Apr 19, 2014


क्षणा क्षणाच्या आनंदाला मुकलो आहे
स्वप्नांमागे धावून आता थकलो आहे

'उर्मी सोबत पंखांना या धार पाहिजे'
जाळ्यामध्ये अडकून हेही शिकलो आहे !

पुस्तकातले गणित माझे पक्के होते
वास्तवातली गोळाबेरीज चुकलो आहे

गांधीजींना मानत असतो कणखरतेने
म्हणून बहुदा, हिंसेपुढती टिकलो आहे

'ताठ असावा कणा' सांगते काव्य मराठी
त्या काव्याशी पुन्हा पुन्हा मी झुकलो आहे.

- रमेश ठोंबरे 

No comments:

Post a Comment