आभाळाच्या डोक्यावरती छप्पर असते
अन धरतीच्या पोटामध्ये तळघर असते
चिंता करणे मक्तेदारी आईची पण
बापाच्याही हृदयामध्ये जर तर असते
पैसा अडका, बंगला गाडी, तुमच्यासाठी
त्याच्यासाठी केवळ त्याचे वावर असते
गंडा-दोरी, औषध-गोळी दहशत नुसती
नजर प्रियेची जखमेवरची फुंकर असते
पाहत नाही, ऐकत नाही, बोलत नाही
नुसते हसते, ते बापूंचे, बंदर असते !
शिकला नाही त्याच्या डोक्यावरती ओझे
शिकतो आहे त्याच्या पाठी दप्तर असते
चंद्र, सूर्य अन पृथ्वी त्याला नको दाखवू
वर्तुळ म्हणजे त्याच्या लेखी भाकर असते !
- रमेश ठोंबरे