May 28, 2020

लस




हा अंधार,
ही दिवेलागण
ही पायपीट
हा थाळीनाद
सहन होत नाही आता काहीच

या काळानच
टोचून द्यावी एखादी लस
या जगण्याला आरपार
आणि खेळू द्यावं पॉज झालेलं हे
जगणं सभोवताल

शेणामातीच्या हातांना
नको सॅनीटायझरचा वास
अन गच्च भरून घेता यावेत
फुफुसांमध्ये श्वास

कष्टकऱ्यांच्या हाताला
पुन्हा मिळुदे काम
हवेच्या गार झुळकेसाठी
पाठीवरती घाम

गावातल्या मित्राला वाटू नये
शहरातल्या दोस्ताची भीती
आणि छातीवर वार करणाऱ्या
शत्रूलाही मारता यावी मिठी

पुन्हा एकदा खुल्या
व्हाव्यात व्याकुळलेल्या वाटा
पुन्हा एकदा परत याव्यात
किनाऱ्यावर लाटा

पुन्हा एकदा हे जगणं व्हावं
श्वासांवरती स्वार
म्हणून
या काळानच टोचावी
एखादी लस आरपार !




- रमेश ठोंबरे
#लॉकडाऊन_असलेल्या_शहरातून_5

May 20, 2020

आता लॉकडाऊन उघडलं तरी टेन्शन नाही !




पहाटे जाग आली
घड्याळ पाहिलं
वेळ झाली होती ...
बायकोला उठवलं ...
ती कामाला लागली
मी बाथरूम गाठली
सर्व विधी उरकले
अंघोळ केली
कपडे केले
नास्ता केला
चहा घेतला ...

मी पुन्हा माझी आवरा आवर केली 
बायकोने पेन, रुमाल डबा दिला
मी लॅपटॉप घेतला
ब्यागेत घातला
मोजे, बूट घेतले 
पायात घातले
बाहेर आलो
सगळी कडं शांत शांत ...

मी ब्याग गाडीत ठेवली
मी गाडीत बसलो
गाडी सुरू केली
गाडी सुरू झाली

आता ब्रेक लावलं
गाडी बंद केली
मी गाडीतून उतरलो
ऑफिसात आलो
सगळ्यांना गुड मॉर्निंग केलं
माझ्या टेबलावर गेलो
ब्याग ठेवली
लॅपटॉप काढला
पी सी सुरू केला
खिडक्या उघडल्या 
वर्ल्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट,
झूम, मेल ... सगळं सगळं
हाताळून पाहिलं
सगळं व्यवस्थित चाललं ...

मग दुपार झाली
बायकोने आवाज दिला
'लंच ब्रेक, झालाय !'
मी ब्याग उघडली
डबा घेतला, टेबलावर ठेवला
हात धुतले
बायकोने स्यानिटायझर पुढं केलं
मी पुन्हा हात धुतले !

आता मुलं आली, 
'हात धुवा' बायको म्हणाली
मुलांनी स्यानिटायझरन हात धुतली
मी जेवायला बसलो
मुलं जेवायला बसली
बायको जेवायला बसली
आम्ही जेवलो !

मग बायको म्हणाली
'आता बरं वाटतंय का ?'
मी म्हणालो 
'हो, आता बरं वाटतंय'
'आज खरंच बरं वाटतंय
रुटीन काम केल्याचं फील सुद्धा आलंय,
आता लॉकडाऊन उघडलं तरी टेन्शन नाही !'


- रमेश ठोंबरे
#लॉकडाऊन_असलेल्या_शहरातून_3

May 4, 2020

ओठांवरती घ्यावे म्हणतो

ओठावरती घ्यावे म्हणतो 
तुला गुणगूणावे म्हणतो ! 

अश्रू होवून पदरी पडलो 
मोती बनून जावे म्हणतो 

आठवून मी थकलो तुजला 
आठवांत तव यावे म्हणतो 

तीमिराचा या नाश कराया 
स्वत:च 'समिधा' व्हावे म्हणतो 

कुशीत तुझिया डोळे मिटुनी 
मृत्यू गीत हे गावे म्हणतो 

.......................................................................
"अपने होंठों पर सजाना चाहता हूँ" - क़तील शिफ़ाई 
भावानुवाद - रमेश ठोंबरे 
...................................

ओल आटलेल्या शहरात ...



लॉकडाऊन असलेल्या शहरात...
ओस पडलेत रस्ते
अन ओसाड झालीत मनं

आटून गेलाय मायेचा निर्मळ स्पर्श
निर्जंतुकीकरणाच्या रेट्यानं
रखरखीत झालेत ओले हात

पेटत चाललीय पोटातली धग
विझत चाललीय डोळ्यातली आस
सुटत चाललेत हातातले हात !

वाढत चाललंय
माणसामाणसातलं अंतर
'दूर राहा, सुरक्षित राहा !'
असलं काहीतरी
वैश्विक म्हणून भरवलं जातंय
रिकाम्या माणसांच्या
रिकाम्या डोक्यात ....

'घरी राहा, सुरक्षित राहा !'
म्हणून पिटले जातायत
जबाबदारीचे ढोल
.. पण घरी राहून
सुटतात का कधी जगण्यातले प्रश्न ?
हे समजत कसं नाही,
या लोकांनां !

विचार करण्याचे
सर्व मार्ग बंद झाल्यावर
आता बसून आहेत लोक
घरातले घरात
अन रस्त्यातले रस्त्यात !

ओल आटलेल्या
या शहरात ....
आता पसरत चाललंय
फक्त वांझोट कारुण्य !



- रमेश ठोंबरे
#लॉकडाऊन_असलेल्या_शहरातून_2

Apr 27, 2020

स्पर्श




लॉकडाऊन आलेल्या शहरातील
माझ्या घराच्या खिडकीतून
मी पाहतो आहे
स्वच्छ, निरभ्र आकाश !

आकाशात स्वच्छंद उडणाऱ्या
पक्ष्यांच्या रांगा ....

अजून काय करावं
या रिकाम्या दिवसात
म्हणून मग मी ठेवतो
पक्षांसाठी,
दाना पाणी
घराच्या बाल्कनीत ..

तसे उतरतात पक्षी
एक एक करून
दाणे टिपतात ...
पाणी पितात ...
आणि निघून जातात
एक एक करून

पक्षी कधीच
स्पर्श सुद्धा करत
नाहीत माणसांना ...
आणि त्यांच्यातील एखाद्यानं
चुकून स्पर्श केलाच
तर ठेचून मारतात चोचीनं
आपल्याच स्वकियाला.

कदाचित त्यांना माहीत असावं
माणूस
आधीही विखारीच होता
आणि
आता तर विषारी सुद्धा झालाय !



- रमेश ठोंबरे
#लॉकडाऊन_आलेल्या_शहरातून_१

Apr 26, 2020

~ घेतले आहेस जर वाचून तू ~


घेतले आहेस जर वाचून तू
घेत का नाहीस मग समजून तू ?

वाईटांचे होत गेले चांगले
काय झाले चांगले वागून तू !

सोडले आहे तुला पाण्यात मी
बुडव अथवा ने, तुज वाहून तू

काय आहे राहिले सांगायचे ?
सांग ते नाहीस का जाणून तू ?

सांग आम्ही काय मग समजायचे ?
घेतले जर दार ही लावून तू

वेगळा आहेस पण जाणून घे
वेगळा नाहीस तिज वाचून तू !

'मी विटेवर फार पडलो एकटा'
घे तिच्याशी आज हे बोलून तू

गरज आहे माणसाची आजही
ये पुन्हा हे देवपण टाकून तू !

-  रमेश ठोंबरे

Apr 22, 2020

|| एका सुक्षमाने ||



वाढले अंतर
वाढला दुरावा
समतेचा दावा
फोल केला ||

माणसाचा कर
माणसाचे घर
माणसाचा श्वास
नासविला ||

ऐसे कैसे आले
अमंगळा उत
अ-स्पृश्याचे भूत
मातीयले ||

एका सुक्षमाने
गिळीले आकाश
गिळीला प्रकाश
विश्वाचा या ||

- रमेश ठोंबरे