Sep 13, 2017

काय छळतोस तू


...…......
काय छळतोस तू नोकरी सारखा
दे उबारा जरा गोधडी सारखा
.
सूर लागेल रे अंत:करुणेतुनी
भेटला जर कुणी बासरी सारखा
.
सर्व आहे तरी, भोगले ना कधी
जन्म गेला तुझा कावडी सारखा
.
केस हातात घे अन कुरवाळ ना !
काय बघतोस रे लोकरी सारखा
.
घेतला मी नभी मुक्त झोका तरी
हाय, झुरतोस तू बंगई सारखा
.
छान दिसतेस तू तर दह्यासारखी
चेहरा ही किती भाकरी सारखा !
.
टाकला मी जरी गळ तुझ्या अंतरी
सांग फसशील का मासळी सारखा
.
देह होईल हा शामियाण्यापरी
जीव जडल्यावरी झालरी सारखा
.
वेड लागेल बघ पावसाला तुझे
सांड मातीतुनी पेरणी सारखा
.
हौस नाही मला दर्शनाची तुझ्या
वागलो मी सदा पायरी सारखा
.
प्राण घेतात रे लेखणीचा इथे
शब्द ताणू नको बंदुकी सारखा
.
जात लपवाल जर सोवळ्याच्या घरी
धर्म वाजेल मग ढोलकी सारखा !
.
मुक्त आहे म्हणे फार सरकार हे
श्वास मिळतो इथे लॉटरी सारखा
.
- रमेश ठोंबरे

No comments:

Post a Comment