बापू
तुमचा जन्मदिन आम्ही मर्यादित ठेवला
सरकारी कार्यालयापुरता ….
अन सामाजिक भान म्हणून ….
'राष्ट्रपित्याला विनम्र अभिवादन !'
म्हणत वर्तमान पत्रातील एका कोपऱ्यापुरता.
आम्ही तो रुजू दिला नाही जनमानसात.
कारण …
मग त्याचा झाला असता उत्सव.
… तुमच्या प्रतिमेला हार घालून ….
निघाल्या असत्या चौका-चौकातून मिरवणुका.
'ड्राय डे' दिवशीही झींगली असती तरुणाई.
डीजे वर वाजणाऱ्या 'चिकण्या चमेलीवर'
तर्राट झुंडीन धरला असता ताल .
अन मुजोर वादळात उडाला असता कुणाशीचा झगा
तुमच्याच मिरवणुकीत तुमच्या समोर !
बापू
आमचे आभार माना
खंत करू नकात,
'सरकारी भिंतींशिवाय, कोणीही तुमच्या पाठीशी नसल्याची'
हरिजन, गिरीजन, बहुजनाच्या देवासारखे
कोण्या एकट्याचे नाही आहात तुम्ही !
आम्ही, तुम्हाला म्हणतो,
बापू, राष्ट्रपिता अन महात्माही,
पण देवत्व कधीच बहाल केलं नाही तुम्हाला
कारण तुम्हाला देव्हाऱ्यात बसवलं असतं तर
मग आशाचं मावल्या असत्या
पुन्हा 'गांधी' जन्माला घालण्याच्या !
बापू
तुम्ही आमच्यासाठी सामान्य
म्हणूनच आम्ही दाखवू शकतो तुमचे दोष,
काढू शकतो तुमच्या शिकवणीतील उणीवा
कट्ट्यावर बसून देवू शकतो शिव्या
अन अहिंसा शिकवणाऱ्या कृश देहावर …
झाडू शकतो गोळ्याही बिनधास्त !
. .
. .
. .
. .
. .
आम्ही होवू दिले नाहीत जयंतीचे उत्सव …
आम्ही बहाल केलं नाही तुम्हाला देवत्व,
आम्ही गोळ्या घालूनही जिवंत ठेवले तुमचे विचार ….
म्हणून ……
बापू
तुम्ही आमचे आभार मानायला हवेत !
- रमेश ठोंबरे