Dec 16, 2021
~ पाय जेंव्हा ढेकळानी सोलली ~
पाय जेंव्हा ढेकळानी सोलली
खूण तेंव्हा ओळखीची पोचली
गाव माझें ज्या दिशेला यायचे
एक खिडकी त्या दिशेला ठेवली
याद आली की निघावे लागते
गाव असते वाट पाहत आपली
जायचे नव्हतेच नुसते कोरडे
आठवण मग सोबतीला घेतली
गाईच्या डोळ्यात जेंव्हा पाहिले
गाय सुद्धा ओळखीचे बोलली
ओल असते गाव अन शेतातही
कोरडी नसतात नाती येथली
- रमेश ठोंबरे
Dec 7, 2021
~ शाळा ~
प्रेम खरे तर माझे, इतकेही बालिश नव्हते
ते वय असावे जे, माझ्याशी बांधील नव्हते
ती बसून बाकावर, फळ्यास न्याहाळत होती
मज फळा पाहण्याचे, कुठलेही कारण नव्हते
शाळा भरत असावी, ती केवळ तिच्याचसाठी
या शिवाय शाळेचे, मम लेखी महत्व नव्हते
ती वर्गामध्ये नव्हती, तेंव्हाही दिसली होती
तिच्या दर्शनासाठी, मज कसले बंधन नव्हते
अभ्यास मी तर केला, बस तिला जाणण्यासाठी
पण तिला जाणण्याचे, तेंव्हाही पुस्तक नव्हते
ती पुढील बाकावर, मी मधल्या बाकावरती
वर्गात आठवणींच्या, आणखी कुणीच नव्हते
तिला प्रदर्शित केले, मी वर्गाच्या भिंतीवरती
ती हृदयामधली असते, हे तेंव्हा समजत नव्हते
चिट्ठी मधून आहे, ती मनात माझ्या अजुनी
चिट्ठी मना जवळची, मन तिला पाठवत नव्हते
- रमेश ठोंबरे
Subscribe to:
Posts (Atom)