May 28, 2020

लस




हा अंधार,
ही दिवेलागण
ही पायपीट
हा थाळीनाद
सहन होत नाही आता काहीच

या काळानच
टोचून द्यावी एखादी लस
या जगण्याला आरपार
आणि खेळू द्यावं पॉज झालेलं हे
जगणं सभोवताल

शेणामातीच्या हातांना
नको सॅनीटायझरचा वास
अन गच्च भरून घेता यावेत
फुफुसांमध्ये श्वास

कष्टकऱ्यांच्या हाताला
पुन्हा मिळुदे काम
हवेच्या गार झुळकेसाठी
पाठीवरती घाम

गावातल्या मित्राला वाटू नये
शहरातल्या दोस्ताची भीती
आणि छातीवर वार करणाऱ्या
शत्रूलाही मारता यावी मिठी

पुन्हा एकदा खुल्या
व्हाव्यात व्याकुळलेल्या वाटा
पुन्हा एकदा परत याव्यात
किनाऱ्यावर लाटा

पुन्हा एकदा हे जगणं व्हावं
श्वासांवरती स्वार
म्हणून
या काळानच टोचावी
एखादी लस आरपार !




- रमेश ठोंबरे
#लॉकडाऊन_असलेल्या_शहरातून_5

No comments:

Post a Comment