Jun 28, 2024

करुणेशी नातं सांगणारं 'उलट्या कडीचं घर'









आजच्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रकाशित Sunil Ubale  यांच्या कविता संग्रहाच मी केलेलं पुस्तकं परीक्षण. जागेअभावी बराच भाग edit झाला आहे...  संपूर्ण परीक्षण text स्वरूपात इथे प्रकाशित करतो आहे!

पत्रकार मित्र तुषार Tushar Bodkhe यांच्या सहकार्याबद्धल विशेष आभार!

.............................

करुणेशी नातं सांगणारं  'उलट्या कडीचं घर'

मी पुस्तक वाचत असताना नेहमीच एक पेन्सिल सोबत ठेवतो .... आवडलेल्या ओळी अधोरेखित करण्यासाठी... आज ही सोबत होती... पण ओळी अधोरेखित करता करता अख्खं पुस्तक रंगून गेलंय... असं अभावानंच होतं कधीतरी.    

‘मी कितीतरी इमारतीला 

लटकून मारलेत रंग

मी जमिनीशी नातं तोडून 

जगलो बऱ्याचदा’


‘लोकं भलेही लपवून ठेऊद्यात

सोनं ताळेबंद तिजोरीत 

म्या खेळत्या वयात भाकरीचे 

तुकडे लपवून ठेवले होते 

उद्याची उपासमार टाळण्यासाठी...’


अश्या काही ओळी वाचल्या की सुन्न व्हायला होतं आणि आपण जमिनीवर असतानाही जमिनीशी नातं सांगू शकत नाही असं वाटतं ... 

या ओळी आहेत सुनील उबाळे यांच्या, खरं तर ‘कवी सुनील उबाळे’ म्हणजेच आपल्या नावापुढे 'कवी' हा शब्द अभिमानानं अन जबाबदारीनं मिरवणाऱ्या कवीच्या. 


कवी सुनील उबाळे यांचा ‘उलट्या कडीचं घर’ हा कविता संग्रह अथक प्रयत्नानंतर नुकताच प्रकाशित झाला आहे. उबाळे यांच्या कवितांची भाषा अतिशय ओघवती आणि सहज आहे .... यात रूपक आहे, उपमा आहे, प्रतीकं आहेत तरी ही कविता कृत्रिमतेच्या आणि अनावश्यक कलात्मकतेच्या जवळही न जाता वाचकांच्या काळजाला हात घालते.        


कवीचं बालपण, कवीचं काम, पोटापाण्यासाठीचा संघर्ष, कुटुंब आणि भवताल हे साधेच विषय कवितेचे असतानाही कवीची भाषा वैश्विक वाटत राहते ही खरं तर या कवीच्या सांगण्यातली जादू आहे जी वाचकांना कवितेगनिक झपाटत जाते. 

     

सुतारानं चुकून दाराची कडी उलट्या बाजूनं लावावी आणि आजीनं कुठलंही स्तोम न माजवता ते बनचुकेपण बिनदिक्कत मिरवावं तसच आजीचं शहाणपण मिरवताना कवी म्हणतो ....


‘असंख्य तज्ञांचे दावे

उधळून लावलेस तू 

आणि

अजरामर केलंस माझं करंट जगणं

उलट्या कडीच्याघरात...’


आजीवर नितांत प्रेम असणारा कवी आजीचा शब्द नेहमीच प्रमाण मनात आलाय, त्या आजीच्या शब्दातून कविला जगण्याचं मर्म सापडत जात तेंव्हा ती निरक्षर आजी त्याला कुठल्याची तत्ववेत्यापेक्षा श्रेष्ठ वाटत राहते .... म्हणून ‘आजी’ या कवितेत कवी म्हणतो कि ....    


‘तिचा प्रश्न छोटाच होता

माझं आयुष्य कमी पडलं

त्याचं उत्तर शोधता शोधता’ 

...


‘ती दमून थकून बसायची 

घरात भिंतीना टेकून तेंव्हा,

त्या भिंतीनाही देवपण 

येऊन जायचं आपोआप’


कवी आपल्या सहचारीनिबद्दल लिहिताना म्हणतो कि,   


‘ती रोजंच वाटत असते पाट्यावर 

हिरव्या मिरच्यासोबत

तिचं नसीब’


तर कधी म्हणतो की,


‘तू घासातला घास भरवतेस अन

राहतेस अर्धपोटी हे कळतं मलाही 

पण 

तुला कळू देत नाही 

दिवस भिरकावून देतो 

पाण्यात दगड नाचवल्यासारखा 

आणि 

चिंतेचे वर्तुळं पोहचतात 

तुझ्या मनाच्या अथांग सागरापर्यंत’ 

 

पुढं एका कवितेत कवी आपल्यातलं कोणी तरी अचानक निघून गेल्याचं आणि एकटेपणाचं दु:ख मांडताना लिहितो कि,  


'तू निघून गेलास तेंव्हापासून 

सारेच म्हणायचे

आम्ही तुमच्या मागे आहोत 

पण 

..

कळत नाही एक माणूस निघून गेल्यावर 

आपलंच घर का पाठ्मोऱ्ह होतं

आपल्यासाठी'


अश्या असंख्य ओळी या संग्रहातून जागो जागी भेटतात ज्यांना ओलांडताना आपलं मन तिथेच कुठे तरी घुटमळत राहत कितीतरी वेळ ....

याच संग्रहातली ही एक कविता, यातली कुठली ओळ अधोरेखित करावी हे मला समजलं नाही .... प्रत्येक ओळ म्हणजे कविता आणि कवितेच व्याकरण आहे ही कविता म्हणून संपूर्ण कविताच इथे देण्याचा आगाऊपणा करत आहे ....


‘मी कबरी खोदल्यात स्मशानांत...’


ठेकेदाराच्या दावणीला बांधलेले दिवस सोडवून घेतले 

मुठभर काजवे सोडलेत अंधारलेल्या घरात 

कात टाकून सळसळण्याचा कित्येकदा 

केलाय प्रयत्न

दु:ख बिलगून राहिलं अंगभर 

कवितेसारखं

मी कबरी खोदल्यात स्मशानात

आणि 

झोपून बघितले मापा करीता 

मी वेदनेच्या तळाची मुठभर माती

खिश्यात ठेवली कायम 

माझ्या हसऱ्या चेहऱ्यामाग

आसवांचा पोळा असतो फुटलेला

माझ्या कविता भरल्या नदीत 

चाळणी लावून पकडतील खपाट पोटाची मुलं

मला जळूनही काही होणार नाही 

आणि 

पुरल्यानंतरही उगवेल मी 

मी कविता पाहिलेला जादुई माणूस आहे’ 


या कवितेतल्या कितीतरी ओळी उपमा, अलंकार आणि रूपकं आपसूक घेऊन आल्या आहेत असच वाटत राहत....  अशीच आणखी एक कविता या संग्रहात आहे ‘मांजराच पिल्लू आणि मी’ मुद्दामहून इथे देत नाही पण नक्की वाचा .... कवितेशी एकरूप झाल्यानंतर कवितेची भाषा कशी असू शकते याच उदाहरण आहेत या कविता. कवितेचे सगळे सगळे अलंकार पानोपानी लेवून या संग्रहातली एक एक कविता बाभळीची पिवळी हळदुली फुलं कानात घालून आपल्याच टेचात मिरवणाऱ्या निरागस मुली सारखी बागडत असते.   


कवी ‘शाळा’ नावाच्या कवितेत म्हणतो कि,  


‘हि कसली बेचैनी बांधून

नाचाया लागलो 

दारिद्र्याच्या अंगणात ...’


...‘एक पाटी एक पेन्सिल नव्हती 

माझं भविष्य लिहिण्यासाठी 

एक शाळा होती 

माझ्या कुटुंबाकडं पाठ फिरवलेली’


तेंव्हा वाटतं कि ज्याच्या कुटुंबाकडे शाळेने आजन्म पाठ फिरवलेली असताना आपल्या जगण्यातलं हे कमालीचं दुःख आणि कारुण्य एवढ्या जादुई शब्दात मांडणार कवी नेमका कुठल्या शाळेत शिकला असावा ?


संपूर्ण संग्रहात कवी व्यवस्थेवर बोट ठेवत असतानाही व्यवस्थेकडं बोट करत नाही, व्यवस्थेवर आग-पापड न करता आपल म्हणन मांडत जातो. पण स्वाभिमानानं जगणं इतकं सोपं थोडंच असत, तेंव्हा कवी म्हणतो,    

 


‘स्वाभिमान कुणाची भाकर 

होत नसतो

आत्मसन्मान गधड्याच्या 

दावणीला बांधून

जगावं लागतं हल्ली’ 


‘स्वभिमानापेक्षा गडद होत जातो 

आपल्या भुकेचा महाकाय प्रश्न’


आणि अश्या पिळवटलेल्या दिवसात कधी तरी संयम सुटतोच सुटतो, आणि तेंव्हा कसलीच भाषा न समजणाऱ्या व्यवस्थेवर कवी लिहितो,  


‘मी इथल्या व्यवस्थेच्या 

तोंडावर थुंकून

सांगून देईल

माझ्या आतील घुसमट’


भूक आणि भाकरीची लढाई कवी हार न मानता लढत असतो, त्याची तक्रार ही नसतेच खरे तर  ...  


‘हे रखरखतं ऊनही मला 

थांबवू शकलं नाही घरात

लेकरांच्या भूकेपुढे 

सूर्यही शीतल असतो’


‘मनाची भीती तर 

कधीच वाटली नाही 

पोट भरलेली लेकरं

पहिली की हा जन्म सार्थकी वाटतो !’


पण एक वेळ अशी येती कि पोटापाण्याच्या संघर्षाच्या दिवसांमध्ये जेंव्हा भाकरीचा प्रश्न मोठा होत जातो तेंव्हा कवी लिहितो की,  


'दिवसभर बैलासारखं राबल्यावरही

रात्रभर डोळ्याला डोळा लागत नाही 

आत्महत्तेची कितीतरी पत्रे 

लिहिली आणि फाडून टाकली 

बिनघोर झोपलेल्या मुलींना पाहून'


देशातला कामगार काय किंवा शेतकरी काय भाकरीचा आणि जगण्याचा प्रश्न बिकट झाला कि आत्महत्तेचा मार्ग निवडतात .... पण एक कवी कधीच आत्महत्या करत नाही ... त्याला त्याच्या ‘बिनघोर झोपलेल्या मुलींमध्ये’ त्याची कविता दिसत असते. 

इथे कवी सोबततर त्याची कविता असते ... पण त्याच्या वस्तीतल्या इतर कामगारांच काय होत असेल ... ते कोणाशी संवाद साधत असतील...    

 


तेंव्हा कवी लिहितो,  


‘व्यसनाने बरबटलेली असतात

हि मेहनतीनं लदबदलेली माणसं

दिवसभर बैलासारखं राबल्यावर

माणूस होणं शक्य नसतं

प्रत्येकालाच ....'

...

'मी कितीतरी दंश करून घेत असतो 

माझ्या अंगाखांद्यावर शब्दांचे 

हि कवितेची नशा उतरता कामा नये !’


जिथे अंग मेहनतीन दमलेली माणसांना नशेशिवाय पर्याय उरत नाही तेंव्हा ... कविसोबत मात्र त्याच्या कवितेची नशा असते, म्हणून कवीला त्याची कविता सुफी संतासारखी वाटते  


‘तू कित्येकदा भारून टाकलेत रस्ते माझे 

तू माझ्या डोक्यावर हात ठेवून 

फुंकर मारत असते एखाद्या 

सुफी संतासारखी’


म्हणून कवी म्हणतो कि माझ्या रितेपणात माझ्या सोबत कोणीच नसलं तरी कविता मला रीतं होऊ देणार नाही, मला एकटं पडणार नाही !  


‘जेंव्हा आपल्याकडे काहीच नसतं ना

कुणाला देण्यासाठी

तेंव्हा सापासारखी कात टाकून 

परकी होतात सारीच्यासारी नाती 


तुही थांबू नकोस,

परत जा आल्या रस्त्याने 

माझी कविता आहे तोवर

मला काहीच होणार नाही’ 


पुढच्या काही ओळीही असंच कवी आणि कवितेचं नात सांगणाऱ्या आहेत, प्रत्येक ४-८ ओळींमध्ये कवी नकळतपणे कवी– कविता आणि कवितेच्या पलीकडचं काहीतरी सांगत असतो ...

जसं की,  


‘रक्ताचं विष झाल्यावरही

जीभेतला गोडवा 

ठेवला कायम 

एक अदृश्य कविता 

माझा सांभाळ करत आहे ! 


शब्दाचं  ऍसिड अंगावर घेवून 

जाळून टाकलं स्वतःला 

तर

धमन्यात रक्ताएवजी 

कविता धावू लागल्यात !’


हे असलं काही तरी कवी कवितेच्या प्रत्येक ओळीतून सांगत असतो ... आणि आपण झपाटल्यासारखं वाचत राहतो ..


कवी म्हणतो की,   


'एक वैश्विक कविता 

लिहून झाल्यावर

मी पेटवून घेईल स्वतःला 

पैसच्या खांबासहीत

...

मी खांद्यावर कविता घेवून 

उभा राहिल

कुठल्याही लढ्याला 

माझ्या आतलं पिंपळपान काढून 

संपणार नाही माझ्यातली 

करुणा'


‘ही कवितेची भूक आणि करुणेची विरक्त भावना कुठून आली असेल कवीच्या कवितेत’ असलं काहीतरी आपण स्वतःलाच विचारत असतो तर कवी त्याच्या ‘वेदनेचे महाकाय जंगल’ या कवितेत लिहितो कि,  


‘मी माझ्याच पाठीवर, माझ्याच हातांनी

लिहून ठेवली, एक अजरामर कविता

जिला मी कधीच डोळे भरून 

पाहू शकलो नाही 

....

..

मी कधीच पाच बोटं, फिरवली नाही 

रांगोळीच्या असंख्य रंगावर

माझ्या काळजातून उडालेली 

फुलपाखरं

काळाच्या माथ्यावर भरतील 

समानतेचे रंग’


कवी त्याच्या माणूस नावाच्या कवितेत म्हणतो कि,  


'मी गमावून बसलोय 

सुख जिंकण्याची बाजी 

मी माती झटकून उठलेला 

माणूस आहे 

...

..

येथे वाहणारा वारा

आणि 

धावणारी माणसे राहतात 

मी जमिनीखालून रंगणारा 

माणूस आहे' 


मला तर या ओळी म्हणजे कधी कधी ‘दुःखाची ग्राफिटी वाटत राहतात !

आणि मग कवीच कधी कधी बुद्ध, ज्ञानेश्वर, तुकाराम तर कधी बहिणाई सोबतच आपलं नातं कवितेतून मांडत राहतो  


‘मी दगड झालो तर 

एखादा भाग होईल धरणाचा

जर पाऊस झालो तर

ओलाचिंब ठेवीन नदीचा पदर 

मला वाचू पाहणारे मेंदू

गंज लागुस्तर 

करतील समीक्षा 

मी बहिणाईच्या जात्यातून 

निसटलेली ओळ जगू पाहतोय !!’


कवितेविषयी कृतज्ञता व्यक्त करताना काय मागतो तर .... 


‘मी तुझ्या पायाची 

धूळ होतो, आहे आणि 

कायम राहिल,

तू फक्त माझ्या श्वासातून 

विभक्त होवू नकोस कधीही !’


आणि शेवटी आपली मुलींबद्दलच्या एका कवितेत कवी लिहितो कि,  


`माझ्या पोरी खेळल्या नाही कधी 

लाकडी घोड्यावर, पांगळ गाड्यासंग

त्याही खेळत आल्या भुकेशी लपंडाव 

परीस्थीशी केले दोन हात 

....

बाजारातून आणलेल्या खाऊसारखं

दुःख वाटून घेत असतो त्यांच्या संग

आणि 

त्याही फिरवतात हात माझ्या पाठीवरून 

माझ्या बापानं फिरवल्यासारखा...`


हे वाचताना नकळतच अभावाचं आणि करुणेचं एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटतं राहत उगाच !  


हा कविता संग्रह कैलास पब्लिकेशनने अतिशय दिमाखदार बनवला आहे. सरदार जाधव यांनी केलेलं संग्रहाच मुखपृष्ठ ही बोलकं आहे, मराठीतील महत्वाचे कवी आणि समीक्षक पी. विठ्ठल यांनी संग्रहाची पाठराखण केली आहे. एका हातांच्या बोटावर मोजन्यांइतक्या काही शुद्धलेखनाच्या आणि व्यकरणाच्या चुका सोडल्या तर ठळक असं काहीच उणेपण संग्रहात जाणवत नाही. हा कविता संग्रह मराठी साहित्यात नक्कीच महत्वाचा ठरणार आहे.


- रमेश ठोंबरे (संभाजीनगर) 

मोबाईल. ९८२३१९५८८९ 

---------------------------------------------------------------------------------------------------------------

कविता संग्रह : उलट्या कडीचं घर 

कवी : सुनील उबाळे 

प्रकाशक : कैलास पब्लिकेशन्स

पृष्ठ संख्या : ११५

किमत : १५०

Jun 14, 2024

IT cell

 ग्राउंडलेवल वगेरे अंधश्रद्धाच !



Jan 10, 2024


 

Jan 2, 2024

हारा वही जो लढा नहीं !

चंबळ - गुन्हेगारी, राजकारण, भ्रष्टाचार आणि शिक्षणाचा खालवलेला दर्जा या साठीच कुप्रसिद्ध असलेला देशाचा एक भाग. या भागात आत्मसान्मानान जगणं म्हणजे व्यवस्थेविरोधात उभं राहणं. मनोजचे वडील तेच करतात परिस्थिती हालाखीची असतानाही भ्रष्टाचाराला विरोध करतात आणि विधायकजींची नाराजगी ओढवून घेतात. त्यांना सरकारी नोकरीतून सस्पेंड केलं जातं. ते स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी कुटुंबाचा विरोध पत्करून न्यायालयीन लढाई लढण्यासाठी शहरात निघून जातात. इकडे मनोज बारावी पास करून कुठली तरी छोटी मोठी नौकरी करण्याचे स्वप्न पाहत असतो. विधायकजींच्या कॉलेजमध्ये वर्षानुवर्षे कॉपीच्या जोरावर मुलं दहावी बारावी होत असतात, मनोजची सुद्धा पूर्ण तय्यारी झालेली असते पण नेमक्या त्याच वेळी डीएसपी अधिकारी परीक्षा सेंटरवर धाड टाकतात... आणि चीटिंगच्या भरोश्यावर असलेले मनोजसह सर्व विध्यार्थी बारावी परीक्षेत फेल होतात.

विधायकजी डीएसपी दुष्यन्त साहेबांना गुंडाळण्याचा भरपूर प्रयन्त करतात पण दुष्यन्त सर त्यांच्या प्रयत्नांना भीक घालत नाहीत. इकडे बारावी फेल चा शिक्का बसल्यावर मनोज भावासोबत रिक्शा जुगाड चालवू लागतो, पण त्याचा थोडाफार फटका विधायकजींच्या खाजगी वाहतूक व्यवस्थेला बसतो म्हणून त्यांचे जुगाड जप्त करून या दोघांना लॉकअपमध्ये टाकले जाते. इथे डीएसपी दुष्यन्त मनोजला सोडायला सांगतात... मनोज दुष्यन्त सरांच्या वागण्याने आणि पदाच्या पावरनें प्रभावित होतो आणि 'मलाही तुमच्यासारखं डीएसपी व्हायचंय त्यासाठी काय करावं लागेल? ' असा प्रश्न करतो तेंव्हा दुष्यन्त सर त्याला 'फक्त परीक्षेत कॉपी करू नकोस' असा मिश्किल सल्ला देतात. मनोज तो सल्ला मनावर घेतो.... पुढच्यावर्षी फक्त अभ्यासाच्या जोरावर चीटिंग न करता सेकंड क्लासमध्ये पास होतो आणि डी एस पी होण्यासाठी आजीने दिलेल्या पैश्याच्या मदतीने शहर गाठतो परंतु शहरात पाऊल ठेवण्याआधीच पैशांसह त्याची ब्याग पळवली जाती, इकडे डीएसपी परीक्षेसाठी काहीतरी निर्णय येतो आणि हा अभ्यासक्रम रद्द होतो पुन्हा त्याचा संघर्ष सुरु होतो... तीन दिवस उपाशीपोटी काढल्यावर त्याला पांडे भेटतो. तो, आय पी एस च्या तय्यारी साठी दिल्लीला जाणार असतो. मनोज त्याला त्याच्यासाठीही दिल्ली तिकिटासाठी विनंती करतो आणि त्यालाही आय पी एस बनायचंय असं सांगतो. पांडे त्याचा अवतार पाहुन हसतो पण त्याच्या डोळ्यातली चमक आणि परिस्तिथी पाहुन त्याला मदत करतो आणि दिल्लीला घेऊन येतो. 

 मनोज दिल्लीत येतो, दोन दिवस पांडेकडे राहतो नंतर स्वतःसाठी काम शोधतो.... पुढे दोघांनाही त्याचा स्वतःच शेवटचा अटेम्ट देणारा गुरु गौरीनंदन भेटतो ... मनोज अतिशय मेहनतीनं प्रिलीम पास होतो... पुढे त्याला श्रद्धा भेटते .... मनोज मेन एक्साम फेल होतो... आणि मग पुन्हा रिस्टार्ट...! 15 तास काम... रात्री अभ्यास आणि पुन्हा एक्साम्स ... पुन्हा प्रिलीम्स पुन्हा मेन्स... आणि शेवटी शेवटचा अटेम्ट! 

 मधल्या काळात बरंच काही घडतं... श्रद्धा - मनोज... मनोजचा मित्र पांडे... गौरीनंदन ... मनोजचे वेगवेगळे गुरु आणि बरंच काही. 

 पुढे मनोजच काय होतं श्रद्धाच काय होतं आणि दोघांच्या नात्याचं काय होतं हे पाहण्यासाठी चित्रपट पाहणं गरजेचं आहे, तुम्ही पहा तुमच्या मुलांना दाखवा... चित्रपट सुंदर आहे थियटरला किती चालला माहित नाही पण ओटीटी वर रेकॉर्ड ब्रेक करतो आहे! चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे ... यापूर्वी यावर एक कादंबरी ही याच नावाने येऊन गेली ती अनुराग पाठक यांनी लिहिली आहे.. त्यानंतर विधू विनोद चोप्रा यांनी हा सर्वांग सुंदर आणि प्रेरणादायी चित्रपट बनवला आहे..!

सर्वच कलाकारांनी खूप सुंदर अभिनय केला आहे, मुख्य भूमिकेत असणारा विक्रांत मेस्सी आणि श्रद्धा, गौरीनंदन आणि पांडे यांच्या भूमिका करणारे कलाकार विशेष लक्षात राहतात. 

 चित्रपट पाहताना कितीतरी वेळेस डोळे भरून आले... Mpse, upse ची तय्यारी करणाऱ्या कितीतरी मित्रांचे चेहरे आणि भविष्य डोळ्यासमोरून गेलं ! 

 रियल लाईफ मधील मनोज आणि श्रद्धा यांचे बरेच interview youtube वर आहेत तेही पाहण्यासारखे आहेत... Apb maza वर माझा कट्टा मधील मुलाखत आहे त्यात दोघे ही खूप सुंदर मराठी बोलतात ऐकून हेवा वाटतो ! सोबत रिल लाईफ आणि रियल लाईफ चा एकत्र फोटो आहे पहा म्हणजे लक्षात येईल की, बाओपिक बनवताना अभिनयासोबत कलाकारांचं दिसणं सुद्धा किती महत्वाचं असतं. कलाकाराच्या निवडीबाबतही एक interview youtube वर आहे ! 

 चित्रपट : 12th FALE 
 दिग्दर्शन : विधू विनोद चोप्रा 
 कलाकार : विक्रांत मेस्सी, मेधा शंकर, अनंत जोशी, अंशुमन पुष्कर 
 IMDb reting : 9.2/10 

#12thpass 
#restart