ते आले,
त्यांनी कोपऱ्यात बसवलं
कवितेला
अन ताबा घेतला मंचाचा
कधी गळा काढून
तर कधी अश्रू ढाळून
कधी तडक भडक ओळी
ऐकवून मोहित केलं श्रोत्यांना
कधी टाळ्यांसाठी
फेकल्या चारोळ्या
तर कधी हशासाठी
वाचल्या वात्रटिका
अन सरतेशेवटी
त्यांच्यातलीच एक फर्माईश म्हणून
365 गुणिले कितीतरी वेळा म्हटलेली
एक रचना सादर करून
त्यांनी खिश्यात टाकलं अक्ख संमेलन
संमेलनानंतरचा कार्यक्रम आटोपून
मध्यरात्री कधीतरी ते पोहचले घरी
पण ती मात्र अजूनही तिथेच कोपऱ्यात
शोधतेय स्वतःच अस्तित्व !
- रमेश ठोंबरे