Oct 1, 2022
खयाले शेर - उपक्रम (भाग - 1)
May 4, 2022
~ चेहऱ्यावर पुन्हा चेहरे पाहिले ~
चेहरे मी किती नागडे पाहिले
चेहऱ्यावर पुन्हा चेहरे पाहिले
ऐकताना जरी हायसे वाटले
वेगळे पण तिचे वागणे पाहिले
पाहिला ना मनासारखा चेहरा
चेहऱ्याने जरी आरसे पाहिले
एक गेला तडा चेहऱ्यावर पुन्हा
आरश्याने तिचे बोलणे पाहिले
चांगले मी जगाला जरी मानले
फार नव्हते कुणी चांगले पाहिले
ओठ होते तिचे फार आसूसले
चेहऱ्यावर तरी लाजणे पाहिले
भूक होती तवा गोड होत्या कण्या
पोट भरल्यावरी चोचले पाहिले
ओळ आली जरी काळजातुन तिच्या
भाव डोळ्यामधे कोरडे पाहिले
सोसण्याचा मला त्रास नव्हता कधी
फार होते जरी सोसणे पाहिले
- रमेश ठोंबरे
Jan 26, 2022
~ जसा अवखळपणा वाऱ्यामध्ये आहे ~
जसा अवखळपणा वाऱ्यामध्ये आहे
तसे मूल तान्हे माझ्यामध्ये आहे
आह कुणाची ही इथवर पोचत नाही
मैफल तर उरली शिट्यामध्ये आहे
काटा फुलाहून वरचढ वाटत आहे
समजेना कुठल्या तोऱ्यामध्ये आहे
मी कोणाच्याही पुढ्यात वाकत नाही
माझे भविष्य माझ्या हातामध्ये आहे
झोपीमध्ये मी सताड जागा असतो
स्वप्न एक उघड्या डोळ्यामध्ये आहे
डोके खरेच माझे जड झाले माझे
विचार एक वेगळा डोक्यामध्ये आहे
फिरून ही दुनिया पुन्हा इथेच येतो
वर्तुळ तर माझ्या पायामध्ये आहे
- रमेश ठोंबरे
Subscribe to:
Posts (Atom)