गावात डांबरी सडक झाली तरी आज सुध्दा धुरळा उडवितच एस.टी.गावात येते. नदीच्या पलीकडची एस.टी. कोरड्या नदीवरचा पुल ओलांडून आलीकडं पुढं आली की गाव लागतं. आज कित्येक वर्षांपासून कोरडीठाक पडलेली नदी कधीकाळी पुराच्या पाण्यानं ओसंडून वाहायची, पावसाळ्याच्या दिवसात तर पुलावरुन पाणी वाहायचं. रात्रभर पाऊस पडला की दुसऱ्या दिवशी शाळेला सुट्टी मिळायची एक-दोन दिवसांसाठी गावचा संपर्क तुटायचा. गावची सगळी पोरं किमान अर्धा दिवस तरी नदीवर हुंदडत रहायची, म्हशी पाण्यात बसाव्यात तशी दिवस-दिवस पाण्यात डुंबायची.... पण आज तीच नदी कित्तेक वर्षांची तहानलेली आहे. ‘हा पुल नेमका कशासाठी ?’ असा प्रश्न कोण्या नवख्या माणसाला पडावा इतकं नदीच पात्र अरुंद झालयं, नदी तिचं अस्तित्वच हरवुन बसलीय. अशा या कोरड्याठाक नदीच्या दगडी पुलावरुन एस.टी. धडधड करत आली की, वीस पंचेवीस मीटरवर थांबते ते गावचं एस.टी.स्टँड. स्टँडच्या आजुबाजुला बारीक बारीक टपऱ्या, पंक्चरचं दुकान, वारकाचं दुकान, एकाद दुसरं किराणा मालाचं दुकान एवढंच काय ते गावचं आधुनिकीकरण. बाजुलाच प्राथमिक शाळेच्या चार दोन खोल्या, दोन मास्तरांनी आन् साठ-सत्तर पोरांनी भरलेली शाळा. शाळेच्या पटांगणातच एका कोपऱ्याला सरकारी हापसा. अर्ध्या गावाची भिस्त याच हापस्याच्या पाण्यावर असल्याने या हापस्याला कधीच उसंत नसते मध्यरात्रीचे कधीचे तरी चार-पाच घंटे आणि राष्टगीताचे बावन्न सेंकद ऐवढाच काय तो त्याचा विसावा, नाहीतर दिवस-रात्र धाड-धाड आवाज करत हा संथ गतीनं जमेल तसं आणि जमेल तितकं पाणी ओकत असतो. शाळेची प्रार्थना सुरु असली की अर्ध्या पोरांच लक्ष हापस्यावरच्या माणसांकड, कुणाची आई, कुणाची बहीण, कुणाचा भाऊ नित्यानं हापस्यावर हजर असायचे आन् आपलं कुणी दिसलं की लक्ष वेधुन घेण्यासाठी पोरांचे चाळे सुरु व्हायचे. राष्ट्रगीत सुरु झालं की हापस्याचा आवाज बंद व्हायचा अन् हापस्यावरची माणसं शांत उभी रहायची, पण दांड्यावरचा गडी इतकी अधीर असायचा की इकडं ‘भारत माता की…. ’ म्हणलं की तिकडं हापसा ‘जय!’ म्हणायचा.
गावची ही अशी बारक्या पोरांची बारकी शाळा अन् अर्ध्या गावाची तहान भागवणारा हा हापसा यांच एक अतुट नातं होतं, कुण्याच पोरांचा आई-बा स्पेशल वेळ काढून शाळेत यायचा नाही, हापस्यावर आला की मास्तर बोलवून घ्यायचे अन् हालहवाल पुसायचे. मास्तर वर्गात शिकवायचे तेंव्हा अर्धे पोरं हापस्याच्या आवाजाला कान लावून असायचे. हापस्याच्या लहान मोठ्या आवाजाच्या ठेक्यावर पोरं हापस्यावर कोण आलयं याचा आंदाज बांधायचे. कान बाहेर ठेवलेल्या पोराच्या डोक्याच्या दिशेन मास्तर खडूचा तुकडा फेकायचे आन् भानावर आलेले पोरगं कान अन् डोक्यासगट वर्गात हजर व्हायचं.
चार खोल्यांची, साठ-सत्तर पोरांची अन् दोन मास्तरांची ही शाळा म्हणजे गावकरी, मास्तर अन् शाळेतले पोरं सगळ्यांसाठी निव्वळ टाईमपास होती. वर्ग सुरु असतानांच गावकरी, सरपंच, पोलिस पाटील कोणीतरी थेट बाहेरुनच मास्तरांना हाक द्यायचे. त्यातल्या त्यात हुशार पोराच्या हातात वर्ग देऊन मास्तर बाहेर जायचे ते थेट शाळा सोडायलाच यायचे, तोवर शाळेतले पोरं-पोरी वर्ग डोक्यावर घ्यायचे अन् दुसरे सहशिक्षक डोक्याला हात अन् फुटक्या घडाळाकडं डोळं लावून हेडमास्तरांची वाट पाहत बसायचे.
अशा प्रकारे आला दिवस ढकलत शाळा सुरु असायची... प्रगतीच्या नावाने बोंबाबोंब ... तरीसुध्दा वर्षातुन एकदा शाळेची प्रगती तपासण्यासाठी जिल्ह्याहुन नादर सायब यायचे. तेवढ्या वेळात मास्तर-मास्तर मिळून काहीतरी जुगाड जमवायचे त्यातल्या-त्यात हुशार पोरांना प्रश्न विचारुन शाळेच्या प्रगतीचा प्रश्न तितक्या पुरता सोडवायचे. असेच त्या दिवशी अचानक धावती भेट म्हणुन नादर साहेब शाळा तपासणीसाठी येत असल्याची खबर हेडमास्तरांना लागली. जमेल त्या पध्दतीने जमेल तितक्या कमी वेळात मास्तरांनी पोरांना ‘बाका प्रसंग गुदरल्याची’ जाणिव करुन दिली. नादर साहेब शाळा तपासणीसाठी येणार हे ऐकून पोरं भिजल्या सस्यासारखे पुस्तकात डोकं घालून बसले, समोरचे दोन चार उनाड पोरं ‘हजेरीच्या’ भिती पोटी मागच्या लायनीत जाऊन बसले, समोरची आख्खी लाईन रिकामी झाली अन् दुसऱ्या लायनितल्या पोरांची पाचावर धारण बसली. पोरींनीबी त्यांच्या लायनी जमेल तश्या आकडून घेतल्या. ‘कितीबी आभ्यास केला तरी, सायब नेमका प्रश्न विचारुन गोची करत्यात’, असा दांडगा विश्वास ‘अन् इतक्या सगळ्या हुश्यार पोरातनं नेमकं 'ढ' पोरंगंच कसं शोधत्यात’ याचं आश्चर्य पोरांना असल्यामुळे ‘टेंशन घिवून कायबी होत नस्त’ असं म्हणंत एक एक पोरंग मागच्या लायनित सामिल होत होतं. पोरांची ही सिटींग आरेंजमेंट सुरु असतानाच पुन्हा हेडमास्तर वर्गात आले, अन् अर्धवट उटलेले पोरंगं नेमकं काय करावं हे न समजल्यामुळं त्याच अवस्थेत हेडमास्तरांकडं पाहू लागलं. ‘जा पायजे तिथं जाऊन बस, खिडकीतुन बाहीर गेलास तरी हरकत नाही, पुढं बसुन आकलेचे दिवाळे निघण्यापेक्षा बरचं है ते !’ मास्तर वैतागुन बोलले पण पोराला निर्णय घेता येईना, ते तसच अवघडल्या अवस्थेत हातात दप्तर घेवून मास्तराच तोंड बघू लागलं, बाकी पोरं हातानं तोंड दाबून आवाज आलाच तर तो तोंडातूनच येईल ह्याची दक्षता घेत घेत दात काढू लागले. पुन्हा मास्तरांनी उठलेल्या पोराला तोंडानं ‘हं!’ करुन बोटानं कोपरा दाखवला तसं एका पायावर उभं असलेलं अन् विलक्षण गोंधळात पडलेलं पोरगं दुसऱ्याच क्षणाला भलंतचं डिमांड आलेल्या कोपऱ्यात मोठ्या शिताफीनं स्थानापन्न झालं.
‘तु गण्या, तु चांबाराच्या ... तुक्या, तु टोणग्या, अन् तु ये.. झिपरे... राधे... चला पुढच्या लायनित या...’ - मास्तरांनी त्यातल्या-त्यात आवडत्या आणि हुशार विद्यार्ध्याना खास शैलित फर्मान सोडलं अन् विद्यार्थीही तोंडात धरलेली कॉलर वर करतं शेजार-पाजारच्या पोरांवर अत्यंत तुच्छतेतेची नजर टाकत ऐटीत समोरच्या लायनीत येऊन बसले.
‘हे बघा, नादर सायबांनी प्रश्न विचारला तर, उत्तर येणाऱ्यानीच हात वर करायचे, अन् बरोबर उत्तरं द्यायची, उत्तर येत नसलं तर माझ्या हाताकडं नजर ठेवायची !’ मास्तर सुचना देत होते बऱ्याच पोरांना मागच्या वर्षीच्या अनुभवावरुन हे सगळं अंगवळणी पडलेलं होतं. ‘नादर सायेब आल्यावर आपण फक्त पटसंख्या दाखवण्याच्याच कामाचे आहोत’ हे बहुतेक विद्यार्ध्याना माहित असल्यामुळे ते नादर सायबाच्या डोळ्याला डोळा देण्याचं टाळंत असतं, अन् आल्या प्रसंगाला कसं धीरानं सामोर जाता येईल यासाठी मास्तरवर नजर ठेवून असतं. इकडं मास्तरांची अवस्था ही काही वेगळी नसे, पोरांना विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर कधी कधी मास्तरांकडं ही नसे तेंव्हा मास्तर उगच ‘आलो ऽऽ आलो ऽऽ !’ म्हणत दोन मिनीटांसाठी वर्गाबाहेर जावून वेळ मारुन नेत.
असा हा शाळेच्या प्रगतीचा फार्स वर्षातुन एक वेळेस शाळेत व्हायचा... शाळेची आणि विद्यार्थ्यांची ‘प्रगती’ पाहुन नादर साहेबांना भोवळ यायची, ते हेडमास्तरांच्या खुर्चीत बसुन तासभर मास्तरांना झापायचे, थोड्यावेळानं बाजुच्या टपरीवरचा काळा पोरगा तिन स्पेशल चहा घेऊन यायचा. गरम चहा पिऊन नादर साहेब थोडे थंड व्हायचे, दोन चार समजुतीच्या गोष्टी सांगत ‘अहवालात लिहू का हे आसं.... ?’ म्हणून मधुन मधुन धमक्या द्यायचे ! इकडे सहशिक्षक ठरल्याप्रमाणं नादर साहेब आल्याची बातमी सरपंच आणि पोलीस पाटलांपर्यंत पोहोचवायचे. गावचे सरपंच म्हजें लय भारी माणुस कोणी सरकारी माणुस आपल्या घरी येणार म्हटल्यावर त्यांची छाती टम्म फुगायची .... त्यांना ही बातमी समजली की, लगेच त्यांनी साहेबांच्या, मास्तरांच्या अन् दोन चार त्यातल्या-त्यात प्रतिष्ठीत गावकर्यांसह फक्कट मटनाच्या जेवनाचा बेत तयार करायचा. थोड्याच वेळातं एका पोरानं येऊन जेवन तयार असल्याची वर्दी शाळेत द्यायची …. हे सगळं अगदी दरवर्षी असचं ठरलेले....
यंदाबी... सगळं इन्स्पेक्शन आटोपून, समजुती, धमक्या, सुनावन्या सगळं पार पडल्यावर ‘सायेब आता उशीर झालाचय तवा जेवूनच जा ... !’ अशी गुळणी हेडमास्तरांनी नादर साहेबांवर टाकली. नादर सायब तसे पटकन खुर्चीवर उठले आणि ‘नाही नाही जेवण वगेरे काही नको ... आता निघायला पाहिजे... मला उशीर होतोय, मी एकटाच आहे शिवाय आज जीप पण आणलेली नाही ... मोटार सायकलवर जायचयं ....’ आसं म्हणून टाळू लागले पण ‘‘नाय नाय ... समद तयार आहे ... जेवायला लागलं तेवढाच काय तो येळ ... सरपंचांचा खास आग्रह आहे...’ आसं म्हणून विणवण्या करुन ... शाळेची घंटी वाजवायला सांगुन, नादर सायबांना पुढं घालुन हेडमास्तर, सहशिक्षकांसह सरपंचाच्या वाड्यावर निघतात.
जेवणाचा बेत फक्कड होतो..., गप्पा गोष्टी होतात ... नादर साहेब सरपंचाना शाळेच्या ‘प्रगती’ विषयी बोलतात, अन् सरपंच ’प्रगतीच्या’ शाळेविषयी सांगतात, ‘‘प्रगती’ बिमार होती, उद्या पास्नं पाठवतो शाळेत, पुढच्या येळेस येताल तवा नक्की ‘प्रगती’ दिसंल’’ सरपंचांच्या ह्या उत्तरावर सगळेच हासायला लागतात. नंतर जोक झाल्याचं कळाल्यावर सरपंचबी हसायला लागतात. अशा प्रकारे शाळा तपासणीवर आलेले नादर साहेब विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर नाखुश झालेले असतात पण पाहुणचाराने खुश होऊन गावकर्यांचा निरोप घेतात अन् मोटार सायकलवर टांग मारतात. दणाण फट फट करत मोटार सायकल .... नदीच्या काळोखातुन वर निघून खड्डे चुकवत डांबरी रोडनं सुसाट निघते. जेवनाच्या आन् गप्पांच्या नादात निघायला बराच वेळ झालेला असतो, गावकुसातुन बाहेर पडल्यावर लक्षात येतं की खरचं बराच उशीर झालेला असतो. रात्रीचा अंधार हळू हळू गडद होत चाललेला असतो. नादर साहेबांना आता लवकरात लवकर हा छोटा आडमार्गी रस्ता पार करुन मुख्य रस्त्याला लागायचं असतं म्हणून ते रस्त्यावर नजर ठेवून मोटर सायकलचा कान पिळू लागतात. थंडीचे दिवस असल्यामुळे गार वारा त्यांच्या स्वत:च्या कानावर आदळत असतो, अंगात सुध्दा हुडहुडी भरलेली असते... अशातच गडबडीच्या नादात नादर साहेबांना रस्ता चुकल्याची जाणीव होते... अन् तेंव्हाच मोटार सायकल सुध्दा बंद पडते.... मोटार बाजूला घेऊन नादर साहेब ... पुन्हा पुन्हा किक मारुन पाहतात पण उपयोग होत नाही....मोटार सायकल हु की चुं करत नाही. आजु बाजुचा अंधार आनखीच दाट होऊ लागतो.
किक मारुन नादर साहेबांना घाम फुटतो .... त्यात आता मोटार सायकल ढकलायची पाळी येते, काही आंतर मोटार सायकल ढकलल्यावर साहेब दमुन जातात अन् गाडी बाजुला लावून खाली बसतात. आजु-बाजुला नजर टाकतात अंधारात काहीच दिसत नाही.... डोंगर उतरणीवरून पाच-सहा डोकी हळु हळु दुर जाताना दिसतात ... अन् थोड्यावेळानं उतरणीच्या अंधारात दिसेनासे होतात ... थोड्या अंतरावर एक मोठी शेकोटी धगधगत असते ... तिच्यातुन राखाडी धुर काळोखाच्या काळ्या पडद्यावर उर्ध्वगामी रेषा ओढत आसमंतात विलीत होत असतो. कडक हिवाळ्याचे दिवस असल्यानं आजुबाजुच्या शेतकर्यांनी थंडीपासून रक्षण करण्यासाठी शेकोटी पेटवली असावी आणि आता रात्र झाल्यावर आपआपल्या शेतावर निघून गेले असावेत असा अंदाज बांधत पुन्हा हळु हळु मोटार सायकल ढकलत नादर साहेबांनी शेकोटी जवळ केली. पुन्हा एकदा मोटार सायकल सुरु करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आन् मग हार पत्करुन शेकोटी शेजारी बसुन राहिले. दाट काळोखात सोबत कुणीच नसताना आता त्यांना शेकोटीचीच तेवढी सोबत वाटली, म्हणून ते जवळच्याच एका दगडाला पाठ लावून खाली बसले शेकोटीचा शेक दूरपर्यंत अंगावर येत होता. हळू हळू काळोख आणखीनच दाट होत चालला होता, रात्र इथेच अशी आणि कुणाच्या सोबतीशिवाय एकट्यानेच काढावी लागणार या कल्पनेने त्यांना कापरं भरलं होतं. आता अंधार इतका गडद झाला होता की, शेकोटीच्या उजेडानं विस-पंचेवीस फुटाचा एक परिघ आखुन घेतला होतो त्या परिघाबाहेरच काहीच दिसेनासं झालं होतं. आज अचानक धडक मारुन आपण कोवळया जिवांना अन् गाफील असलेल्या निष्पाप मास्तरांना उगाच त्रास दिला, म्हणुन शिक्षणमंत्र्यांनी आपल्यालाच अधार कोठडीत डांबून ठेवलय की काय असले चित्रविचीत्र विचार नादर साहेबांच्या मनात येऊ लागले. तेवढ्यात अंधारातुन शेकोटीच्या परिघात काहीतरी हालचाल झाली अन् कुठूनतरी एक कुत्र आत डोकावलं. नादर साहेब आधी घाबरले व नंतर सावरुन बसले, जिभल्या चाटतं कुत्रं शेकोटीच्या अन् नादर साहेबाच्या आधारावर येऊन बसलं, खरं म्हणजे आता नादर साहेबांना त्याचाच जास्त आधार वाटला. दोघंही एकमेकांना अनोळखी असले तरी एकमेकांच्या आधारावर आता ही रात्र नक्कीच थोडी सुसह्य होईल या कल्पनेने नादर साहेबांची भिती थोडी कमी झाली, थोडं एैसपैस बसुन त्यांनी आता कडाक्याच्या थंडीत शेकोटीचा आनंद घेतला. कुत्रं सुध्दा थोडं खुरडत खुरडत आनखी जवळ येऊन डोळे मिटून बसुन राह्यलं.
शेकोटीच्या धगीनं आता हात पाय गरम झाले होते, थंडी पळून गेली होती. आजुबाजुचं काहीच दिसत नव्हतं इतका गडद अंधार चारी बाजुंनी पसरलेला होता. ‘कदाचीत अमावस्येच्या आजुबाजुची विंâवा अमावस्येचीच रात्र असावी‘ असा विचार मनात येताचे नादरसाहेब पुन्हा अस्वस्थ झाले अन् हाताच्या बोटावर काहीतरी हिशोब मांडू लागले. कुत्र्याचा डोळा चुकवून उगाच माग पाहून अंधाराचा अंदाज घेवून सावध झाले. शाळेतल्या भेदरलेल्या चिमुरड्या, निष्पाप पोरांचे ते चेहरे आता आपल्याकडं पाहून हासतं आहेत, हेडमास्तर छडी घेऊन आपल्या दिशेनं चाल करुन येत आहेत, सरपंचाची ‘प्रगती’ बे-एक-बे म्हणत आपल्याच डोक्यावर नाचत आहे, अन् ‘साहेब उद्या पाठवतो बगा प्रगतीला साळंत‘ असं म्हणतं सरपंच गदागदा हासत आहेत....‘ असले काहीतरी स्वप्नं नादर साहेबांना अर्धवट झोपेत पडत, अन् साहेब बसल्या जागी खडबडून जागं होत, बाजुबाजुला पाहत...., साहेबाची हालचाल जाणवली की, कुत्रं रात्रीचा भेसुर सुर लावी अन् साहेब तोंडातून आवाज न काढता कुत्र्याला गप्प बसायला सांगत. थोडा डोळ्याला डोळा लागला की, कधी गृहमंत्री (साहेबांची बायको) ‘रात्रभर तुम्ही होता कुठे ?’ म्हणुन फैलावर घेत तर कधी, शिक्षणमंत्री, ‘चला कानं पकडून कोंबड व्हा तासभर, कोंबडी खायला पायजे काय ?‘ असं म्हणून अवघड जागेवर छडीचे फटके देत असल्याची स्वप्नं पडत, रात्रभर स्वप्नांनी साहेबांना झोप नाही अन् साहेबांच्या खडबडून जागं होण्यानं कुत्र्याच्या डोळ्याला डोळा नाही. जाग आली की साहेब कमालीचा पश्चाताप करायचे, पुन्हा पुन्हा शेकोटीच्या उजेडाला हात करुन घड्याळ पहायचे. हे घड्याळाचे काटे सुध्दा आपल्यावर सुड उगवत आहेत की काय असा विचार सुध्दा त्यांच्या मनात येऊन जातो, पण काहीच विलाज चालत नाही. कधी या काळोखातुन एखादा आशेचा किरण दिसतो आणि कधी आपली सुटका होते असा विचार करत झुंजुमुंजु होण्याची वाट पाहत नादर साहेब दगडाला टेकून बसुन राहतात. रात्र जसजशी पहाटेकडं सरकु लागते तसतशी शेकोटीची धग ओसरु लागते गार हवेची झुळूक उजेडाचा परिघ भेदुन अंगा खांद्यावर खेळु लागते. खर म्हणजे सुस्ती येऊन गाढ झोप लागण्याची वेळ पण अशा निर्जनस्थळी, कुठलाच सहरा नसतांना, स्वप्नांच्या सावटाखाली झोप लागणं खरं तर अशक्य, त्यातच कधी अर्धवट झोप लागली की नादर साहेबांना आपण कायम आरोपीच्या पिंजऱ्यात असल्याचे भास होत आणि खाडकन डोळे उघडत, पुन्हा अंगात कापरं, दरदरुन घाम, अशी गर्भगळीत अवस्था.
अशाही अवस्थेत कधीतरी उशीरा झोप लागते अन् पुन्हा पहाटे पहाटे जाग येते ....., सभोवतालच अस्तित्व आता बNयापैकी जाणवू लागतं, डोंगरांची डोकी, झाडांच्या रेषा, पिकांची सळसळ...पक्षांची कुजबुज... अशी पुसटसी कल्पना येऊ लागते..... नादर साहेब डोळे चोळत उटतात ... बाजूला झोपलेलं श्वान काही अंतरावर जाऊन काही तरी खात असतं .... कसलं तरी वाढलेले पान .... त्यावरच्या भातावर ते तुटून पडलेले असतं..., उजेडात दिसलेल्या अन्नावर ते ताव मारंत असतं. ‘इतक्या सकाळी काय मिळालं याला ?‘ असा विचार करत नादर साहेब थोडं रोखुन पाहतात ...तर कसली तरी पुजा असते ... हळदी कुंकू ..नैवद्य .....फुटलेले मडकं .... धगधगुन शांत झालेली शेकोटी ..... शेकोटी ? शेकोटी कसली ... भलीमोठी चिताच !..... नादर साहेब सगळं त्राण एकवटून उभे राहतात... मागे पुढे पाहतात ... जाग-जागी रोवलेली खुनेची दगडं .... ज्याला पाठ टेकवून बसले तो दगड सुध्दा ... असाच.... ‘मी रात्रभर चितेचा शेक घेत होतो ? मी रात्र स्मशानात काढली ?’ अंधाराचं मळभ दुर होऊन डोळ्यावरची झापडं दुर होतात. आता मात्र साहेबांचे पाय लटपटायला लागतात.... अंगातलं त्राण नाहीस होतं ... पहाटेच्या कडाक्याच्या थंडीतही साहेबांना दरदरुन घाम फुटतो. होत नव्हतं तेवढ आवसान आणून साहेब ... चालु लागतात... मोटार सायकलजवळ येतात, मोटार सायकल बंद पडली आहे हे विसरुन मोटार सायकलवर बसतात, सवयीप्रमाणं हाफकीक मारतात ... मोटार सुध्दा सवयीप्रमाणं काहीही तक्रार न करता दणाण फट फट आवाज करते .... साहेब उरलेली सगळी शक्ती लावून एक्सलेटर पीळतात अन् मोटार सायकल मिळेल त्या रस्त्यानं स्मशानाच्या परिघाबाहेर सुसाट वेगात धावत सुटते. इकडं भुकेल्यापोटी रात्रभर अन्न शोधंत फिरणारं श्वान सरते शेवटी तृप्त होऊन इच्छित स्थळी निघुन जातं.
त्याच दिवशीची सकाळ ....
नादर साहेब उशीरा उठतात, डोकं जड झालेलं आहे ... आजुबाजुला पाहतात, खोलीचे पडदे उघडतात ... पुर्वेकडून उन्हाची सोनेरी तिरीप बिछान्यावर पडते. दाराजवळ त्यांचा लाडका टॉमी ... बीस्कीटं खात असतो, त्यांची नजरानगर होताच साहेब ओशाळतात, उठतात ....फोनजवळ जातात ... नंबर फिरवतात ...‘माने मास्तर ... नमस्कार ! मी काही यावेळी तुमच्या शाळेवर इन्स्पेक्शनला येत नाही, माझी तब्यत खराब आहे.... तुम्हीच जिल्ह्याला आले की भेटून जा ! इथेच काय तो अहवाल लिहून घेऊ !’
इकडे शाळेत पुन्हा चैतन्य संचारतं ... हापसा नियमितपणे पाणी ओकू आगतो ... सरपंचांच्या प्रगतीची तब्यत सुधारते ... आता नादर साहेबाशिवाय .... त्यातल्या त्यात जमेल तेवढया प्रतिष्ठित गावकर्यांसह अन् शाळा मास्तरांसह कोंबडीच्या जेवनाचा बेत शिजु लागतो.
- रमेश ठोंबरे
No comments:
Post a Comment