गावकीच्या हिरीवर सारं गाव पाणी भरायचं
आन हिरीचं पाणी आजूबाजूच्या साऱ्या पिकाला पुरायचं
कुई कुई आवाज काढत दिवसभर मोट चालायची ….
पाटापाटानं निघालेलं पाणी शेवटच्या ताटापस्तोर पोचायचं.
खाली बायका सकाळ-संध्याकाळ पोहऱ्यानं पाणी भरायच्या,
हिरीच्या पाण्याचं घागरभरून कौतुक करायच्या.
आजी म्हणायची,
"बरकत हाय मोटंच्या पाण्याला,
ह्या हिरीन कधी दावला नाही तळ,
आजपर्यंत कधी मोट झाली नाही उपडी
आन हिरीवर गेलेला पोहरा कधी आला नाय रिता.
बरकत हाय हिरीच्या पाण्याला !"
आजी गेली त्या वरसाची गोष्ट ….
हिरीवर मोटंच्या जागी मोटार आली,
आन एका मोटरीच्या पुढं कितीतरी मोटारी झाल्या.
पाटाच पाणी तोंड लपवून पाईपामधून सुसाट पळू लागलं,
बायकांना घरबसल्या नळाच पाणी मिळू लागलं !
थारोळ्यावर मोट उपडी झाली,
पोहरा घरच्या वळचणीला पडला,
परंपरेन आधुनिकतेवर तळतळाट ठेवला
अन गावकीच्या विहिरीनं
कधी नाही तो तळ दावला !
पुढं दरवर्षी हिरीवरच्या मोटारीचा कर्नकर्शक आवाज ऐकला कि,
आजी ढगातून कन्हायची ….
"बरकत व्हती मोटंच्या पाण्याला,
ह्या हिरीन कधी दावला नव्हता तळ,
कधी मोट झाली नाही उपडी आन
हिरीवर गेलेला पोहरा कधी आला नव्हता रिता.
बरकत व्हती हिरीच्या पाण्याला !"
- रमेश ठोंबरे
No comments:
Post a Comment