आणि मोहन्जोधडो च्या धर्तीवर.

मानवाच्या शरीराचे अवशेष नष्ट झालेले असतील
तेंव्हा सापडतील फक्त खोल खोल इमारतींची,
अस्ताव्यस्त शहरं.
पुतळ्यांचे खोल खोल चौथरे,
त्याखाली आणखी खोल विस्तीर्ण चौक ….
चौकापासून पळत सुटलेले अतिक्रमित रस्ते …
आणि चौथऱ्यापासून विलग होऊन बाजूलाच पडलेले,
हात, पाय अन काठी तुटलेले …
निराधार, निराश्रित, असहाय्य दगडांचे कितीतरी पुतळे.

तेंव्हा संशोधनाचा एक भाग म्हणून ….
आपल्याच पूर्वजांचे अस्तित्वाच्या खुणा शोधण्यासाठी,
जमा केले जातील सगळ्या पुतळ्यांचे जीर्ण अवशेष,
आणि अभ्यासपूर्वक काढले जातील काही निष्कर्ष !

"इ.स.न. अमुक अमुक वर्षांपूर्वी,
पाषाण युगात वावरत होती उंचच उंच,
दगडाचं काळीज घेवून फिरणारी दगडाची माणसं,
ज्यांनी निसर्गाशी स्पर्धा करून …
गिळंकृत केला निसर्ग आणि,
ओढवून घेतला पाषाण युगाचा अंत !"

- रमेश ठोंबरे 

2 comments:

  1. बापरे ....केवढं खरंय हे....
    आणि या सगळ्यात एकसारखे एकाच माणसाचे इतके पुतळे का? यावर पीएच डी पण केली जाईल आणि एकच पुतळा सर्वात उंच/मोठा का यावरही...

    ReplyDelete